Next
पु. ल. देशपांडे
BOI
Wednesday, November 08 | 04:00 AM
15 0 0
Share this story

जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
........  
आठ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत जन्मलेले पु. ल. देशपांडे ऊर्फ पीएल ऊर्फ भाई म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं खरंखुरं लाडकं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! महाराष्ट्राने ‘पुलं’वर जितकं प्रेम केलं तितकं क्वचितच कुणावर केलं असेल. त्यांच्याइतके विवध पैलू क्वचित कुणात एकवटले असतील. अगदी खळखळून ते ते खो खो हसवणारा श्रेष्ठ विनोदी लेखक, अत्यंत सहजस्फूर्त रंगकर्मी, हजरजबाबी लोकप्रिय वक्ता, संगीताची उत्कृष्ट जाण असणारा आणि स्वतः उत्तम पेटीवादन करणारा संगीतकार, सिद्धहस्त नाटककार, दिग्दर्शक आणि अत्यंत प्रसिद्धीपराङ्‌मुख विनम्र दानशूर माणूस!
  
जगभर पसरलेल्या मराठी माणसांच्या पुस्तकांच्या पसंतीचा लसावि काढला, तर ‘पुलं’ची पुस्तकं निर्विवादपणे अग्रभागी दिसतील! त्यांची सर्वच पुस्तकं कायमच बेस्टसेलर राहिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांतल्या आणि नाटकातल्या अनेक व्यक्तिरेखा लोकांच्या मनांत कायमच्या घर करून आहेत. ‘पुलं’चा परीसस्पर्श मिळाल्यावर आपल्या कलाकृतींना मिळणारी संजीवनी अनेकांनी अनुभवली आहे. ‘पुलं’नी कौतुक केल्यावर आधी विशेष प्रतिसाद न मिळालेली नाटकं धो धो चालल्याची उदाहरणं आहेत. ‘पुलं’नी ‘पिग्मॅलियन’चं केलेलं ‘ती फुलराणी’ हे स्वैर रूपांतर आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कलाकृती मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरली आहे. आपल्याच ‘बटाट्याची चाळ’ आणि ‘असा मी असामी’चे त्यांनी केलेले एकपात्री प्रयोग म्हणजे कुठल्याही रंगकर्मींसाठी वस्तुपाठच ठरावा. व्हिआंदेल दोझोर्त्सेवच्या मूळ रशियन नाटकाच्या इंग्लिश रूपांतरावरून त्यांनी मराठीत आणलेलं ‘एक झुंज वाऱ्याशी’ आणि सॉफक्लिझच्या मूळ ग्रीक नाटकाच्या शंभू मित्रांनी केलेल्या बंगाली अनुवादावरून त्यांनी मराठीत आणलेलं ‘राजा ओयदिपौस’ ही नाटकं मराठी समांतर रंगभूमीवर लक्षवेधी कलाकृती ठरली.
 
वयाची पन्नाशी उलटल्यावर ते ‘शांतिनिकेतन’मध्ये राहून बंगाली भाषा शिकले आणि त्यातूनच पुढे वंगचित्रे, मुक्काम शांतिनिकेतन, पोरवय यांसारखी पुस्तकं त्यांच्या लेखणीतून उतरली.

‘पुलं’ची प्रवासवर्णनं म्हणजे एक स्वतंत्र विषयच आहे. काही काही मंडळी प्रवास करून आल्यावर जी प्रवासवर्णनं लिहितात, ती बहुधा टुरिस्ट गाइड वाटतात; पण ‘पुलं’नी ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’ यांसारख्या पुस्तकांतून प्रवासात टिपलेली माणसं आणि त्यांची प्रवासातली मांडलेली धमाल ही इतरांना कुठची जमायला? त्यांच्याआधी आणि त्यांच्यानंतरही प्रवासवर्णनांना इतकी लोकप्रियता कधीही लाभली नाही.

‘पुलं’नी शब्दांत रेखाटलेली ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गुण गाईन आवडी’, ‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘आपुलकी’ यांसारखी व्यक्तिचित्रं म्हणजे पुन्हा शब्दचित्र लेखनाचा वस्तुपाठच! ‘पुलं’ मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवते झाले, ते त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमुळे! शांताबाई शेळके यांनी संपादन केलेली ‘मित्रहो’ ‘श्रोतेहो’ आणि ‘सुजनहो’सारखी ‘पुलं’ची भाषणं वाचकांना त्या आनंदांचा पुनःप्रत्यय देतात. 

‘पुलं’ हे उत्कृष्ट पर्फोर्मर असल्यामुळे त्यांची कथाकथनं तर अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेली! याशिवाय मराठी सिनेमांच्या सुवर्णकाळात त्यांनी कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन अशी कमाल अष्टपैलू कामगिरी बजावत ‘वंदे मातरम्‌,’ ‘दूधभात’ आणि ‘गुळाचा गणपती’सारख्या सिनेमांतून आपला अमीट ठसा उमटवला. त्यांनी रेडिओ आणि टीव्हीसुद्धा गाजवला. नभोवाणीसाठी ‘आकाशवाणी’ हे नाव असताना त्यांनी दूरदर्शनसाठी त्याच धर्तीवर ‘प्रकाशवाणी’ हे नाव सुचवलं होतं. 

‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार त्यांना दिला गेल्यावर त्या पुरस्काराला अधिक झळाळी लाभली असं म्हणता येईल. 

१२ जून २००० रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.

(‘पुलं’ची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link