Next
सुकन्या समृद्धी योजना
BOI
Saturday, February 24 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. मुलींच्या समृद्ध भविष्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेबद्दल आज माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
............
खाते कसे उघडता येते?

- मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षांपर्यंत हे खाते पोस्टात अगर राष्ट्रीयीकृत, तसेच मोठ्या खासगी बँकेत हे खाते उघडता येते.

-  हे खाते मुलीच्या नावाने आई/वडील अथवा कायदेशीर पालक उघडू शकतात.

-  हे खाते केवळ दोन मुलींच्याच नावाने उघडता येते; मात्र पहिली एक मुलगी असून, दुसऱ्या वेळी जुळ्या मुली झाल्या, तरच अशा तीन मुलींच्या नावाने तीन स्वतंत्र खाती उघडता येतात. थोडक्यात पहिली व दुसरी मुलगी असून, तिसरीही मुलगी असल्यास केवळ पहिल्या दोन मुलींच्या नावाने खाते उघडता येईल; मात्र तिसऱ्या मुलीच्या नावाने खाते उघडता येत नाही.

-  खाते उघडताना पालकांची केवायसी पूर्तता व मुलीच्या जन्माचा दाखला जोडावा लागतो.

- या खात्याला नामनिर्देशन करता येत नाही.

खात्याचे अन्य नियम

-  खाते उघडताना किमान एक हजार रुपये भरावे लागतात.

-   त्यानंतर किमान १०० रुपये किंवा त्या पटीत कितीही वेळा रक्कम भरता येते.

-  प्रति वर्षी किमान एक हजार रुपये खात्यात जमा करावे लागतात. एखाद्या वर्षी भरता आले नाहीत, तर खाते खंडित समजले जाते. खंडित खाते प्रति वर्षी ५० रुपये दंड आणि एक हजार रुपये किंवा त्याहून जास्त, परंतु जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरून पुनरुज्जीवित करता येते.

-  एका आर्थिक वर्षात खात्यात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात.

-  खाते उघडल्यापासून १४ वर्षे खात्यात पैसे जमा करता येतात; मात्र खात्याची मुदत वयाची २१ वर्षे किंवा वयाच्या १८व्या वर्षानंतर मुलीचा विवाह होईपर्यंत असते.

-  मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर खात्यावरील शिल्लक रकमेच्या ५० टक्के इतकी रक्कम शिक्षणासाठी काढता येते.

-   वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यावर खाते बंद करता येते; मात्र वयाच्या १८व्या वर्षानंतर लग्नासाठी म्हणून संपूर्ण रक्कम काढून खाते बंद करता येते.

-  या खात्यावर देण्यात येणाऱ्या व्याजाचा दर वेळोवेळी बाजारातील व्याजदरानुसार कमी-अधिक असणार असून, एक ऑक्टोबर २०१७पासून तो ८.३ टक्के इतका आहे. व्याजआकारणी चक्रवाढ पद्धतीने केली जाते.

-  मुलीचे गंभीर आजारपण अथवा मृत्यू या कारणास्तव खाते मुदतीपूर्वी बंद करता येते.

- पालकाच्या सोयीनुसार भारतभर खाते कोठेही वर्ग करता येते.

या योजनेतील गुंतवणुकीचे फायदे

-  गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांपेक्षा तुलनेने जास्त व्याजदर

-  गुंतवणुकीवर ‘कलम ८० सी’अंतर्गत करसवलत

- मुदती नंतरची अथवा मुदतपूर्व मिळणारी रक्कम मुलीच्या खात्यात थेट जमा होत असल्याने मिळणाऱ्या रकमेचा अन्य कारणासाठीचा विनियोग टाळला जातो.

-  खाते मुदतीनंतर बंद केले नाही, तरी नियमानुसार व्याज मिळत राहते.

-  मुलीला वयाच्या १०व्या वर्षानंतर हे खाते स्वत: चालवता येत असल्याने आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते.

- खात्यावर मिळणारी रक्कम व व्याजही ‘पीपीएफ’प्रमाणे करमुक्त आहे

 या योजनेतील कमतरता

-  कालावधी जास्त आहे.

-  मिळणारे व्याज कमी-अधिक होऊ शकते. त्यामुळे मुदतीनंतर किती रक्कम मिळेल हे कळू शकत नाही. केवळ अंदाज बांधता येतो.

-  योजना केवळ मुलींसाठीच आणि फक्त दोन मुलींसाठीच.

वरील सर्व बाबींचा विचार करता, काही त्रुटी असल्या, तरी सुकन्या समृद्धी ठेव योजना मुलींच्या शिक्षणाच्या व लग्नासाठीच्या येणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. दरमहा पाच हजार रुपये नियमितपणे १४ वर्षे भरले, तर २१ वर्षांची मुदत संपल्यावर आजच्या व्याजदराने सुमारे २७ लाख रुपये इतकी रक्कम मिळू शकेल.

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link