Next
लवकरच येतोय कपड्यांचा ‘इंडिया साइझ’
भारतीयांना नेमक्या फिटिंगचे कपडे उपलब्ध होणार
BOI
Tuesday, February 19, 2019 | 11:57 AM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : दुकाने आणि मॉलमध्ये आता लवकरच ‘इंडिया साइझ’चे म्हणजेच भारतीय लोकांच्या शारीरिक ठेवणीनुसार त्या मापांचे कपडे उपलब्ध होऊ शकणार आहेत. भारतात प्रमाणित ‘इंडिया साइझ’ निश्चित नसल्याने वस्त्रोद्योग क्षेत्राला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘इंडिया साइझ’ ठरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मार्च महिन्यात केंद्र सरकार एक गट स्थापन करणार असून, त्याद्वारे भारतीयांच्या शारीरिक ठेवणीनुसार मापे निश्चित केली जातील. हा ‘इंडिया साइझ’ भारतातील तयार कपड्यांच्या व्यवसायात आधारभूत मानला जाईल. 

‘अशा प्रकारे आकार निश्चित झाल्यामुळे भारतातील किरकोळ बाजारपेठेला चालना मिळेल. तसेच दक्षिण आशियातील लोकांनाही या ‘भारतीय साइझ’नुसार मिळणाऱ्या कपड्यांचा फायदा होईल. जे भारतीय लोक परदेशात आहेत, त्यांनाही लाभ होईल. यामुळे परदेशी कंपन्यांनाही याची दखल घ्यावी लागेल. परदेशी ब्रँडचे कपडेदेखील ‘भारतीय साइझ’मध्ये उपलब्ध होतील. मार्चपासून या संदर्भातील कार्यवाही सुरू होणार आहे,’ असे वस्त्रोद्योग सचिव राघवेंद्र सिंग यांनी सांगितले.

परदेशांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या मापांमध्ये थोडाफार बदल करून त्याचा वापर भारतातील वस्त्रोद्योगात केला जातो. त्यामुळे भारतीय लोकांना नेमके बसणारे (फिटिंग) कपडे मिळण्यात अडचणी येतात. परदेशातून आयात केलेले कपडे भारतीयांना नेमके बसत नाहीत. त्यामुळे कपडे परत करण्याचे प्रमाण २० ते ४० टक्के आहे. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रामुळे तयार कपड्यांची विक्री वाढल्याने हे प्रमाण अधिक वाढले आहे. हे भारतीय वस्त्रोद्योग व्यवसायासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. 

वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशानुसार भारतीय लोकांच्या शारीरिक ठेवणीत फरक असतो. तरीदेखील सर्वसाधारण भारतीय माणसांची उंची, जाडी यांचा विचार करून विविध वयोगटानुसार प्रमाणित मापे निश्चित करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, वस्त्रोद्योगातील ही अडचण दूर करण्यासाठी प्रमाणित ‘इंडिया साइझ’ निश्चित करण्यावर लक्ष देण्यात आले आहे. एकदा हा आकार निश्चित करण्यात आला, की त्याचा उपयोग क्रीडा, वाहन उद्योग, कला आदी विविध क्षेत्रांना होईल. या क्षेत्रांसाठी आवश्यक पोशाखनिर्मिती करताना योग्य मापाचे कपडे तयार करणे शक्य होईल.

यासाठी देशातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि ईशान्य अशा सहा भागांमधील सहा प्रमुख शहरांमध्ये थ्री डी स्कॅनर आणि संगणकाच्या साह्याने २५ हजार लोकांचे मोजमाप केले जाणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या कामात सहकार्य करणार आहे.

कपडे आयातीत भारत पाचव्या क्रमांकावर असून, या क्षेत्राची उलाढाल २०२१पर्यंत १२३ अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे.   

आतापर्यंत अमेरिका, मेक्सिको, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, कोरिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया आदी १४ देशांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील साइझिंग सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search