Next
‘मुलींना घडवण्याबद्दलचा दृष्टिकोन सुधारतोय’
BOI
Thursday, June 07, 2018 | 02:17 PM
15 0 0
Share this article:

प्रा. वासंती जोशी
पुणे : ‘कन्याकुमारी ते लेह (केटूएल) या मोहिमेत सायकलवरून मी एकटीने प्रवास करते आहे, तसेच सोबत कारमधून प्रवास करणाऱ्या सपोर्ट टीममध्ये दोन तरुणी आहेत आणि ६० वर्षांहून अधिक वयाची महिला ड्रायव्हिंग करते आहे, हे पाहिल्यावर, भेटतील त्या महिला, मुली, पुरुष खूप कौतुक करायचे. ‘आमचं आयुष्य चूल आणि मूल यात गेलं. आता आमच्या मुलींनी शिकावं, नाव कमवावं,’ अशी इच्छा स्त्रियांनी व्यक्त केलीच; पण आपल्या मुलींनी अशी साहसी कामे करावीत, अशी इच्छा पुरुषांनीही व्यक्त केली. हा बदल खूप समाधान देणारा आहे.....’ अशी भावना कन्याकुमारी ते लेह सायकल मोहिमेवर असलेल्या पुण्यातील प्रा. वासंती जोशी यांनी व्यक्त केली.

‘कन्याकुमारी ते लेह (केटूएल) मोहिमेत सहभागी प्रा. वासंती जोशी, शुभदा जोशी यांच्या समवेत (पाठीमागे उभ्या असलेल्या) केतकी जोशी व गायत्री फडणीस.
‘भीतीवर मात करा’ असा संदेश महिलांना देत २८ मेपासून केटूएल मोहिमेवर निघालेल्या प्रा. वासंती जोशी सुमारे दीड हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून पाच जून रोजी पुण्यात दाखल झाल्या. ‘एसएनडीटी’मध्ये प्राध्यापक असलेल्या वासंती जोशी (वय ५५ वर्षे) यांनी सहा जून रोजी ‘एसएनडीटी’मध्ये पुणेकरांशी संवाद साधला आणि आतापर्यंतच्या प्रवासातील काही निरीक्षणे सांगितली. त्यांच्यासोबत कारमधून प्रवास करणाऱ्या सपोर्ट टीममधील शुभदा जोशी, केतकी जोशी, गायत्री फडणीस यादेखील त्या वेळी उपस्थित होत्या. नवी ऊर्जा, शुभेच्छा घेऊन त्यांनी सात जून २०१८ रोजी आपल्या मोहिमेतील पुढील टप्प्याकडे कूच केले. 

प्रवासादरम्यान आलेले अनुभव सांगताना प्रा. वासंती जोशी म्हणाल्या, ‘आमचा बराचसा प्रवास तमिळनाडूतून झाला. तिथे शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. स्त्रिया बऱ्यापैकी स्वयंसिद्ध असल्याचे आणि त्यांचीही वेगळ्या वाटेवर जाऊन काही करण्याची इच्छा असल्याचे जाणवले. महिलांनी स्वतःला कमी समजू नये. मनातली भीती काढून टाकावी, हा संदेश देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. तो काही प्रमाणात का होईना यशस्वी होतोय, असे मिळणाऱ्या प्रतिसादावरून वाटते.’

‘महिलांनी स्वतःला कमी समजू नये. मनातली भीती काढून टाकावी, हा संदेश देणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे. कोण काय बोलेल याची चिंता बाळगू नये. जग खूप सुंदर आहे. या सुंदर जगाचा आस्वाद घेण्यासाठी, तसेच स्वतःला नव्याने शोधण्यासाठी असे प्रवास केले पाहिजेत, असे मला वाटते,’ असे प्रा. जोशी म्हणाल्या.

या प्रवासात सपोर्ट टीममध्ये सहभागी असलेल्या आणि स्वतः कार चालवत मोहिमेत सहभागी झालेल्या शुभदा जोशी (वय ६२ वर्षे) म्हणाल्या, ‘लोकांचे खूप चांगले अनुभव आले. या संपूर्ण प्रवासात आम्ही कोणतेही नियोजन केलेले नाही. हॉटेल्सचे बुकिंगदेखील आम्ही ऐन वेळी एखाद्या गावात पोहोचल्यानंतरच करतो. सायकल, गाडीची देखभाल त्यासाठी आवश्यक सोयी मिळणे, चांगले हॉटेल, जेवण मिळणे आदींसाठी लोकांनी खूप मदत केली. मुलींना, स्त्रियांना खूप कौतुक वाटते. त्या खूप प्रेमाने आम्हाला मदत करायला पुढे येतात. त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास तसा निर्विघ्नपणे पार पडला आहे. पुढचाही संपूर्ण प्रवास असाच यशस्वी होईल, अशी खात्री वाटते.’ 

सपोर्ट टीममध्ये शुभदा जोशींबरोबर वासंती जोशी यांची मुलगी केतकी आणि त्यांची माजी विद्यार्थिनी गायत्री फडणीस या दोन तरुण मुलीही सहभागी झाल्या आहेत. त्यांनीही आपले अनुभवही मनमोकळेपणे सांगितले.

केतकी म्हणाली, ‘ही मोहीम सुरू झाल्यापासून रोज न चुकता सकाळी साडेतीन वाजता गजर होतो आणि उठून, आवरून बरोबर साडेचारला निघावे लागतेच. कधी कधी पांघरुणातून बाहेर यायला नको वाटते; पण आई बरोबर साडेचारला सायकलवर स्वार होऊन चालू पडतेच. आता आम्हाला सवयही झाली आहे आणि मजाही येते आहे. आतापर्यंत खूप आरामदायी आयुष्य जगत आलो आहोत. त्यामुळे सगळे सहज व्हावे असे वाटते. अनेकदा लोकांची चुकीची वागण्याची पद्धत, दिलेली वागणूक यामुळे चिडचिड होते. अशावेळी आई आणि शुभदा मावशी खूप शांतपणे सगळे हाताळतात. त्यातून खूप शिकायला मिळते.’

गायत्री फडणीस म्हणाली, ‘हा खूप वेगळा अनुभव आहे. रोजचा दिवस वेगळा असतो. ठरवून काही करता येतेच असे नाही. सकाळी अमुक वाजता चहा हवा असेल तर तो त्याच वेळी आणि आहे त्या ठिकाणी मिळेल असे नाही. कधी पुढे जावे लागते कधी मागे यावे लागते. सहनशीलता आणि शांतपणे परिस्थिती हाताळणे हे आम्हाला प्रयत्नपूर्वक शिकावे लागले आहे. या मोहिमेमुळे आम्ही ते शिकत आहोत. तरुण रक्त असल्याने आम्ही काही वेळा चिडतो, भांडायला जातो, अशा वेळी वासंती मॅडम आणि शुभदाताई आम्हाला समजावतात. त्या शांतपणे परिस्थिती हाताळतात. यातून आम्ही शिकतो आहोत. हा आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. ही आयुष्य घडवणारी घटना आहे, यात शंका नाही.’

२८ मे रोजी कन्याकुमारीहून ही मोहीम सुरू झाली असून, ‘कॉन्करिंग फीअर’ असा संदेश या मोहिमेतून महिलांना दिला जात आहे. दररोज किमान १५० किलोमीटर सायकलिंग केले जात असून, या मोहिमेची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद होणार आहे. प्रा. वासंती जोशी या पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात अकाउंट्स विषयाच्या प्राध्यापक आहेत. महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या या संस्थेचा स्थापना दिन पाच जुलै रोजी असून, त्यांनी महिलांप्रति केलेल्या योगदानाला मानवंदना म्हणून या मोहिमेचा समारोप त्या दिवशी होणार आहे. लेहमधील उमलिंग ला या खिंडीत जाणाऱ्या त्या पहिल्या सायकलस्वार ठरणार असून, ही खिंड समुद्रसपाटीपासून १९ हजारांहून अधिक फूट उंचावर आहे. 

(या सर्वांचे अनुभव जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून. मोहिमेविषयीची संपूर्ण माहिती आणि मोहिमेपूर्वीची वासंती जोशी यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांच्या मोहिमेतील काही टप्प्यांचे व्हिडिओही सोबत देत आहोत. वासंती जोशी यांच्या मोहिमेबद्दलचे अपडेट्स मिळविण्यासाठी आणि दररोजचे अनुभव वाचण्यासाठी http://scribble.website/VasantisCycleRide/ या वेबसाइटला जरूर भेट द्या.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Neha chavan About
Mam we proud of u love u
0
0

Select Language
Share Link
 
Search