Next
भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ची सांगता
BOI
Monday, December 18 | 10:56 AM
15 0 0
Share this story

पद्मा शंकरपुणे : पासष्टाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची रविवारी (१७ डिसेंबर) सांगता झाली. गायक आणि वादक यांनी एकत्रितपणे सुरांची बरसात करत रविवारचा दिवस रसभरीत केला. पद्मा शंकर यांच्या व्हायोलिनचा स्वर, त्यानंतर कुलकर्णी पितापुत्रांनी छेडलेल्या सरोदच्या तारा व अखेरीस सतारवादनाचा सात पिढ्यांचा वारसा लाभलेले शुजात खाँ यांनी चढविलेला स्वरसाज.... त्यात भर म्हणजे या तिन्ही सादरीकरणांच्या पुढे-मागे झालेले घरंदाज गायकीचे परफॉर्मन्सेस यांनी रसिकश्रोत्यांना अक्षरशः भारून टाकले.

महेश काळेअखेरच्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक व राष्ट्रीय पुरस्कारविजेते महेश काळे यांच्या गायकीने झाली. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या महेश काळे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग ‘शुद्ध सारंग’मध्ये विलंबित झुमरा सादर केला. त्यानंतर तराणा आणि ‘बरस बीते हो तुम्हे धुंडत हूँ’ ही बंदिश त्यांनी गायली. तसेच ‘अवघे गरजे पंढरपूर’ या लोकप्रिय भजनाने रसिकांची वाहवा मिळविली. अखेरीस ‘अरुण किरणी’ हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गाणे त्यांनी ‘सवाई’ला अर्पण केले. शास्त्रीय संगीतातील तरुण चेहरा असलेले महेश काळे सादरीकरणानंतर श्रोत्यांसोबत सेल्फी घ्यायला विसरले नाहीत. त्यांच्या गायनास श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. निखिल फाटक (तबला), राजीव तांबे (हार्मोनियम), प्रल्हाद जाधव व पूजा कुलकर्णी (तानपुरा), प्रसाद जोशी (पखावज), रमाकांत परांजपे (व्हायोलिन) यांनी त्यांना साथसंगत केली. 

त्यानंतर प्रख्यात व्हायोलिनवादक व लालगुडी जयरामन यांच्या शिष्या पद्मा शंकर यांचे कर्नाटक संगीतातील सूरबद्ध व्हायोलिनवादन झाले. यंदाच्या महोत्सवातील व्हायोलिन वादनाची ही दुसरी वेळ होती. त्यांनी राग हंसध्वनीतील ‘वातापि गणपती भजेहं’ या आदितालातील रचनेने सादरीकरणास सुरुवात केली. त्यानंतर संत त्यागराज यांची राग चारुकेशीतील भक्तिरचना त्यांनी सादर केली. संत त्यागराज यांची रामाशी सुरू असलेला संवादवजा विनवणी असा त्याचा आशय होता. तसेच व्हायोलिनच्या तारांवर ‘माझे माहेर पंढरी’ हा मराठमोळा अभंग सादर करून त्यांनी वातावरण भक्तिरसाने भरून टाकले. माऊली टाकळकर यांनी टाळ वाजवीत त्यांना साथ दिली. अखेरीस राग मधुवंतीतील ‘तिल्लाना’देखील त्यांनी सादर केला. नीला वैद्य (तानपुरा), के. पार्थसारथी (मृदंग), जी. हरिहर शर्मा (खंजीरा) यांनी त्यांना साथसंगत केली. दरम्यान, मृदंगम् व खंजिरा यांच्यातील सवाल-जवाबासही प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली.

सुधाकर चव्हाणव्हायोलिनच्या स्वरवर्षावानंतर प्रसिद्ध गायक सुधाकर चव्हाण यांनी राग भीमपलास छेडत स्वरमंचाचा ताबा घेतला. प्रभाकर पांडव (हार्मोनियम), नंदकिशोर ढोरे (तबला), गंभीरमहाराज अवचार (पखावज), संदीप गुरव, नामदेव शिंदे, अनिता सुळे व दशरथ चव्हाण (तानपुरा व स्वरसाथ) आणि सर्वेश बद्रायणी (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली. 

पं. राजन कुलकर्णीप्रसिद्ध सरोदवादक पं. राजन कुलकर्णी आणि त्यांचे पुत्र आणि शिष्य सारंग कुलकर्णी यांच्या सरोदवादनाने महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या द्वितीय सत्राला सुरुवात झाली. त्यांनी राग ‘वाचस्पती’ने वादनास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सादर केलेली द्रुत त्रितालातील बंदिशदेखील श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. सुरुवातीला हळुवारपणे चाललेल्या सरोदच्या स्वरांनी जसजसा वेग घेतला, तशी रसिकांमधून टाळ्यांच्या कडकडाटास सुरुवात झाली. पं. निशिकांत बडोदेकर (तबला), ओंकार दळवी (पखावज) यांनी त्यांना सुरेख साथसंगत केली. त्यांच्या रंगलेल्या सरोदवादनाच्या जुगलबंदीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

पं. आनंद भाटेत्यानंतर किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक व पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व पं. आनंद भाटे यांचे सुरेल गायन झाले. एक गायक आणि एक वादक अशा वेळापत्रकामुळे रसिकांनाही विविधता अनुभवता आली. त्यांनी राग ‘यमन कल्याण’ सादर करून आरंभ केला. त्यानंतर मैफलीच्या अखेरीस त्यांनी सादर केलेल्या ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या भजनास श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. एवढेच नव्हे, तर त्यांचे गायन संपल्यावर सर्व रसिकांकडून उत्स्फूर्तपणे उभे राहून त्यांना मानवंदनादेखील मिळाली. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), विनय चित्राव व मुकुंद बाद्रायणी (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली. 

उस्ताद शुजात खाँशेवटच्या दिवसातील तंतुवाद्यांच्या मालिकेतील सर्वोच्च बिंदू शेवटच्या टप्प्यातील  यांच्या अप्रतिम सतारवादनाने गाठला. सादरीकरणाच्या अगदी प्रारंभीच आयोजकांचे आभार मानत असताना ‘श्रोते हेच खरे देव आहेत,’ असे म्हणत कलाकार म्हणून त्यांचा असलेला मोठेपणा त्यांनी दाखवून दिला. इमदाद खान यांच्या घराण्यातील सातव्या पिढीतील सतारवादक असलेले उस्ताद शुजात खाँ हे विलायत खाँ यांचे सुपुत्र आहेत. राग झिंझोटीच्या तारा छेडत सतारीवर त्यांची बोटे बेमालूमपणे फिरू लागली. आधी एकल वादन करत स्वरबरसात केल्यानंतर तबल्याच्या साथीने रसिकांना अक्षरशः मोहिनी घातली. मुकेश जाधव व अमित चौबे यांनी त्यांना तबल्यावर साथ केली. शेवटच्या टप्प्यात उस्ताद शुजात खाँ यांनी अमजद इस्लाम अमजद यांची ‘कहा आके रुकने थे ये रास्ते’ ही कविता सतारच्या साथीने गात रसिकांना मोहिनी घातली.

डॉ. प्रभा अत्रेपाच दिवस रंगलेल्या या महोत्सवाचा समारोप प्रथेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग ‘जोगकंस’ आपल्या गायनातून उलगडला. ‘जगत जननी भवतारिणी’ या भैरवीने त्यांनी समारोप केला. माधव मोडक (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), आरती ठाकूर-कुंडलकर, चेतना बनावत, डॉ. अतींद्र सरवडीकर, अश्विनी मोडक (तानपुरा व स्वरसाथ) यांनी त्यांना साथसंगत केली. त्यानंतर सवाई गंधर्वांच्या आवाजातील ध्वनिफीत ऐकवून महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

(महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या सादरीकरणाची झलक दर्शविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link