नवी दिल्ली : मोबिक्विकने बजाज फिनसर्व्हसोबत भागीदारी करत, आपल्या अॅपवर किमान पाच हजार रुपयांचे कर्ज त्वरित उपलब्ध करण्याची सेवा दाखल केली आहे. मोबिक्विकचे हे अशाप्रकारचे पहिले पत वितरण उत्पादन असून, देशामधील लाखो नवीन कर्ज (एनटीसी) ग्राहक; तसेच लहान व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.बिलभरणा, कॅब बिल; तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यापाऱ्यांना पेमेंट सारख्या विविध प्रकारच्या पेमेंटसाठी ही कर्ज सुविधा उपयुक्त ठरू शकते.
याबाबत बोलताना, मोबिक्विकच्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘लहान रकमेसाठी त्वरित कर्ज सेवा देण्याच्या क्षेत्रात प्रचंड संधी आहे. या वर्षी स्मार्टफोन युजरचे प्रमाण अंदाजे १६ टक्क्यांनी, तर ऑनलाईन व्यवहारकर्त्यांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही यापूर्वीच देशभरामध्ये लाखो ग्राहकांसाठी साडेतीन हजार कोटींची कर्जे मंजूर केली आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, ‘बजाज हा मोबिक्विकसाठी महत्त्वपूर्ण भागीदार आहे. मागच्या वर्षी मोबिक्विक आणि बजाज फिनसर्व्हने धोरणात्मक भागीदारीमध्ये प्रवेश केला होता. या भागीदारीअंतर्गत बजाज फायनान्स लिमिटेडद्वारे मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘बजाज फिनसर्व्ह वॉलेट’ मोबाईल ॲप सुरू केले होते. बजाज फिनसर्व्ह वॉलेट हे डिजिटल ईएमआय कार्डसोबत येते. त्यामुळे ग्राहकाला कार्ड सोबत ठेवणे गरजेचे नसते.’