Next
दिवाळीतील फटाक्यांमुळे पाळीव प्राण्यांवर ‘संक्रांत’ नको
योग्य ती काळजी घेण्याचे पशुवैद्यकांचे आवाहन
प्रशांत सिनकर
Monday, November 05, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : दिवाळीतील फटाक्यांमुळे माणसाला, पर्यावरणाला होणाऱ्या त्रासांची यादी मोठी आहे. पाळीव प्राणीही त्या त्रासातून सुटत नाहीत. कुत्र्या-मांजरांचे कान अत्यंत संवेदनशील असल्याने फटाक्यांच्या कर्कश आवाजांमुळे त्यांना कायमचे बहिरेपण येऊ शकते. तसेच, रात्री फोडलेल्या फटाक्यांचा धूर सकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा अथवा श्वसनविकार होण्याचा धोका वाढतो. हे लक्षात घेऊन पाळीव प्राण्यांची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन पशुवैद्यकांनी केले आहे. 

दिवाळीतील फटाक्यांमुळे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होते. हे माहिती असले, तरी फटाके फोडणे काही कमी होत नाही. फटाक्यांच्या आवाजाचा त्रास जसा माणसांना होतो, तसाच किंबहुना जास्त त्रास कुत्रा-मांजर अशा प्राण्यांना होतो. २० हर्टझ् ते २० किलोहर्टझ् या वारंवारितेचा ध्वनी माणूस ऐकू शकतो. कुत्रे मात्र २० किलोहर्टझ् ते १०० किलोहर्टझ् क्षमतेचे ध्वनीही ऐकू शकतात. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाने त्यांना बहिरेपणा येण्याचीही शक्यता असल्याची माहिती मायव्हेट्स चॅरिटेबल ट्रस्टचे पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. युवराज कागिनकर दिली. 

सध्या रात्री हळूहळू गारठा पडू लागला आहे. या गारव्यात फटाक्यांचा धूर प्राण्यासाठी घातक ठरतो. रात्री फोडलेल्या फटाक्यांचा धूर खालीच राहतो. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासाठी आणले जाते. त्या वेळी हा धूर श्वसनाद्वारे कुत्र्यांच्या शरीरात प्रवेश करतो. या धुरामुळे कुत्र्यांना श्वसनविकार अथवा दमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत कुत्र्यांना बाहेर फिरवण्याचे शक्यतो टाळावे. त्यांच्या फिरवण्याच्या वेळा बदलाव्यात. फटाक्यांचा आवाज घरात येत असल्यास घराची दारे-खिडक्या बंद कराव्यात. या दिवसांत कुत्र्यांना पिण्यासाठी भरपूर पाणी द्यावे, असे डॉ. कागिनकर यांनी सांगितले. पाळीव कुत्रे घाबरून जाऊन खाणे-पिणे कमी करतात. त्याकडे लक्ष ठेवावे.

रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या शेपटीला फटाके बांधून फोडण्याचे प्रकारही काही जण करतात; मात्र असे फटाके फोडणे कुत्र्यांसाठी घातक ठरू शकते. आवाजामुळे कावराबावरा झालेला कुत्रा वाहनाच्या खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपला आनंद दुसऱ्यांच्या जिवावर उठू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे फटाकेमुक्त दिवाळीचा उपक्रम राबवला जातो. त्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search