Next
तुमच्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय केले?
या प्रश्नाचे उत्तर देणारी वेबसाइट विकसित; मतदारांना सजग करण्यासाठी पुण्यातील परिवर्तन संस्थेचा उपक्रम
BOI
Monday, April 01, 2019 | 05:14 PM
15 1 1
Share this article:

पुणे : मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा प्राण असल्याने मतदार सजग असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आपण निवडून दिलेल्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत नेमके काय काय केले, याची वस्तुनिष्ठ माहिती मतदारांना मिळण्यासाठी पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. देशातील सर्व खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ या संस्थेने तयार केले असून, ते वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे. या वेळचा खासदार निवडताना नागरिकांना त्या माहितीचा चांगला उपयोग होणार आहे. 

खासदारांच्या कामाबद्दलची माहिती लोकसभा, तसेच अन्य सरकारी वेबसाइट्सवर उपलब्ध असते; मात्र त्या आकडेवारीचे विश्लेषण करून नेमक्या, सहज कळेल अशा आणि सहज शोधता येईल, अशा स्वरूपात ती माहिती मांडण्याचे काम ‘परिवर्तन’ टीमने केले आहे. देशातील सर्व खासदारांबद्दलची ही माहिती http://khasdar.info/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत सरकारी स्रोतांकडून माहिती घेतलेली असल्याने ती निश्चितच विश्वासार्ह आहे.

ही माहिती या वेबसाइटवर मिळेल...
- लोकसभेतील प्रत्येक खासदाराची उपस्थिती किती...
- किती प्रश्न विचारले...
- कायदे, लोकहिताचे प्रश्न यांबद्दलच्या किती चर्चांमध्ये सहभाग घेतला.
- लोकसभेत खासदार या नात्याने स्वतंत्रपणे किती विधेयके मांडली...
- प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर विकासकामे करण्यासाठी दर वर्षी पाच कोटी रुपयांपर्यंत निधी वापरता येतो. त्यापैकी किती निधीचा वापर प्रत्येक खासदाराने केला आहे...
- महाराष्ट्राच्या खासदारांनी हा निधी नेमक्या कोणत्या प्रकारच्या कामांसाठी वापरला आहे...
- देशभरात गेल्या पाच वर्षांत कोणत्या प्रकारच्या कामांसाठी किती टक्के निधी वापरला गेला आहे...

पुणे महानगरपालिकेच्या २०१२पासून ही संस्था सातत्याने रिपोर्ट कार्ड हा उपक्रम राबवत आहे. आता देशपातळीवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. 

‘गेला सव्वा महिना ‘परिवर्तन’चे कार्यकर्ते आपापले शिक्षण-नोकरी-व्यवसाय सांभाळून या प्रकल्पाच्या कामात झोकून देऊन काम करत होते. हे सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक असून, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने काम करतात. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे,’ असे प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर यांनी म्हटले आहे. ‘यामध्ये कोणाची बदनामी करणे हा उद्देश नसून, प्रत्येक खासदाराने केलेल्या कामाची माहिती लोकांना मिळावी, हाच हेतू आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माहिती संकलन आणि तपासणीच्या कामात सायली दोडके, कल्याणी थिगळे, अमृता नागटिळक, हर्षद महाबळेश्वरकर, सई उपळेकर, अनिकेत राठी, अशोक सुलोचना गणपत, अभिषेक कर्वे, अवनी वेले, हृषीकेश कर्वे, अनिश गोळे यांचा सहभाग होता. दीपक टावरी यांनी वेबसाइट तयार केली. खासदार रिपोर्ट कार्ड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियामधून प्रसाराचे काम दीपक बाबर, अनिकेत मुंदडा, अनिकेत राठी आणि अवनी वेले यांनी केले.  

‘या प्रकल्पात सहभागी होण्याविषयीचे आवाहन आम्ही फेसबुकवर केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विशाल सूर्यवंशी, सुमित डोळे, तेजस आमडेकर, कैवल्य जोशी, मयूर बागुल, स्वप्नील इंदलकर, निनाद इंदापूरकर, रमेश कपले, निहार थत्ते, आशुतोष बाफना या सर्वांनी माहिती संकलनात यथाशक्ती हातभार लावला,’ असेही अभ्यंकर यांनी वेबसाइटवर म्हटले आहे. 

या वेबसाइटवरील काही महत्त्वाचे मुद्दे : 

- लोकसभेतील चर्चांमध्ये सर्वांत सहभागी होणारे महाराष्ट्रातील खासदार : श्रीरंग बारणे (मावळ)
- सर्वाधिक स्वतंत्र विधेयके मांडणारे महाराष्ट्रातील खासदार : शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर)
- सर्वाधिक उपस्थिती असलेले महाराष्ट्रातील खासदार : अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
- सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार : सुप्रिया सुळे (बारामती), ११९२ प्रश्न विचारले
- प्रश्न विचारणाऱ्या टॉप टेन खासदारांपैकी आठ खासदार महाराष्ट्रातील
- डॉ. कलामणि सामल (बिजू जनता दल, ओडिशा), रमेश कौशिक (भाजप, हरियाणा), भैरोप्रसाद मिश्रा (भाजप, उत्तर प्रदेश) या खासदारांची लोकसभेतील उपस्थिती १०० टक्के

प्रत्येक खासदाराबद्दलच्या अशा प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी खासदार डॉट इन्फो या वेबसाइटला भेट द्यावी आणि पुढच्या वेळचा खासदार निवडताना ही माहिती जरूर लक्षात घ्यावी, असे आवाहन ‘परिवर्तन’तर्फे करण्यात आले आहे. 

(प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 160 Days ago
Read this before deciding whom to vote for . There is no excuse now , To say -- I did not know , nobody told me O
0
0
Bal Gramopadhye About 167 Days ago
Excellent idea . I hope , other states take it up . Best wishes .
0
0

Select Language
Share Link
 
Search