Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आरोग्यविषयक कार्यशाळा
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this storyऔंध : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या विद्यमाने महाविद्यालयात एक दिवसीय आरोग्यविषयक कार्यशाळा घेण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दंतआरोग्य चिकित्सक डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. राहुल मनियार, डॉ. सोनाली सर्वदे, भाग्यश्री कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. घाणेकर म्हणाल्या, ‘व्यक्तिमत्व विकासासाठी दात अत्यंत महत्त्वाचे असतात. रोजच्या जगण्यात आपण दातांचा वापरत करत असतो. अन्न खाताना दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात. पर्यायाने त्याचे अॅसिड आम्लात रूपांतर होते. त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण काही नियम पाळणे गरजेचे आहे. आपण दररोज सकाळी व रात्री ब्रश करावा; तसेच काही खाल्ल्यास पाण्याने चूळ भरावी. अती चिकट, गोड पदार्थ व थंड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. दररोज पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. वर्षातून एकदा दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्यावी, तरच आपल्या दातांचे आरोग्य चांगले राहील.’डॉ. मणियार यांनी तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘तंबाखूच्या सेवनामुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) वाढतो. मधुमेह जडतो, मोतीबिंदू होतो, केस गळतात, टीबी होतो; तसेच माणसाचे आयुर्मान कमी होते. यामुळे तंबाखू खाऊ नये. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये. सिगारेट, बिडी, पान मसाला या आणि इतर पदार्थांचे सेवन करू नये. सर्व विद्यार्थ्यांनी निर्धार करावा, की मी व्यसन करणार नाही आणि व्यसन करू देणार नाही.’  

डॉ. सरोदे यांनी मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन केले. कुलकर्णी यांनी कवितांचे गायन करून कवितांच्या माध्यमातून स्त्रीच्या जीवनातील अनेक सुख दुःखाच्या क्षणांना हळुवारपणे स्पर्श केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘सावित्रीबाई फुले यांच्या बलिदानामुळे आज अनेक स्त्रिया सन्मानाने जीवन जगत आहेत. आज सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी उंच भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन महाविद्यालयातील युवतींनी आणि युवकांनी समाजकार्य करावे.’  

या वेळी डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. मयूर माळी, डॉ. संजय नगरकर, प्रा. सुप्रिया पवार, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तानाजी हातेकर यांनी केले. डॉ. विलास सदाफळ यांनी आभार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link