Next
स्टार खेळाडू हवा की सांघिक खेळ?
BOI
Friday, June 22, 2018 | 12:15 PM
15 0 0
Share this storyवर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. त्यांचं सगळं गणित जर-तरच्या समीकरणांवर अवलंबून आहे. लिओनेल मेस्सीसारखा महान फुटबॉलपटू ज्या संघात आहे, त्या संघाला स्पर्धेतून अशी एक्झिट घ्यावी लागतेय, याचं वाईट वाटतंय. अर्थात बड्या संघांच्या स्पर्धेतील या अवस्थेला तेच जबाबदार आहेत. ‘नाचू फुटबॉलचे रंगी’ या सदरातला हा पुढचा लेख... 
...........
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य संघ फारशी चांगली सुरुवात करू शकले नाहीत. त्याचं कारण, छोट्या संघांनी केलेली चांगली तयारी आणि मोठ्या संघांचं स्टार खेळाडूंवर असणारं अवलंबित्व. मेक्सिको, रशिया, इराण यांसारख्या संघांनी दाखवलेलं टीम वर्क बड्या संघांमध्ये दिसलंच नाही. नवख्या संघांसारखा सांघिक खेळ या संघांनी दाखवला असता, तर साखळी सामन्यांचं चित्र वेगळं असतं.

नेमारब्राझीलचा नेमार, अर्जेंटिनाचा मेस्सी, पोर्तुगालचा रोनाल्डो, इजिप्तचा मोहम्मत सलाह, जर्मनीचा थॉमस म्युलर, हे खेळाडू म्हणजेच त्यांचा संघ, असं जणू समीकरण असतं. या सगळ्यांचा खेळ अतिशय लाजवाब आहे. ते स्टाइल आयकॉन आहेत. तरुण-तरुणी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. युरोपमधील क्लबमध्ये होणाऱ्या लीग सामन्यांमध्ये हे सगळेच खेळाडू चांगले खेळतात. मग त्यांची जादू वर्ल्ड कपमध्ये कुठं नाहीशी होते ते कळत नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूंनी आतापर्यंत तशी निराशाच केलीय. ख्रिस्तियानो रोनाल्डो वगळला, तर कोणी फार मोठी कमाल दाखवू शकलेला नाही. त्यातही रोनाल्डोचे गोल कॉर्नर, फ्री किक किंवा पेनल्टीवर आहेत. प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी भेदण्यासाठी चाल रचून तीन-चार खेळाडूंना चकवा देत, परफेक्ट पास देऊन डोळ्याचे पारणे फेडणारा गोल पाहण्यासाठी फुटबॉल शौकीन आतुर झाले आहेत. या खेळाडूंकडून तसा खेळ पहायला मिळेल, अशी अपेक्षा होती, अजूनही आहे.

युरोपमधील क्लबमध्ये एका संघात दर्जेदार खेळाडूंची मांदियाळी असते; पण या लीगमध्ये उत्तम खेळ करणाऱ्या स्टार खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये देशाला विजय मिळवून दिल्याची उदाहरणं मोजकीच असतील. इंग्लंडचे वेन रूनी आणि डेव्हिड बेकहॅम ही त्याचीच उदाहरणं. या दोन खेळाडूंना क्लब सामन्यांमधून प्रचंड ग्लॅमर मिळालं. त्यांचा खेळही चांगला होता. वर्ल्ड कपमध्ये मात्र दोघेही देशासाठी फारसं काही करू शकले नाहीत. क्लबकडून खेळताना संघाच्या प्रत्येक पोझिशनला बेस्ट फुटबॉल खेळाडू असतो. क्लब त्यासाठी हवे तेवढे पैसे ओतायला तयार असतात. त्यामुळं पुढचा खेळ सोपा होतो. एकट्या बार्सिलोनाचं उदाहरण घ्यायचं झालं, तर त्यांच्याकडे लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना), इनेस्टा (स्पेन), कौटिन्हो (ब्राझील) आणि लुइस सुआरेझ (उरुग्वे) असे चार आघाडीचे खेळाडू आहेत. त्यामुळं अर्थातच क्लबचा आणि मेस्सीचा खेळ उठून दिसतो. हेच चार खेळाडू त्यांच्या देशाच्या संघातून खेळतात, तेव्हा त्यांची ताकदच विभागली जाते.

क्लबकडून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांमुळे हे खेळाडू तिकडे आकर्षित होतात. इथं प्रश्न येतो व्यावसायिकतेचा. आपल्या क्रिकेटमध्ये काही वर्षांपूर्वी ‘आयपीएल’च्या ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळणाऱ्या लसिथ मलिंगाला श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं कसोटी सामन्यासाठी गृहीत धरलं होतं. त्या मालिकेमुळे मलिंगाला आयपीएल स्पर्धा खेळता येणार नव्हती. त्यानं थेट कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून स्वतःची सुटका करून घेऊन देशापेक्षा पैशाला प्राधान्य दिलं.

म्युलरलिव्हरपूल क्लबकडून खेळणारा इजिप्तचा मोहम्मद सलाह आणि ब्राझीलचा नेमार हे दोघेही क्लब लीग खेळताना जखमी झाले आहेत. यात मोहम्मद सलाह वर्ल्ड कपमध्ये उरुग्वेविरुद्धचा पहिला सामना खेळूच शकला नाही. रशियाविरुद्ध त्यानं एक गोल केला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नेमार तर आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू आहे. पॅरिस सेंट-जर्मन या क्लबकडून तो खेळतो. त्याला १९८ मिलियन युरो देऊन या क्लबनं बार्सिलोनाकडून विकत घेतलंय. तोही जखमी अवस्थेतच पहिल्या सामन्यात मैदानावर उतरला. खेळात अपेक्षित ऊर्जा नव्हती. या सामन्यात ब्राझीलला ‘ड्रॉ’वर समाधान मानावं लागलं. आता घोट्याच्या दुखापतीमुळं नेमार पुन्हा त्रस्त आहे. त्यामुळं तो पुढचे सामने खेळू शकेल की नाही, अशी शंका उपस्थित होतेय.

तिकडे पोर्तुगालचा स्टार खेळाडू  ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल आहेत. त्यानंच पोर्तुगालला या वर्ल्ड कपमध्ये अक्षरशः तारलंय. स्पेनविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यानं मारलेल्या फ्री किकचं प्रचंड कौतुक होतंय. व्हायलाही हवं; पण रोनाल्डो बाजूला केला, तर पोर्तुगालचा संघ साखळी फेरी तरी पार करू शकेल की नाही, याची शंका आहे. स्पेनकडून दोन सामन्यांत चार गोल झालेत. त्यातील दोन गोल दिएगो कोस्टानं केले. त्यातलाही एक गोल प्रतिस्पर्ध्याच्या पायाला लागून कोस्टाकडे आला होता. म्हणजे तिथं पुन्हा नशिबाची साथ.

फुटबॉल हा मुळात सांघिक खेळ. तो सांघिक पद्धतीनेच पाहायला आवडतो. बहुतेकदा संघ केवळ त्यांच्या स्टार खेळाडूंवर विसंबून असतात. त्यांचे प्रशिक्षकही या खेळाडूंच्याच प्रेमात असतात. मग, संघबांधणी कुठेतरी बाजूला राहते. मैदानावर एकट्या खेळाडूचा नव्हे, तर संघाचा खेळ होणं महत्त्वाचं असतं. अन्यथा एकट्या खेळाडूच्या जिवावर विजय अशक्य असतो. गेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आपण पाहिलं होतं, की जर्मनी एक संघ म्हणून मैदानात होती, तर अर्जेंटिना फक्त मेस्सीवर अवलंबून होती. यात संघच जिंकला. या खेळात निकाल संघाचाच लागत असतो. त्यामुळं खेळाडू चांगला खेळला आणि संघ विजयी झाला, असा खेळ पुढच्या काही दिवसांत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा करू या.

- रविराज गायकवाड
ई-मेल : rg.raviraj@gmail.com

(लेखक कोल्हापूर येथील मुक्त पत्रकार असून, क्रीडा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘नाचू फुटबॉलचे रंगी’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/AYA3iS या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link