Next
पुणेकरांनी अनुभवला शून्य सावलीचा दिवस; विदर्भात २४ ते २८ मेदरम्यान अनुभवता येणार
BOI
Tuesday, May 14, 2019 | 04:14 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
पृथ्वीवरील कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या मधल्या भागात राहणाऱ्यांना वर्षभरात दोनदा घेता येणारा रोमांचकारी अनुभव म्हणजे शून्य सावलीचा दिवस. या दिवशी सूर्य बरोबर डोक्यावर येत असल्याने सावली बरोबर पायाखाली पडते. थोडक्यात, त्या दिवशी काही काळापुरती सावली साथ सोडते. पुणेकरांनी १४ मे २०१९ रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी हा अनुभव घेतला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी हा अनुभव घेता येणार आहे.

पुण्यातील टिळक रोडवरील ज्योतिर्विद्या परिसंस्थेने या घटनेच्या निरीक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. तसेच दुर्बिणीतून सौर डाग पाहण्याची संधीही पुणेकरांना या वेळी मिळाली. पृथ्वीचा आस २३.५ अंशांत कललेला आहे. त्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन या घटना घडतात. त्यामुळेच पृथ्वीच्या फिरण्यानुसार सूर्य विषुववृत्तापासून उत्तरेकडे २३.५ अंश आणि दक्षिणेकडे २३.५ अंशांपर्यंत गेल्याचा अनुभव घेता येतो. एखाद्या अंशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशाचे अंतर जुळल्यावर शून्य सावलीची घटना घडते. त्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येत असल्याने कोणत्याही उभ्या वस्तूची सावली थेट पायाखाली पडते. यालाच झीरो शॅडो डे (शून्य सावलीचा दिवस) असे म्हणतात. 

पृथ्वीवर विषुववृत्तापासून कर्कवृत्त आणि मकरवृत्तापर्यंतच्या भागात राहणाऱ्यांनाच ही घटना वर्षातून दोनदा (सूर्य उत्तरेकडे जाताना आणि दक्षिणेकडे जाताना) अनुभवता येते. महाराष्ट्रात साधारणतः एप्रिल-मे महिन्यात आणि जुलै-ऑगस्टमध्ये हा अनुभव घेता येतो. यंदा विदर्भात २४ ते २८ मे या कालावधीत झीरो शॅडो डे अनुभवता येणार आहे. 

शून्य सावली दिवसाबद्दल जनजागृतीसाठी ‘अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’च्या जनजागृती समितीने एक विशेष अॅप तयार केले आहे. कोणत्या भागात शून्य सावलीची घटना कधी अनुभवता येईल, याची नेमकी माहिती तेथे मिळू शकेल. 

(‘झीरो शॅडो डे’बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे सागर गोखले यांनी दिलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओत..)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search