Next
‘जीजीपीएस’मध्ये कला व पुस्तक प्रदर्शन
BOI
Thursday, February 28, 2019 | 02:17 PM
15 0 0
Share this article:

वाया जाणाऱ्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कल्पक वस्तू.

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेत अरुअप्पा जोशी यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त कला व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन २६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २६ फेब्रुवारीला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंदार गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, प्राथमिक विभागाच्या प्रमुख विजया पवार, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सविता वझे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक चव्हाण यांनी गाडगीळ यांचे स्वागत केले. शाळेच्या सभागृहात भरविण्यात आलेल्या कला प्रदर्शनावेळी शाळेच्या गुरुकुल, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक या तीन विभागांच्या हस्तलिखित वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले; तसेच शाळेकडून पालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरणही या वेळी करण्यात आले.

मुले आणि शिक्षकांनी लिहिलेल्या  हस्तलिखित वार्षिकांकाचे प्रकाशन करताना विश्वेश टिकेकर, प्रतापसिंह चव्हाण, मंदार गाडगीळ, विजया पवार, सविता वझे आणि अपर्णा जमादार

कला प्रदर्शनात पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून सुंदर अशा विविध वस्तूंची निर्मिती केली होती. यात प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळण्यात आला होता. रंगीत कागद, कापड, करवंटी, पुठ्ठा, कापूस, पेन्सिल, टिकल्या, आइस्क्रिमच्या-आगपेटीच्या काड्या यांपासून अतिशय कल्पक वस्तू तयार करत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविले. प्रदर्शनाच्या मध्यभागी पु. ल. देशपांडे यांना आदरांजली म्हणून ट्युलिप गार्डन साकारण्यात आले होते. या बागेच्या मधोमध ‘पुलं’ची हार्मोनियम, तंबोरा, त्यांच्या पुस्तकांची नावे असलेली प्रतीकात्मक पुस्तके यांची केलेली मांडणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

शाळेतर्फे आयोजित स्पर्धांतील विजेत्या पालकांचा सत्कार करताना मान्यवर

दरम्यान, शाळेच्या ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी मुलांनी शाळेसाठी दान केलेली, तसेच शाळेने स्वतः खरेदी अनेक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती. या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन केले.

पु. ल. देशपांडेंना आदरांजली म्हणून साकारण्यात आलेले ट्युलिप गार्डन पाहताना मान्यवर

या प्रसंगी बोलताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक गाडगीळ म्हणाले, ‘विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे कलागुण असतात आणि आपण त्यांना प्रोत्साहित केले, तर ते त्यांच्या कलांचे सुंदर प्रकारे सादरीकरणही करू शकतात हे प्रदर्शन बघितल्यावर लक्षात आले. वाया जाणाऱ्या अनेक वस्तूंचा कल्पकतेने वापर करत त्यांनी सुंदर निर्मिती केली आहे. पुलवामातील शहिदांचे छोटेखानी स्मारक सुरुवातीलाच उभारण्यात आले आहे. त्याला वंदन करूनच या प्रदर्शनाची सुरुवात होते. यातून राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांनी दाखविली आहे.’

या वेळी शिक्षक व मुख्याध्यापकांचे विशेष कौतुक गाडगीळ यांनी केले. अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शाळेला उच्च स्थानावर नेण्याचे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नववीतील विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेली चित्रे

मुख्याध्यापक चव्हाण म्हणाले, ‘जीजीपीएस ही इंग्रजी माध्यमाची शाळा असली, तरी आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये भारतीय संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. गणेशोत्सवात विद्यार्थी शाळेत पर्यावरणपूरक गणपती साकारतात त्याचीच पूजा करून शाळेत हा उत्सव साजरा केला जातो. केवळ ९५ टक्के, ९८ टक्के गुण म्हणजे शिक्षण नव्हे. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सर्वच शिक्षक विशेष लक्ष पुरवितात. इथले सर्व कर्मचारी अतिशय चांगले, प्रामाणिक आणि मेहनती आहेत. दर वर्षी मुले शैक्षणिक, क्रीडा, कला क्षेत्रात प्राविण्य मिळवून वेगवेगळ्या पातळींवर चमकतात. पालकांचेही उत्तम सहकार्य आम्हाला मिळत असते. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून हसत खेळत शिक्षणाचा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असतो.’

प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेण्याऱ्या शिक्षिकांसमवेत विजया पवार

कला व पुस्तक प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक चव्हाण आणि प्राथमिक विभाग प्रमुख पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका शिल्पा प्रभू, कलाशिक्षिका अपर्णा जमादार, मयुरी गाडगीळ, गायत्री साळवी, नेहाली पवार, कलाशिक्षक विश्वेश टिकेकर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

(मंदार गाडगीळ व प्रतापसिंह चव्हाण यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search