Next
चित्रपट म्हणजे बारकाईने पाहण्याची गोष्ट
चित्रपट समीक्षक सुहास किर्लोस्कर यांनी दिला कानमंत्र
BOI
Saturday, June 29, 2019 | 04:27 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘चित्रपट ही डोके बाजूला ठेवून पाहण्याची नव्हे, तर बारकाईने पाहण्याची गोष्ट आहे. कारण ती टीमवर्कमधून उभी राहिलेली गोष्ट असते. पार्श्वसंगीतापासून कॉश्च्युम डिझायनिंगपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतून प्रेक्षकाला अनेक गोष्टी सांगितल्या जात असतात. बारकाईने पाहिल्या, तरच या गोष्टी समजतात,’ असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी २९ जून रोजी रत्नागिरीत केले. 

रत्नागिरी फिल्म सोसायटी आणि रमेश कीर कला अकादमी या संस्थांच्या वतीने ‘चित्रपट रसग्रहण : प्रात्यक्षिक, अनुभव आणि चर्चा’ हा कार्यक्रम २९ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, तसेच मोजके चित्रपटप्रेमी रसिक, अभ्यासक उपस्थित होते. 

सुरुवातीला ‘घड्याळांचा दवाखाना’ नावाची १० मिनिटांची शॉर्टफिल्म दाखवण्यात आली. ‘चित्रपटातील प्रत्येक दृश्याला काही ना काही तरी अर्थ असतो, त्यातून दिग्दर्शकाला काही सांगायचे असते आणि पूर्णपणे लक्ष देऊन पाहिले आणि ऐकले तर त्या गोष्टी कळतात. त्यातून पुढच्या काही गोष्टींचे ‘क्लूज’ही मिळतात,’ असे किर्लोस्कर यांनी सांगितले. दाखवलेल्या शॉर्ट फिल्ममधील दृश्यांबद्दल या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली आणि किर्लोस्कर यांनी त्या फिल्मचे बारकावे सांगितले. 

सुहास किर्लोस्कर यांचे स्वागत करताना डॉ. नितीन चव्हाण

श्रीराम राघवन या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये किर्लोस्कर यांनी सांगितली. ‘प्रेक्षकाने चित्रपट पाहताना चित्रपटातील कोणाच्या भूमिकेचे बोट धरून चालायचे असते हे दिग्दर्शक ठरवत असतो. त्यातून दिग्दर्शकाचे कौशल्य दिसते. हिरो, हिरॉइन, व्हिलन ही सगळी आपण त्या व्यक्तिरेखांना दिलेली नावे असतात; पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या भूमिकेला वेगवेगळ्या शेड्स असू शकतात/असतात. कारण प्रत्येक माणूस सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. त्यामुळे चित्रपट पाहताना विविध बाजूंनी भूमिका समजून घ्यायची असते,’ असे किर्लोस्कर म्हणाले.  

श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘अंधाधुन’ हा चित्रपट या वेळी दाखविण्यात आला. चित्रपटाच्या सुरुवातीला, मध्यंतरात आणि शेवटीही या चित्रपटावर चर्चा करण्यात आली. चित्रपटाच्या सुरुवातीच्या सशाच्या शिकारीच्या दृश्याला विशेष अर्थ का आहे, त्याचा आयुष्मान खुराणाच्या भूमिकेशी कसा संबंध आहे, तब्बूने रंगविलेल्या व्यक्तिरेखेला प्रत्येक वेळी काळ्या रंगाचे कपडे का देण्यात आले आहेत, चित्रपटातील पियानोवादनाचे वैशिष्ट्य, ते खरे वाटण्यासाठी आयुष्मान खुरानाने तीन महिने घेतलेले विशेष प्रशिक्षण, चित्रपटात वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असलेले क्लूज, त्यांचा अर्थ अशा अनेक बारीकसारीक तपशीलांबद्दल सांगून किर्लोस्कर यांनी चित्रपट पाहण्याचा, समजून घेण्याचा एक नवा दृष्टिकोन उपस्थितांना दिला. (‘अंधाधुन’ या चित्रपटाबद्दलचा हर्षद सहस्रबुद्धे यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन असे समजले जाते; मात्र तसे नाही. ती बारकाईने पाहण्याची, समजून घेण्याची गोष्ट आहे,’ असे त्यांनी सांगितले.  

अलीकडच्या चित्रपटांमधील गाणी एकसुरी होत आहेत का, असा प्रश्न उपस्थितांमधून त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘अलीकडच्याही अनेक चित्रपटांमधील गाणी चांगली आहेत. गुलजार, जावेद अख्तर यांच्यासारखे गीतकार आजही गाणी लिहीत आहेत. फक्त पूर्वी रेडिओवरून गाणी सातत्याने ऐकली जाण्याचे प्रमाण मोठे होते. अलीकडे केवळ नवा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी स्पॉन्सर्ड गाणीच केवळ एफएम किंवा रेडिओवर लावली जातात. त्यामुळे ती जास्त वेळा ऐकली जात नाहीत. जास्त वेळा तुम्ही गाणी ऐकून पाहिलीत, तर त्यांची आवड निर्माण होते, हे लक्षात येईल,’ असे किर्लोस्कर म्हणाले.

नव्या पिढीतील तरुणांना करिअर म्हणून वेबसीरिजचा पर्याय चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध भाषांतील सबटायटल्स करण्याच्या कामातही संधी असून, त्यासाठी विविध भाषांवर प्रभुत्व असणे कसे आवश्यक आहे, हे त्यांनी सोदाहरण सांगितले. ‘ज्यांना चित्रपटांचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉनसारख्या माध्यमांवर वेगवेगळे, नवनवे प्रयोग केलेले चित्रपट बारकाईने पाहावेत. काही चित्रपट एकदा पाहिलेले असले, तरी पुन्हा पाहताना त्यातून नवे अर्थ उलगडतात. चित्रपट आधी पाहिलेला असला, तरी पुन्हा पाहताना त्यातील काही माहिती नाही असे समजूनच पाहावा,’ असेही किर्लोस्कर यांनी सांगितले. 

‘नेटफ्लिक्स’वरच्या ‘बँडरस्नॅच’ या आगळ्यावेगळ्या चित्रपटाबद्दलही त्यांनी सांगितले. या चित्रपटात काही ठिकाणी चित्रपटाची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रेक्षकाला पर्याय विचारले जातात. प्रेक्षक जी दिशा निवडेल, त्या दिशेने चित्रपट पुढे जातो. चित्रपट क्षेत्रात होणारे अशा प्रकारचे नवे प्रयोग नक्की पाहायला हवेत, असे त्यांनी नमूद केले. 

रत्नागिरी फिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण यांनी किर्लोस्कर यांचे स्वागत केले. रमेश कीर कला अकादमीचे प्रदीप शिवगण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 78 Days ago
This is an attempt to look at this medium as a Medium for Communication --.correct approach . How can anything be developed if one does not take a critical look at it ?
0
0

Select Language
Share Link
 
Search