मुंबई : सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३मध्ये आलेला राकेश मेहरा दिग्दर्शित आणि अभिनेता फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. राकेश आणि फरहान यांची हीच जोडी सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा आपला आगामी ‘तूफान’ हा चित्रपट घेऊन येत आहेत, ज्यात फरहान अख्तर एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांना फरहान अख्तरने पडद्यावर हुबेहूब साकारले होते. प्रेक्षकांनी त्या ‘मिल्खा’वर भरभरून प्रेम केले. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक पुरस्कारही आपल्या नावे केले. आता तब्बल सहा वर्षांनंतर ही राकेश आणि फरहान यांची जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याने ते दोघेही याबाबत उत्सुक आहेत. खुद्द फरहानने याबाबत ट्विट करून या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. राकेश मेहरा यांनीही ट्विट करत आपण या चित्रपटाबाबत उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

तूफान हा फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे. चित्रपटात फरहान बॉक्सरची भूमिका करत असला, तरीही हा कोण्या ‘बॉक्सर’चा बायोपिक नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे. अंजुम राजाबली यांनी लिहिलेल्या एका काल्पनिक कथेवर आधारित हा चित्रपट आहे. या वर्षाअखेरपर्यंत चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार असून मुळातच बॉक्सिंग हा आवडीचा प्रकार असल्याने या चित्रपटाबाबत आपल्याला विशेष उत्सुकता असल्याचे फरहानने म्हटले आहे. यासाठी त्याने बॉक्सिंगचा सराव करण्यासही सुरुवात केली आहे.