Next
‘काँग्रेस हा विचार आहे; तो कधीच संपणार नाही’
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 10:57 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘काँग्रेस हा महात्मा गांधीजींनी दिलेला विचार आहे. नेल्सन मंडेला, बराका ओबामा यांनी हा विचार स्वीकारुन आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताची कल्पना अशक्य असून, गांधीजींनी दिलेला हा काँग्रेसचा विचार कधीही संपणार नाही,’ असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ-पाटील उर्फ दादा यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, राज्याच्या सामाजिक व राजकीय इतिहासाचे साक्षीदार; यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी, महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात काम केलेले एकमेव मंत्री आणि २२ वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचा भार सांभाळलेले मंत्री, संगमनेरचे सुपुत्र बी. जे. खताळ-पाटील यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम पुण्यात झाला. ‘श्री आदिशक्ती फाउंडेशन’ने शनिवार पेठेतील ‘साधना मिडिया सेंटर’मध्ये या गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, श्री आदिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, खताळ यांचे पुतणे संतोष खताळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


‘चले जाव’चे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, पहिल्या मंत्रीमंडळाची स्थापना, विविध मुख्यमंत्र्यांबरोबरचे अनुभव, निर्णय घेताना पाळलेली तत्त्वनिष्ठा, गांधी घराण्याची परंपरा, राजकारणाची सद्यस्थिती, सक्रिय राजकारणापासून दूर जात जगत असलेले आनंदी आणि समाधानी जीवन, आरोग्यसंपन्न शरीरयष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवर, दादांनी आपल्या कडक शिस्तीच्या शैलीत परखड उत्त्तरे दिली.

खताळ दादा म्हणाले, ‘काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही, तर तो विचार आहे. त्यामुळे त्याला पक्षाच्या चौकटीत बंद करणे योग्य होणार नाही. सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन चालण्याची क्षमता, केवळ काँग्रेस विचारांत आहे. त्यामुळे हा विचार कधीही मरणार नाही. अलीकडच्या काळात राजकारणाची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. पूर्वी त्यागवादी, निष्ठापूर्वक राजकारण केले जात असे. आज राजकारणात त्यागवादापेक्षा भोगवादाला प्राधान्य दिले जात असल्याने, तसेच पैशांचा वापर होत असल्याने लोकशाहीची धिंड काढल्यासारखे वातावरण आहे. आज या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांकडे पाहिल्यानंतर अतिशय दु:ख होते. आजचे राजकारण हे जनतेसाठी कमी आणि स्वार्थासाठी जास्त, अशी परिस्थिती आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या कामाची एक शैली होती. आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धारिष्ट्य त्यांच्याजवळ होते.’

‘राजकारणाचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला, तर जनतेच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरेल. सरकार जनतेचे असते. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे आपण हवे ते करु शकू, ही भावना आपल्या मनात असता कामा नये. माझ्या काळात मुख्यमंत्री ए. आर. अंतुले याच अविर्भावात काही निर्णय घेत असत. त्याचा फटका त्यांना बसल्याचे आपण सर्वजण जाणतो. नियमाच्या पलीकडे जाऊन काहीही करणे अयोग्य असते. त्यामुळे वशिला किंवा तत्सम गोष्टींना मी अजिबात थारा देत नसे. परिणामी मला अनेक लोकांनी नावे ठेवली. परंतु, तत्वांच्या बाहेर जाऊन कधीही काम केले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध म्हणून, १९५७ची निवडणूक, तिकिट दिलेले असतानाही मी लढवली नाही,’ असे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसवरील घराणेशाहीच्या आरोपांबाबत ते म्हणाले, ‘काँग्रेसवर होत असलेला घराणेशाहीचा आरोप मला मान्य नाही. नेतृत्त्व हे जनतेने दिले आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अलीकडच्या काळात राहुल गांधी हे जनतेने दिलेले नेते आहेत. त्यामुळे केवळ गांधी आडनाव आहे, किंवा गांधी घराण्यातली व्यक्ती आहे म्हणून घराणेशाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काँग्रेसने आपली मूल्ये जपली आणि जनतेच्या हिताला प्राधान्य दिले; तर काँग्रेसमुक्त नाही, पण भाजपमुक्त भारत व्हायला वेळ लागणार नाही.’


‘आजही मैलभर चालणे, नियमित व्यायाम, आसने आणि ध्यानधारणा करणे, योग्य आहार घेणे यामुळे प्रकृती ठणठणीत आहे. निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असलो, तरी समाजकारण आणि जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी काम सुरुच आहे. नव्या पिढीने राजकारण करताना मूल्ये जपली पाहिजेत. त्यातून लोकशाहीचे सक्षमीकरण होईल व चांगल्या भारताकडे आपली वाटचाल कायम राहील,’ असे खताळदादा यांनी नमूद केले.
विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. दत्ता पवार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link