Next
बंदिशी, भैरवीने आनंदली रविवारची सायंकाळ
प्रेस रिलीज
Monday, February 05 | 03:34 PM
15 0 0
Share this storyपुणे : संतूरवर हळुवार छेडलेल्या तारा...  त्यातून उमटलेले मधुर स्वर... विलंबित बंदिशीने गाठलेली उंची... मारवा रागात आलाप, जोड, झाला यामधून झालेले पंडित राहुल शर्मा यांचे सादरीकरण... त्यानंतर कल्याण, बिहाग रागात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या बंदिशींनी संगीतप्रेमींची रविवारची (चार फेब्रुवारी) सायंकाळ आनंददायी ठरली.

निमित्त होते, भैरवी संगीत प्रसारक मंडळ आयोजित आणि कॉटनकिंग प्रस्तुत दोन दिवसीय नूपुरनाद महोत्सवाचे. रविवारी सायंकाळी पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन व पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने नूपुरनाद महोत्सवाची सांगता झाली. कोथरूडमधील आयडियल कॉलनीच्या मैदानावर भरलेल्या या महोत्सवात रसिक श्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
 
पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र पंडित राहुल शर्मा मंचावर येताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. पंडित शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडत विविध राग आणि ताल वाजवत श्रोत्यांची वाहवा मिळवली. मध्यलय, दृतलय तीन ताल... अन कौशी ध्वनीमधील धून सादर होताना पंडित राहुल शर्मा यांना श्रोत्यांची मिळालेली दाद अवर्णनीय होती. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात पंडित व्यंकटेश कुमार यांच्या सुमधुर गायनाने शांतीरसाची अनुभूती आली. त्यांनी सादर केलेल्या बंदिशीनी आसमंत दुमदुमला. ‘सजनी...’, ‘मुख मोर मोर...’ या सादरीकरणावर श्रोत्यानांही ठेका धरायला लावला. ‘आजा सावरिया...’ ही भैरवी सादर करत त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर शिवराज पाटील व निवृत्ती धाबेकर यांनी, तर हार्मोनियमवर राहुल गोळे यांनी साथ केली.

प्रसंगी भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर, कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर, निनाद दैठणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, पुणेकर रसिकांसाठी हा महोत्सव विनामूल्य ठेवण्यात आला होता. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

‘शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासाठी हा महोत्सव समर्पित केलेला आहे. उत्कृष्ट कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गायन, नृत्य आणि वादन यामुळे यंदाचा महोत्सव विशेष असून, यातून अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडत आहे,’ असे डॉ. स्वाती दैठणकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link