Next
औद्योगिक परिसरातील अडचणी दूर करण्याची जर्मन कंपन्यांची मागणी
तातडीने कार्यवाही करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
BOI
Wednesday, July 17, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. युरगेन मोऱ्हाड आणि त्यांचा सहकारी, जर्मन कंपन्यांचे अधिकारी यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली.

पुणे : जलद वाहतूक, उत्तम रस्ते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची उणीव, गुंडगिरी, कामगार संघटनांचा त्रास आदी कारणांमुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण या औद्योगिक भागातील उद्योजक त्रस्त झाले असून, यात तातडीने सुधारणा न झाल्यास पुण्यातील कंपन्या चीनमधील शांघाय येथे स्थलांतरित करण्याचा इशारा जर्मन कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या जर्मन कंपन्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. युरगेन मोऱ्हाड आणि त्यांचा सहकारी, जर्मन कंपन्यांचे अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक परिसरात रस्ते चांगले नाहीत, पायाभूत सुविधा नाहीत, स्थानिक गुंडगिरी अशा अनेक समस्या आहेत. या समस्या स्थानिक पातळीवर सहजरीत्या सोडवता येण्यासारख्या आहेत. मात्र औद्योगिक पट्टय़ात कंपन्या चालवण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याने कंपन्यांची अपेक्षित वाढ होत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून एकूणच व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.  पिंपरी चिंचवड महापालिकेला सर्वाधिक महसूल औद्योगिक क्षेत्रातून मिळतो. परंतु, या परिसरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. चाकण एमआयडीसी, सणसवाडी या ठिकाणी रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधांची वानवा आहे. जर्मनीच्या महावाणिज्य दूतांसह कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. या समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नाइलाजाने पुण्यातील कंपन्या चीनमधील औद्योगिक शहर असलेल्या शांघाय येथे स्थलांतरित कराव्या लागतील, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राम यांनी जर्मन कंपन्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीत दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search