Next
रंगला विठ्ठल ‘नामाचा गजर’...
पं. आनंद भाटे यांना वैष्णव पुरस्कार प्रदान
BOI
Saturday, July 06, 2019 | 02:11 PM
15 0 0
Share this article:

कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने ‘वैष्णव पुरस्कार’ पं. आनंद भाटे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) पं. रघुनाथ खंडाळकर, मेधा इंगळे, जे. व्ही. इंगळे, पं. आनंद भाटे, श्रीनिवास जोशी, सुधाकर चव्हाण, मुकुंद संगोराम.

पुणे : ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात सुरांचा आनंद घन रसिकांवर बरसला, अन् विठ्ठल नामाचा गजर सभागृहभर दुमदुमला... निमित्त होते एबीआयएल व कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘नामाचा गजर’ या संतरचना आणि अभंग यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे. कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते.

श्रीनिवास जोशी व विराज जोशी सादरीकरण करताना

स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी ‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले...’, ‘माझे माहेर पंढरी...’ या भजनांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले, तर पंडितजींचा नातू विराज जोशी याने ‘अणूरणीया थोडका, तुका आकाश एवढा...’, ‘देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल...’ या अभंगांनी श्रोत्यांची मने जिंकली. टाळयांच्या कडकडाटात रसिकांनी त्याचे कौतुक केले. 

याबरोबरच कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कै. ह. भ. प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’  पं. आनंद भाटे यांना प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ‘पालखीच्या भारावलेल्या वातावरणात पं. विश्वनाथबुवा इंगळे यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे,’ अशी भावना भाटे यांनी या वेळी व्यक्त केली.

पं. रघुनाथ खंडाळकर व त्यांचे पुत्र सुरंजन व शुभम खंडाळकर सादरीकरण करताना

यानंतर पं. रघुनाथ खंडाळकर व त्यांचे पुत्र सुरंजन व शुभम खंडाळकर यांनी ‘सावळी ती मूर्ती हृदयी बिंबली...’, तुकडोजी महाराजांची रचना ‘वाचे विठ्ठल गाई..’, ‘सब पैसे के भाई, अपना साथी कोई नाही..’, ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...’ या रचना सादर केल्या. आपल्या गायनाचा शेवट त्यांनी ‘अधरी धरुनी वेणू...’ ही गौळण गाऊन केला. सुरांची खेळी, प्रतिध्वनी काढण्याचा प्रयोग याला रसिकांनी मनापासून दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांना सुरश्री खंडाळकर, भारत डोरले, अजय ठाकरे यांनी गायन साथसंगत केली.

सावनी शेंडे-साठ्ये गायन सादर करताना
कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प सावनी शेंडे साठ्ये यांच्या सुरांनी रंगले. पं. अभिषेकीबुवांची आठवण करून देत ‘अबिर गुलाल उधळीत रंग...’ म्हणत पं. भीमसेन जोशी यांचे ‘मन हो राम रंगी रंगले...’ हे भजन त्यांनी गायले. तर पंडिता किशोरी अमोणकर यांची आठवण करून देत ‘बोलावा विठ्ठल...’ या अभंगाने मैफलीचा समारोप केला.

या कार्यक्रमाला पांडुरंग पवार (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), गंभीर महाराज अवचार (पखावज), माऊली टाकळकर, अनिल भुजबळ (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. सच्चिदानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search