Next
हमारी याद आएगी.....
BOI
Sunday, April 29 | 06:45 AM
15 0 0
Share this story

केदार शर्मा (फोटो : http://filmheritagefoundation.co.in)सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक व लेखक केदार शर्मा यांचा १२ एप्रिल हा जन्मदिन, तर २९ एप्रिल हा स्मृतिदिन! त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘हमारी याद आएगी...’ या गीताचा...
........
आज २९ एप्रिल! सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक व लेखक केदार शर्मा यांचा स्मृतिदिन! पार्श्वगायिका शमशाद बेगम यांच्याप्रमाणेच केदार शर्मा यांचाही जन्म व मृत्यू दोन्ही एप्रिल महिन्यातच आहे! १२ एप्रिल १९१० हा त्यांचा जन्मदिन, तर २९ एप्रिल १९९९ हा त्यांचा स्मृतिदिन.

सचिन तेंडुलकर हा उत्कृष्ट व मेहनती खेळाडू आहे; पण त्याला घडवण्यात रमाकांत आचरेकर सरांचे योगदान आहे. तोच प्रकार राज कपूरबाबतचा! राज कपूर उत्कृष्ट दिगदर्शक होता; पण हाच राज कपूर पोरसवदा असताना पृथ्वीराज कपूर यांनी त्याला केदार शर्मांकडे पाठवले आणि सांगितले, की ‘माझा मुलगा म्हणून याला कोणतीही सवलत देऊ नकोस!’ राज कपूरची सुरुवात केदार शर्मांच्या हाताखाली झाली.

केवळ राज कपूर नव्हे, तर मधुबाला, गीता बाली, रोशन, स्नेहल भाटकर, जमाल सेन, माधवी, झेब रेहमान या कलावंतांना, संगीतकारांना घडवण्याचे काम केदार शर्मांनी केले. त्यांना पहिली संधी केदार शर्मांनी दिली. केदार शर्मा उत्कृष्ट दिग्दर्शक होते. त्यामुळेच पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूरला त्यांच्याकडे ‘सहायक’ म्हणून काम करण्यास पाठवले. त्या वेळी केदार शर्मा आपल्या ‘नीलकमल’ चित्रपटाची आखणी करत होते. राज कपूरजवळ नायक होण्याचे गुण आहेत, हे ओळखून त्यांनी राज कपूरला ‘नीलकमल’ चित्रपटात नायकाची भूमिका दिली.

सुरुवातीच्या काळात ‘न्यू थिएटर्स’मध्ये पोस्टर रंगवणारा केदार शर्मा नावाचा पदवीधर तरुण आपल्या महनतीने पुढे दिग्दर्शक झाला, निर्माता झाला, लेखक झाला, कवी झाला आणि ‘इन्किलाब’ व ‘नेकी और बंदी’ या दोन चित्रपटांचा नायकही झाला. ‘न्यू थिएटर्स’च्या ‘विद्यापती’, ‘देवदास’, ‘आनंदाश्रम’, ‘सपेरा’ या चित्रपटांतील गाणीही त्यांनी लिहिली होती. ‘बालम आए बसो मेरे मन में’, तसेच ‘दुख के दिन अब बीत नही....’ ही कुंदनलाल सैगल यांनी गायलेली त्या काळातील लोकप्रिय गीते केदार शर्मा यांनी लिहिलेली होती.

काही काळ ‘न्यू थिएटर्स’ या चित्रसंस्थेत काम करून केदार शर्मा त्या संस्थेतून बाहेर पडले आणि त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करायचे ठरवले. खरे तर एखाद्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काही वर्षे काम केल्यावर तो दिग्दर्शक होतो. केदार शर्मा ‘न्यू थिएटर्स’मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हते. तरीही त्यांनी ती संस्था सोडल्यावर स्वतंत्र दिग्दर्शक म्हणूनच काम करायचे ठरवले. 

एखाद्याचे दैव बलवत्तर असते, तसा प्रकार केदार शर्मांबाबत झाला. ते दिग्दर्शक म्हणून काम करायचे ठरवून बाहेर पडल्यावर ‘फिल्म कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या चित्रसंस्थेचा ‘हमारी जीत’ हा अर्धवट अवस्थेत पडलेला चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून केदार शर्मांवर देण्यात आली. मूळ दिग्दर्शक परदेशी गेल्यामुळे केदार शर्मांना संधी मिळाली. त्याचा त्यांनी पूर्ण फायदा घेतला. दिग्दर्शक म्हणून तो चित्रपट पूर्ण केला.

नंतर त्यांना दिग्दर्शनासाठी ‘औलाद’ हा चित्रपट मिळाला. त्यामधून त्यांनी ‘रमोला’ ही नायिका पुढे आणली. त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला ‘चित्रलेखा’ हा चित्रपट त्यांना दिग्दर्शनासाठी मिळाला. त्याची नायिका ‘मेहताब’ ही अभिनेत्री होती. त्या चित्रपटात त्यांनी आंघोळ करणारी नायिका दाखवली. आज त्याचे काही विशेष वाटत नसले, तरी त्या काळी (१९४१ मध्ये) आंघोळ करणारी नायिका चित्रपटातून दाखवण्याचे धाडस करणारे केदार शर्मा हे पहिलेच दिग्दर्शक ठरले.

यशस्वी होत चाललेल्या केदार शर्मांना रणजित स्टुडिओचे मालक चंदूलाल शहा त्यांनी खास आमंत्रित केले. रणजितकरिता केदार शर्मांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यापैकी ‘गौरी’, ‘अरमान’, ‘जोगन’ हे चित्रपट खूप गाजले. राजेंद्र कुमारची पहिली भूमिका ‘जोगन’मध्येच होती व मधुर आवाजात मुलाखत घेणारी ‘तबस्सुम’ हिचाही ‘जोगन’ हाच पहिला चित्रपट होय!

केदार शर्मा यांनी दिग्दर्शन करताना काही धाडसाचे प्रयोग केले. त्यापैकी मेहताब या अभिनेत्रीच्या संदर्भातील ‘चित्रलेखा’ चित्रपटातील उल्लेख वर केलाच आहे. ही मेहताब नावाची अभिनेत्री ‘चित्रलेखा’ चित्रपटात काम करण्याआधी स्टंट चित्रपटांची नायिका म्हणून प्रसिद्ध होती. त्या काळात चित्रपटप्रेमींना चित्रपटाच्या त्या प्रकारातील तेच ते नायक-नायिका चालत असत! असे असूनसुद्धा मेहताबला ‘चित्रलेखा’सारख्या सामाजिक आशयाच्या चित्रपटात घेण्याचे धाडस केदार शर्मांनी केले होते. तोच प्रकार ‘रंगीन राते’ या चित्रपटाचा! या चित्रपटात गीता बाली या अभिनेत्रीला केदार शर्मांनी चक्क पुरुष भूमिकेत चमकवले होते. एका स्त्रीने संपूर्ण चित्रपटात पुरुषाची भूमिका केल्याचे हे उदाहरण भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेवच ठरावे!

केदार शर्मा टच हे त्यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ट्य होते. हा कलावंत सुंदर गाणीही लिहून गेला आहे. ‘बावरे नयन’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले ‘तेरी दुनिया में दिल लगता नही...’ हे गीत, तसेच ‘शोखीयाँ’ चित्रपटातील ‘सपना बन साजन आये.....’ हे मधुर गीत अशी काही सुंदर गीते केदार शर्मांनी लिहिली होती.

अशाच मधुर गीतांपैकी ‘कभी तनहाईयों में हमारी याद आएगी’ हे गीत ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटातील होते. केदार शर्मा यांनी लिहिलेले हे गीत आजही आवर्जून ऐकले जाते, पण ते ‘मुबारक बेगम’ यांच्या आठवणीसाठी. त्यांनी गायलेल्या काही मधुर गीतांत हे गीत पहिल्या क्रमांकावर आहे. या गीताची चाल, संगीत हे सर्व एका मराठी कलावंतांचे कर्तृत्व. त्यांचे नाव स्नेहल भाटकर. सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे ते वडील! त्यांचे कर्तृत्व आणि यशापयश हा स्वतंत्र विषय आहे; पण त्यांनी या गीताला ज्या संगीताने सजवले, चालीत गुंफले, ती चाल व ते संगीत अजरामर! केवळ ‘तनहाईयो में’ नव्हे, तर वारंवार ऐकण्यासारखे हे गीत आहे! 

सामान्यपणे चित्रपटातील गीत हे किमान तीन कडव्यांचे असते. क्वचित दोन कडव्यांचे असते. तीनपेक्षा जास्त कडवी असणारीही अनेक गाणी आहेत. परंतु ‘हमारी याद आएगी’ चित्रपटातील हे गीत फक्त एका कडव्याचे आहे. एवढे सुंदर आशयपूर्ण असणारे हे गीत एकच कडव्यात ऐकल्यानंतर मनाला एक चुटपूट लागून राहते, की हे गीत एवढ्यात का संपले? पण या प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करूनही मिळत नाही. त्याचे जन्मदाते आता हयात नाहीत. कदाचित पुढील पिढीत हे गीत ऐकले गेले, तर हे असे एका कडव्याचे गाणे लिहिणारा कोण, या प्रश्नाच्या उत्तरासाठी तरी त्यांना ‘हमारी याद आएगी’ असा विचार केदार शर्मांनी केला नव्हता ना?

असो! आजच्या त्यांच्या स्मृतिदिनासाठी हेच ‘सुनहरे गीत’ पाहू आणि त्यांना सांगू, की तुमची ‘याद’ आम्ही विसरू शकलेलो नाही. या चित्रपटाचा नायक केदार शर्मांचा मुलगाच होता. अशोक त्याचे नाव!

कभी तनहाईयों में यूँ, हमारी याद आएगी, 
अंधेरे छा रहे होंगे, के बिजली कौंध जायेगी 

(जेव्हा) कधी तू एकटा बसला असशील (एकांतात असशील), तेव्हा माझी आठवण तुला येईल. (आता आपण एकत्र नसल्यामुळे) सगळीकडे अंधार भरून राहिला आहे. (असे तुला भासेल आणि त्यातच माझ्या आठवणीमुळे) एखादी वीज लखलखावी तसे तुला वाटेल (आणि पुन्हा) सगळीकडे अंधार भरून राहील .

ये बिजली राख कर जाएगी, तेरे प्यार की दुनिया 
न फिर तू जी सकेगा और न तुझ को मौत आएगी

(माझ्या आठवणींची) ती वीज तुझी प्रेमाची दुनिया जळून राख करील. (अर्थातच माझ्या विरहामुळे तू सौख्याने राहू शकणार नाहीस आणि ओघानेच) नंतर तू जगू शकणार नाहीस आणि तुला मृत्यूही येणार नाही. (फक्त माझी आठवण येत राहील व त्यामुळे तू बैचेन राहशील.) 

एखादे गीत सुनहरे असण्यासाठी ते तीन चार कडव्यांचे असावे लागते, असे नाही. ‘याद’ शब्दावरची मुबारक बेगम यांची हरकत दीर्घ काळ मनात रेंगाळत राहणारी आहे. बासरी व सतार या दोनच वाद्यांच्या साथीतील हे गीत हे स्नेहल भाटकरांचे कौशल्य! तसेच केदार शर्मांची ‘याद’ आणून देणारे हे गीत!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link