Next
‘वृद्धांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील’
प्रेस रिलीज
Monday, June 25, 2018 | 12:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘समाजातील काहीशा दुर्लक्षित असलेल्या वृद्धांना योग्य वैद्यकीय सेवा मिळायला हव्यात. अनेकदा वेळेवर उपचार नसल्याने वृद्धांच्या आरोग्याची परवड होते. सातारा आणि इतर ग्रामीण भागातील वृद्धांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिबिराला मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढला असून, पुढील महिन्यात आणखी एका शिबिराचे आयोजन करणार आहोत. सातारा आरोग्य प्रशासनाकडून मोलाचे सहकार्य मिळाले,’ असे प्रतिपादन मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे साताऱ्यातील कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. पुण्यातील नामवंत रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी २०० पेक्षा जास्त ज्येष्ठांना तपासून आवश्यक औषधोपचार केले. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य चिकित्सा करून घेता यावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले होते.

शिबिराच्या आयोजनासाठी साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, मानसोपचार विभागाचे डॉ. नितीन अभीवंत, दंत विभागाचे डॉ. पाखमोडे, भारती विद्यापीठातील ईएनटी विभागाच्या डॉ. गौरी बेलसरे, संचेती रुग्णालयाचे डॉ. पराग संचेती आणि एचव्ही देसाईंच्या मनीषा संघवी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

‘एच. व्ही देसाई रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक आणि जनरल फिजिशियन्स, भारती विद्यापीठातील कान-नाक-घसा तज्ज्ञ आणि संचेती रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ व फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांच्या गटाने या शिबिरात आरोग्य तपासणी व उपचार केले. कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रानेही ‘आशा’, ‘एएनएम’ नर्स आणि डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देऊन सहकार्य केले. साताऱ्यातील सार्वजनिक रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत मोफत रक्त तपासणी करून दिली’, असे रितू छाब्रिया यांनी नमूद केले.

फाउंडेशनच्या कार्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘सुरुवातीपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २००६ पासून पुणे आणि रत्नागिरीमधील २२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे घेतली असून, त्यात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत तपासण्यानंतर पाठपुरावा, गरजेनुसार पुढील तपासणी, उपचार यासाठी पालक व मुले रुग्णालयाशी संपर्कात राहतात. त्यांना फाउंडेशनतर्फे अर्थसहाय्य केले जाते. फिनोलेक्स इंडस्ट्रीज ‘मुकुल माधव’च्या माध्यमातून २०१५ पासून साताऱ्यातील ग्रामीण भागासाठी काम करीत आहे.’

‘सेरेब्रल पाल्सीने प्रभावित मुलांसाठी हे काम चालू आहे. बारा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ५८२ ‘आशा’ आणि ‘एएनएम’ शिक्षितांना कार्यक्षमतेचे मूल्यांकन आणि दर्जा वाढविण्यासाठी व गर्भधारणा संदर्भातील धोके टाळण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे; तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी, प्रथमोपचार व वैद्यकीय मदतीसाठी जून २०१८ मध्ये ‘गोल्डन हावर’ प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणासाठी पुण्यातील सिंबायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगचे सहकार्य लाभले आहे,’ असे छाब्रिया यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link