Next
'आपका फोटो में भगवान आया है...'
BOI
Friday, April 20 | 09:45 AM
15 0 0
Share this story


फोटोमध्ये माझ्याजवळ प्रकाशाचे वलय उठले होते, जे कॅमेऱ्याच्या प्लॅशचे प्रतिबिंब होते. नागलोक सूर्यउपासक आहेत. माझ्या फोटोत प्रत्यक्ष सूर्याने दर्शन दिल्याचा त्यांना भास झाला व प्रत्यक्ष देवाने मामाला आशीर्वाद देऊन आपल्यासाठी पाठवले असल्याचा साक्षात्कार झाला. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, की ते फ्लॅशचे प्रतिबिंब आहे; पण ते त्यांना पटेना... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभवकथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’ या लेखमालिकेचा हा पाचवा भाग...
....................
मला सुरुवातीपासूनच आदिवासींची संस्कृती, त्यांची परंपरा, लोकनृत्ये, त्यांचे रंगीबेरंगी पोशाख यांचे आकर्षण होते. अराबाबा मला एकदाच म्हणाले, ‘मामा, हमारा नाग जमात का कॉन्फरन्स हा ग्राम मे होनेवाला है. सब दुर-दुरका नाग लोग आयेगा. जमा होगा, डान्स कॉम्पिटिशन होगा, आप भी चलो.’ मग काय, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, अशी माझी अवस्था झाली. मी लगेच होकार दिला. 

वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख अतुलजी जोग कॉन्फरन्सचे मुख्य अतिथी होते. ते मूळचे रत्नागिरीचे, पण वनवासी कल्याण आश्रमाच्या पूर्वोत्तर विभागाचे ते प्रमुख. सोबत ते उत्तर पूर्वांचल जनजाती सेवा समिती पूर्वोत्तर विभागाचेही प्रमुख. रामानंदजी शर्माही अतिथी होते. नाग लोकांची संघटना झिलीयान ग्रांग हेरका असोसिएशनच्या पूर्वोत्तर भारताचे प्रमुख रामकुईगजी न्यूमे व त्यांचे कार्यकारी मंडळ हेदेखील येणार होते. हंग्रूम हे गाव नागा जमातीमध्ये खूप पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रमुख राणीमाँ गायदैनलू या ठिकाणी राहत होत्या. इथेच त्यांनी १९३२मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा दिला होता. या लढ्यात वीरगती प्राप्त झालेल्यांचे स्मारक तिथे बांधले आहे. याच ठिकाणी राणीमाँचे पदचिन्ह एक छोट्या खडकावर रंगवले आहे. 

तिथे जवळच राणीमाँचा पॅलेस आहे. त्याठिकाणी आमची राहण्याची सोय केली होती. अतुलजी व मी एकाच खोलीत राहत होतो. हंग्रूम गाव आसाम व मणिपूरच्या सीमेवर अंदाजे तीन हजार फूट उंच डोंगरावर आहे. या ठिकाणाहून रात्री मणिपूरमधील खेडे व त्यांचे दिवे स्पष्ट दिसतात. रात्री इथे खूप थंडी असते, गार वारेही वाहत असतात. मला गारठा लागू नये, म्हणून चक्क फाटकी-तुटकी अशी मिळून आठ ब्लॅन्केट्स एकमेकांना जोडून मला पांघरण्यासाठी दिली होती. या लोकांमध्ये अकिम नावाची १७-१८ वर्षांची एक नाग मुलगी होती, तिला थोडे थोडे हिंदी येत असे. ती मग माझ्याबरोबर दुभाषी म्हणून होती. 

कॉन्फरन्ससाठी साधारण ५०० नाग लोक विविध ठिकाणांहून आले होते. लहान-मोठे, तरुण-तरुणी त्यांच्या पारंपरिक रंगीबेरंगी वेषात सुंदर दिसत होते. त्यांच्यात रंगलेली लोकनृत्याची स्पर्धा विलोभनीय होती. त्यांच्या गवताच्या झोपड्या आणि त्यातील अगदी साधे राहणीमान असले, तरी त्यांच्यात प्रचंड आपुलकी आणि प्रेम होते. नाग लोक माणसांना खातात, असे मी खूप जणांकडून ऐकले होते, पण इथे आल्यावर कळले, हा समज किती चुकीचा होता ते. कोण्या वेगळ्या समाजात आलो आहोत, असे कधीच वाटले नाही.

कार्यक्रमासाठी एक डिझेल जनरेटर सेट आणला होता. कार्यक्रम सुरू असताना तो एकाएकी बंद पडला. नंतर काही केल्या सुरू होईना. रामनंदजी आणि रामकुंडजी म्हणाले, ‘अरे मामाको बुलाओ.. वो ठीक कर देंगे.’ माझी धडपड सुरू झाली. मनात म्हटले, आता इज्जतीचा प्रश्न आहे. डिझेल इंजिनला यापूर्वी कधी हात लावला नव्हता. आता काय करावे कळत नव्हते. स्कूटरदुरुस्तीचा अनुभव पणाला लावून आधी कार्बोरेटर बाहेर काढला. त्याचे पॅकिंग पार फाटून गेले होते. तिथे खेड्यात ते नवीन कुठून मिळणार आता, असे वाटले. मग आपलीच शक्कल लढवून माझ्या सिगारेटच्या पाकिटांचे पॅकिंग कापून बसवले. अन् काय आश्चर्य! जनरेटर चालू झाला. सगळे खूष झाले. मी मनात हसलो. 

नाग लोकांमधील काही रीतीरिवाज आपल्याला न मानवणारे आहेत. इथल्या कोणाच्याही झोपडीत आपण गेलो, की आपले स्वागत तांदळाच्या दारूच्या (याला लाऊपाणी म्हणतात) ग्लासने होते. ते आपण नाकारले, तर तो यजमानांचा अपमान समजला जातो. पाच-सहा झोपड्यांमध्ये असे स्वागत झाल्यावर मला गरगरायला लागले. पुढे मग कोणाच्याही घरात जायचे मी टाळू लागलो. या ठिकाणच्या झोपड्यांमध्ये दिवसाही अंधार दाटून राहिल्यासारखे दिसत असे. कारण घरात सरपण म्हणून लाकूड वापरतात. त्याच्या धुराची काजळी सर्व तट्ट्यांवर साचून त्या काळ्याकुट्ट झालेल्या होत्या. मग हे लोक काचेच्या बाटल्यांच्या चिमण्या करून प्रकाशासाठी  वापरतात. त्या धूर ओकणाऱ्या चिमण्या व त्यांच्या पिवळट प्रकाशात झोपडी भयाण वाटत असे.  

गावात तर एकही दुकान नाही, मग रॉकेल कुठून आणता, असे विचारल्यावर, ‘मामा हम लायसांगसे लाते है’, असे सांगायचे. लायसंग हंग्रूमपासून ४० किलोमीटर अंतरावर एक छोटी बाजारपेठ आहे. डोंगरदऱ्या पार करून तिथे जावे लागते. माझ्या मनात कणव आली. आपण या लोकांना सौर कंदील दिले, तर यांची रॉकेलसाठीची ४०-४० किलोमीटरची पायपीट वाचेल,  असा विचार आला. आता आयुष्यातील दुसऱ्या वळणाजवळ जात होतो. नकळत योगायोगाच्या दुसऱ्या मालिकेला सुरुवात झाली होती. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्मारकाच्या चौथऱ्यावर बसून माझा फोटो काढून घेतला. माझ्या मागे चकचकीत ग्रॅनाइटवर वीर योद्ध्यांची नावे कोरलेली होती. फोटो काढत असताना कॅमेऱ्याच्या फ्लॅशचे प्रतिबिंब ग्रॅनाइटवर माझ्या चेहऱ्याशेजारी उमटले होते. फोटोमध्ये माझ्याजवळ प्रकाशाचे वलय उठले होते, जे फ्लॅशचे प्रतिबिंब होते. नागलोक सूर्यउपासक आहेत. दर पौर्णिमेला ते सर्व जण जमून उगवत्या सूर्याला वंदन व प्रार्थना करतात. माझ्या फोटोत प्रत्यक्ष सूर्याने दर्शन दिल्याचा त्यांना भास झाला व प्रत्यक्ष देवाने मामाला आशीर्वाद देऊन आपल्यासाठी पाठवले असल्याचा साक्षात्कार झाला. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, की ते फ्लॅशचे प्रतिबिंब आहे; पण ते त्यांना पटेना. मामा, हम भी बहुत बार फोटो उवारा, लेकिन ऐसा कभी नही हुआ. सिर्फ आपका फोटो में भगवान आया है.’ काय म्हणावं याला आता! 

हाफलांगला परत आल्यावर पुन्हा विचार करू लागलो. हंग्रूममध्ये एकूण ७० झोपड्या. सर्वांना जर सौर कंदील किंवा सौर दिवे द्यायचे झाले, तर अंदाजे प्रत्येकी ४००० रुपयांप्रमाणे दोन लाख ऐंशी हजार रुपये लागतील. अतिरिक्त पन्नास हजार. म्हणजे अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपये लागतील. कसे जमा करायचे पैसे? आपण एकटे हा प्रकल्प पूर्ण करू शकणार नाही, अशी चक्रे डोक्यात फिरू लागली. हे राणीमाँचे  गाव आहे व इथे आपण काम केलेच पाहिजे, हा दृढ निश्चय केला. अज्ञात प्रेरणेने स्फूर्ती दिली होती. मार्गही तोच दाखवेल हा विश्वास निर्माण झाला. 

केहुराले व रेहुलीची मॅट्रिकची तयारी सुरू होती. आता त्यांच्या वर्गातली इतर मुले व मुलीपण अभ्यासाला येऊ लागल्या. सगळ्यांचे शंकानिरसन चांगले होत होते. २३ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत मॅट्रिकची परीक्षा होती. २४ मार्चला मी परत येणार होतो. रेहुली व आह्या या दोघीही माझ्याबरोबर पुण्याला येणार होत्या. त्यांची तयारी व लगबग सुरू झाली. एवढ्यात विवेकानंद विद्यालयाच्या प्राचार्य सरांनी सांगितले, की २० मार्चला ‘सायन्स डे’ आहे. त्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन भरणार आहे. मी अशाच संधीची वाट पाहत होतो. कारण आता माझ्या परीक्षेचा क्षण होता. मी होकार दिला. हातात फक्त तीन दिवस होते. डाके यांच्याकडून नेलेले सोलर एनर्जी, विंड एनर्जी, वॉटर एनर्जी यांचे संच होते. तसेच अरविंद गुहांच्या मुक्तांगणमधून शिकून तयार केलेली वैज्ञानिक खेळणीही सोबत होती. ती सर्व प्रदर्शनात मांडण्याचे ठरवले. सर्व मॉडेल्स समजावून सांगण्यासाठी नववी व दहावीतील मुले-मुली निवडल्या. त्यांना देण्यात येणाऱ्या मॉडेल्सची संबंधित पोस्टर्स तयार करायला सांगितले. दोन तीन दिवसांत मुलांनी सुंदर पोस्टर्स तयार केली. प्रत्येकाला त्यांची मॉडेल्स वाटून दिले व त्यांची वैशिष्ट्ये  समजावून दिली व बदलून घेतले. 

प्रदर्शनाचा दिवस उजाडला. येथील डॉन बॉस्को शाळेत प्रदर्शन होणार होते. शाळेच्या कॉरिडॉरच्या टोकाला आम्हाला जागा दिली. हीच जागा आम्हाला सोयीची होती. कारण सोलर मॉडेल्सचे प्रात्यक्षिक बाहेर जाऊन दाखवता येणार होते. बऱ्याच वर्षांनी विवेकानंद विद्यालय अशा प्रदर्शनात भाग घेत होते. प्रत्येकाच्या मनात भीतीयुक्त कुतूहल होते. प्रदर्शनात तेथील पाच मिशनरी शाळा व इतर तीन शाळांचा समावेश होता. त्यात मिशनरी शाळांचे कायम वर्चस्व असायचे. सर्व बक्षिसे त्यांनाच मिळायची; पण या वेळेस एक तरी बक्षीस मिळवणार, असा माझाही आत्मविश्वास होता. प्रदर्शनाचे रीतसर उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांनी सर्व स्टॉल्सची पाहणी केली. आम्ही मांडलेली सर्व मॉडेल्स वर्किंग मॉडेल्स होती. त्या विषयी सर्वांनी खूप चौकशी केली व कौतुक केले. अशा प्रकारची वर्किंग मॉडेल्स पहिल्यांदाच त्यांना पाहायला मिळाली होती. आपण काहीतरी नावीन्यपूर्ण सादर केल्याचे समाधान मात्र होते. अजून बरेचसे प्रकल्प पूर्ण करून या लोकांचे जीवन सुसह्य बनवायचे आहे, हे डोक्यात होतेच....

(क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link