Next
‘जंगलाच्या राजा’ला आधुनिक तंत्रज्ञानाचे चिलखत
‘गीर’मधील सिंहांच्या संवर्धनासाठी सरकारचा विशेष प्रकल्प
BOI
Saturday, February 09, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : गुजरातमधील गीर येथील आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने गुजरात सरकारच्या सहकार्याने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प ९८ कोटी रुपयांचा असून, तीन वर्षांच्या कालावधीसाठी ५९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली आहे. या प्रकल्पात सिंहांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.  

गुजरातमधील गीर आणि परिसर हा आशियाई सिंहांचा एकमेव शिल्लक अधिवास आहे. त्यामुळे आशियाई सिंहांच्या प्रजातीची गणना धोक्यात असलेल्या प्रजातींमध्ये (एंडेंजर्ड स्पेसीज) केली जाते. गीर अभयारण्यात सध्या सहाशेहून अधिक सिंह आहेत. २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांच्या कालावधीत सिंहांच्या अधिवासाचे उत्तम व्यवस्थापन, रोगनियंत्रण आणि त्यांच्यासाठी चिकित्साविषयक सेवांची उपलब्धता या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात करताना केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गुजरात सरकारला पहिल्या वर्षासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 

‘हा प्रकल्प आदर्श ठरेल,’ असा विश्वास डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. सिंह आणि वाहनांचा माग काढण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर, सिंह कुठून कुठे जात आहेत हे कळण्यासाठी मूव्हमेंट सेन्सर, रात्रीच्या टेहळणीची क्षमता असलेली यंत्रणा, रिअल टाइम रिपोर्टची निर्मिती अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे सिंहांचे संरक्षण व संवर्धनासाठी नेमके आणि अचूक प्रयत्न करणे शक्य होणार आहे.

या व्यतिरिक्त येत्या काळात गीर येथील सिंहांसाठी विशेष पशुवैद्यकीय दवाखाने आणि सुसज्ज अॅम्ब्युलन्स या सेवाही उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठी ८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती गुजरात सरकारच्या अधिकाऱ्याने दिली.

आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी १९६५मध्ये गुजरातच्या गीर जंगलातील १४१२.१ चौरस किलोमीटरचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे अभयारण्य आणि आजूबाजूच्या सौराष्ट्र परिसरातील काही भाग हाच आशियाई सिंहांचा सध्या शिल्लक असलेला एकमेव अधिवास आहे. विशेष तंत्रज्ञानाच्या साह्यामुळे त्यांच्या संवर्धनाला चांगला हातभार लागणार आहे. 

माळढोक पक्षीस्थलांतरी पक्षी-प्राण्यांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद भारतात

स्थलांतरी पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनासंबंधीची संयुक्त राष्ट्रसंघाची १३वी आंतरराष्ट्रीय परिषद १५ ते २२ फेब्रुवारी २०२० या कालावधीत गुजरातमधील गांधीनगर येथे होणार आहे. या परिषदेचा शुभंकर (मॅस्कॉट) म्हणून माळढोक पक्ष्याची निवड करण्यात आली आहे. ‘मॅस्कॉट’चे अनावरण नुकतेच केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. या मॅस्कॉटला ‘गिबी’ असे नाव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. परिषदेच्या लोगोचेही त्यांनी अनावरण केले. या परिषदेत १२९ देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, स्थलांतरी पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवरील चर्चा यात होणार आहे. 

भारतात अनेक प्रकारचे स्थलांतरी पक्षी वर्षाच्या ठराविक कालावधीत, ठरावीक भौगोलिक प्रदेशात येत असतात. भारतात या पक्षी-प्राण्यांच्या संवर्धनासाठी केले जात असलेले प्रयत्न जागतिक पातळीवर पोहोचण्यास या परिषदेमुळे मदत होणार आहे. ‘मॅस्कॉट’साठी निवडल्या गेलेल्या माळढोक पक्ष्याचे अभयारण्य सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search