Next
‘चतुरंग’चा जीवनगौरव पुरस्कार यंदा सय्यदभाईंना!
BOI
Friday, August 30, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this article:

सय्यदभाईमुंबई : तीन तलाक पद्धत बंद होण्यासाठी दीर्घ काळ लढा देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांत जीवनभराच्या मौलिक कार्याने लक्षणीय भर घालून महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्तीला ‘चतुरंग’तर्फे १९९१पासून दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. 

समाजाच्या मनातील कृतज्ञतेची खूण म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याची ‘चतुरंग’ची भावना आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली विजय कुवळेकर, प्रकाश पाठक, सुधीर जोगळेकर, भानू काळे, विनायक पाटील आणि डॉ. सागर देशपांडे या मान्यवरांच्या निवड समितीने यंदाच्या सामाजिक क्षेत्रीय जीवनगौरव पुरस्कारासाठी सय्यदभाई यांची एकमताने निवड केली आहे. 

तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देत असतानाच त्यांच्या पुनर्वसनासाठी अविरत कार्यरत राहणाऱ्या हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाची धुरा त्यांच्या पश्चात सय्यदभाई यांनी निरंतरपणे वाहिली आहे. तिहेरी तलाक पद्धत बंद होण्यासाठी दीर्घ काळ लढा देणाऱ्या सय्यदभाई यांच्या कार्याची, योगदानाची दखल घेऊन निवड समितीने सय्यदभाई यांचे नाव या वर्षीच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्कारासाठी निश्चित केले आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या दीर्घ सामाजिक लढ्याला विनम्र अभिवादन असल्याची भावना प्रतिष्ठानने व्यक्त केली आहे. 

मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी ‘चतुरंग’चा हा सामाजिक क्षेत्रीय पुरस्कार श्रीमती मावशी हळबे, डॉ. इंदुमती पारीख, पांडुरंगशास्त्री आठवले, नानाजी देशमुख, साधनाताई आमटे, शरद जोशी आणि गिरीश प्रभुणे या मान्यवर बुजुर्गांना देण्यात आला होता. या जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा दोन दिवसीय रंगसंमेलन सोहळा डिसेंबर २०१९मध्ये नाशिक येथे करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे कळवण्यात आले आहे. 

(तीन तलाक पद्धतीच्या लढ्यासंदर्भातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search