Next
मुरूड-जंजिऱ्यावर स्वारी
BOI
Wednesday, June 26, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

काशीद किनारा

‘करू या देशाटन’
सदराच्या मागील तीन भागांमध्ये आपण रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग पाहिला. या भागात पाहू या रायगडच्या मध्य किनारपट्टीवरील जंजिरा ते कोर्लई परिसर. 
............
इ. स. पूर्व १०० वर्षांच्या काळात या भागावर सातवाहनांचे राज्य होते. त्यानंतर शिलाहार, निजाम, विजापूरचा आदिलशहा, मराठे, मुघल व अखेरीस इंग्रज अशी सत्तांतरे या भागाने पहिली. या भागास हबसाण (आफ्रिकनांचा प्रदेश) असे म्हणत. बहामनी राज्य दिल्लीच्या राज्यातून फुटून निघाल्यानंतर (१४३७) तेथील राजांनी अबिसीनियन लोकांचा भरणा आपल्या राज्यात करण्याचे तंत्र अवलंबले. ईशान्य आफ्रिकेच्या एका प्रांताला हशिब असे नाव असल्याने तेथील अरबांना हबशी असे नाव मिळाले व तेथीलच सैद जातीच्या अरबांना सिद्दी असे नाव पडले. हे हबशी प्रथम गुलाम म्हणून हिंदुस्थानात येत. परंतु पुढे अंगच्या गुणांवर त्यांना मुघल व निजामशाहीत मोठमोठ्या जागा मिळू लागल्या. हे लोक दर्यावर्दी असत व चाचेगिरीपण करीत. यांची सत्ता जंजिऱ्यापासून श्रीवर्धनपर्यंतच्या आसपासच्या प्रदेशावर होती. 

साग, ऐन, काजू, माड, आंबे, मीठ ही या भागातील प्रमुख उत्पादने आहेत. येथील पर्यटनस्थळे मुंबई-पुण्याला जवळ आहेत. इतिहास आणि निसर्ग या दोन्हींचीही अनुभूती येथे मिळते. आता रोहा भागात औद्योगिक वसाहत झाली आहे व पर्यटन हाही एक मोठा उद्योग झाला आहे. हा भाग निसर्गाने समृद्ध आहे. रम्य सागर किनारे, ताम्हिणी घाटापर्यंत असलेले किल्ले, बौद्ध वारसा सांगणारी लेणी हे या भागाचे वैशिष्ट्य. 

जंजिरा

जंजिरा :
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. अरबी भाषेतील जझिरा या शब्दाचा अर्थ होतो बेट. या बेटावर सिद्दी येण्यापूर्वी एक मेढेकोट होता. त्या वेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. असे म्हणतात, की या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांच्या उपद्रवापासून संरक्षण मिळण्यासाठी त्याचा प्रमुख राम पाटील याने निजामाची परवानगी घेऊन मेढेकोट बांधला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एकाशेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. मेढेकोटाच्या सुरक्षिततेमुळे राम पाटील त्या ठाणेदाराला दाद देईनासा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमखानाला होती. त्याने चतुराईने राम पाटलाशी मैत्रीचा हात पुढे करून व्यापारी असल्याचे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलला भेट म्हणून दारूची पिंपे पाठविली. त्यामुळे राम पाटील खूश झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून आणलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. 

किल्ल्याचं प्रवेशद्वारशिडाच्या जहाजातून प्रवासपुढे पिरमखानाच्या जागी आलेल्या बुऱ्हाणखानाने भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ. स. १६१७मध्ये उत्तर आफ्रिकेतून अबिसीनिया (सध्याचा इथिओपिया, सोमालियाला लागून असलेला भाग) येथून आलेल्या हबशींचा वंशज सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. दिल्लीची रझिया सुलतानाही याच वंशातील होती. हे लोक धाडसी व दर्यावर्दी म्हणून प्रसिद्ध होते. सिद्दी अंबर जंजिरा संस्थानचा मूळ पुरुष समजला जातो. मुरूड गावाच्या पश्चिमेस असलेला हा किल्ला २२ एकरावर बांधलेला असून, त्याला १९ बुरूज आहेत. किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यास २२ वर्षे लागली. जंजिऱ्याच्या तटावर ५७२ तोफा आहेत. 

चारही बाजूंनी समुद्र असूनही येथे गोड्या पाण्याचे एक तळे आहे. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. ती आजही बघता येते. किल्ल्यावरच्या बहुतेक इमारतींची पडझड झाली आहे. किल्ल्याच्या तटबंदीला बांधकामात शिसे वापरले आहे. त्यामुळे तटबंदी भक्कम आहे. किल्ल्याच्या जवळ ४० फुटांवर गेल्याशिवाय त्याचे दार दिसत नाही. किल्ला एकेकाळी वैभव संपन्न होता. आत चारमजली वाड्याचे अवशेष पाहिल्यावर याच्या वैभवाची कल्पना करता येते. तीनशे वर्षांहून अधिक काळ सिद्दी वंशाची सत्ता येथे टिकून राहिली. 

जंजिऱ्यावरील अवशेष

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पहिले बाजीराव यांच्या वेळी हा किल्ला घेण्याचे प्रयत्न झाले; पण ते यशस्वी झाले नाहीत. छत्रपती संभाजीराजांनी सन १६८१मध्ये जंजिऱ्याची मोहीम काढली. या मोहिमेत राजांनी स्वतः पुढाकार घेतला होता. रामायणातील सेतूप्रमाणे खाडी भरून काढण्याची अचाट कल्पना लढवून त्यांनी जंजिऱ्याची खाडी दगड, लाकूड, कापसाच्या गाठी यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला; परंतु खवळलेल्या समुद्रामुळे तो निष्फळ ठरला. तरीसुद्धा हा अयशस्वी वेढा पुढे आठ महिने चालला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच-सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता; पण तरीही मुरूडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. 

जंजिऱ्याच्या दरवाज्यावरील शिल्प

नानासाहेब पेशव्यांचे सरदार रामजी बिवलकर यांनी किल्ला जिंकत आणला होता; पण आयत्या वेळी इंग्रजांनी सिद्दीला मदत केली व किल्ला त्यांच्या ताब्यात राहिला. त्यानंतर कोणीही किल्ल्यावर आक्रमण केले नाही. जंजिऱ्याच्या ३३० वर्षांच्या कालखंडात २० सिद्दी सत्ताधीश होऊन गेले. सिद्दी मोहम्मदखान हा शेवटचा सिद्दी असताना, त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे तीन एप्रिल १९४८ रोजी हे बेटावरील छोटे राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. (जंजिऱ्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जंजिऱ्यावरील चार मजली वाड्याचे अवशेष

पद्मदुर्ग :
मुरूड बीचच्या समोरच पश्चिमेला समुद्रात हा जलदुर्ग दिमाखात उभा आहे. सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरूडजवळ समुद्रात असलेल्या कासवाच्या आकाराच्या कासा बेटावर हा किल्ला बांधला. याला पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला असेही म्हटले जाते. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे. परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपणे शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे. या किल्ल्याचे चुन्यातील बांधकाम थक्क करणारे आहे. तटबंदीच्या दगडी बांधकामात चुन्याचा वापर करण्यात आला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांमध्ये सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा सेंटिमीटर एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधील चुना अजूनही शाबूत आहे. 

पद्मदुर्ग

येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांनी धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरपंतांना साह्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते; पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली. पद्मदुर्गावर जाण्यासाठी दंडाराजपुरीचे कोळी लोक नावा किंवा यांत्रिक बोटीने समुद्राचे तानमान पाहून घेऊन जातात. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी त्यांची परवानगी लागते. 

जंजिऱ्यावरील बांगडी तोफसामराजगड, दंडाराजपुरी : इ. स. पूर्व १०० वर्षांच्या काळात दंडाराजपुरी येथे सातवाहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. उत्तर कोकणात राष्ट्रकूटांचे वर्चस्व संपुष्टात आणून शिलाहार घराण्याच्या पहिल्या शाखेने आपली स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली. रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी ही या घराण्याची राजधानी होती. रायगड, ठाणे व मुंबई हा प्रदेश त्यांच्या नियंत्रणाखाली होता. दंडाराजपुरी हे महत्त्वाचे बंदर होते. जंजिऱ्याच्या सिद्दीच्या जाचाला आळा घालण्यासाठी आणि त्याच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किनाऱ्यावर सामराजगडाची उभारणी केली. तो दंडाराजपुरीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. जंजिऱ्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे. सामराजगड बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांची नेमणूक केली होती. 

जंजिऱ्यावरील गोड्या पाण्याचा तलाव११ फेब्रुवारी १६७१ रोजी शिवाजी महाराज येत आहेत, असे कळताच सिद्दीने सामराजगडावर हल्ला केला. त्या वेळी महाराजांच्या दारूगोळ्याच्या कोठारास आग लागून मोठा स्फोट झाला. अनेक मराठा मावळे कामी आले व महाराजांना मोहीम थांबवणे भाग पडले. या किल्ल्यावर फक्त अवशेष शिल्लक आहेत. या ठिकाणावरून जंजिरा परिसराचे विहंगम दृश्य दिसते. 

मुरूड : वास्तविक मुरूड आणि जंजिरा ही वेगळी ठिकाणे आहेत. अर्थातच ती जवळच आहेत. जंजिऱ्यावर मुक्कामाची व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटकांच्या मुक्कामासाठी मुरूड हा चांगला पर्याय आहे. मुरूडचा सागरकिनारा अतिशय सुंदर व सखल आहे. हॉटेल्स व रिसॉर्टस् चांगली आणि भरपूर आहेत. संध्याकाळी बीच पर्यटकांनी फुलून जातो. पावणेतीन किलोमीटरचा निळ्याशार समुद्राचा रम्य किनारा, समोर दिसणारा पद्मदुर्ग आणि जंजिरा हे याचे वैशिष्ट्य. येथे अनेक किनारी खेळ उपलब्ध आहेत. 

दत्तमंदिरनवाबाचा राजवाडा : मुरूड शहरात प्रवेश करतानाच नवाबाचा भव्य राजवाडा आपले लक्ष वेधून घेतो. सन १८८५च्या सुमारास हा वाडा बांधण्यात आला. याचे बांधकाम मुघल व गोथिक पद्धतीचे आहे. आहे. ही नवाबांची खासगी मालमत्ता असून, तेथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा भव्य ऐतिहासिक राजवाडा बाहेरून पहावा लागतो. या ठिकाणाहून मुरूड शहर व भोवतालच्या सागरी परिसराचे विलाभनीय दर्शन होते. दत्तमंदिर, ईदगाह मैदान आणि खोकरी घुमट ही येथील स्थळे बघण्यासारखी आहेत. 

सिद्धिविनायक मंदिर, नांदगाव
गारंबीचे धरण : हे मुरूडजवळील एक सहलीचे ठिकाण आहे. जंजिरा संस्थानाचा विकास करणारा सिद्दी अहमदखान याने नैसर्गिक पाणी अडवून हे धरण बांधले. मुरूडच्या पूर्वेला जवळपास आठ किलोमीटर अंतरावर ते असून, ते गारंबी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. मुरूडपासून उंचीवर असल्याने मुरूड शहराला पिण्याचे पाणी याच ठिकाणावरून पूर्णपणे ‘ग्रॅव्हिटी’ने पुरविले जाते. वनभोजनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. 

नांदगाव समुद्रकिनारा : मुरूडपासून सात किलोमीटरवर हा शांत समुद्रकिनारा आहे. हा परिसर निसर्गरम्य आहे. डोंगराळ प्रदेशाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिर बघण्यासारखे आहे. मुरूडपासून कोर्लईपर्यंत समुद्राच्या सान्निध्यात असलेला रस्ता एक सुंदर अनुभव देतो. 

फणसाड अभयारण्य

फणसाड अभयारण्य :
हे अभयारण्य मुरूड अणि रोहा तालुक्यात येते. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र स्वातंत्र्यपूर्व काळात मुरूड-जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे शिकार स्थळ म्हणून या जंगलाचा वापर होत असे. या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे व निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौरस किलोमीटर आहे. 

फणसाड अभयारण्यातील एक रम्य अशी पाणथळ जागा

फणसाडच्या अभयारण्यात बैलगाडीनं फिरण्याची मजा औरचफणसाडमध्ये ७०० प्रकारचे वृक्ष बघण्यास मिळतात. त्यात प्रामुख्याने अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, नीलगिरी आणि सावर यांचा समावेश होतो. अशोक, कुर्डू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पतीही येथे आढळतात. १७ प्रकारचे प्राणी आणि ९०हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे येथे आढळतात. गारंबीच्या वेली हे येथील प्रमुख आकर्षण आहे. १०० मीटरपेक्षाही लांब वाढणारी वनस्पती असे तिचे वैशिष्ट्य आहे व वेलींच्या शेंगांमधील गर येथील शेकरूंना खूप आवडतो. त्यामुळे याचा गर खाण्यासाठी येणारे शेकरूही तुम्ही पाहू शकता. दुर्मीळ असा धनेश पक्षी या अभयारण्यात हमखास दिसतो. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळिंदर आदी प्राणीही आहेत. बिबट्याचे हमखास दर्शन येथे घडते. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप, येथे आढळतात. महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखराचा मान दिलेले ब्लू मोरमोन फुलपाखरू येथे आढळते. शेकरू हेदेखील महाराष्ट्राचे आणखी एक मानचिन्ह आहे. अभयारण्याच्या जवळच अलिबाग-मुरूड रोडवरील बोर्ली येथून साडेतीन किलोमीटर अंतरावर फणसाड धबधबा आहे. येथे पर्यावरणाच्या दृष्टीने कडक नियम पाळले जातात. प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे. (फणसाड अभयारण्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोर्लई  किल्ला

कोर्लई किल्ला :
कुंडलिका नदी सागराला मिळते, तेथे कोर्लईचे दर्शन होते. कुंडलिका नदी ही रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका आणि मुरूड तालुक्याची हद्द आहे. कोर्लई किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कोर्लई गावातून जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव आहे. शेजारीच कोळीवाडा आहे. कोळीवाड्यातूनच आपल्याला किल्ल्याकडे जावे लागते. किल्ल्याचा डोंगर एखाद्या भू-शिरासारखा पाण्यात घुसलेला आहे. हा किल्ला सन १५२१मध्ये दियोगू लोपिश दी सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकाऱ्याने बांधल्याचे म्हटले जाते. 

कोर्लई  किल्ला

येथे पोर्तुगीजांनी बांधलेले एक चर्च असून, चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर पोर्तुगीज शिलालेखही दिसतो. सध्या याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याने हाती घेतले आहे. बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून, त्यासमोर दोन वृंदावने दिसून येतात. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोर्लईवर ताबा मिळवला होता. त्यानंतर १८१८मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला. 

किल्ल्याच्या खालील बाजूस जुने दीपगृह आहे. तेथे जाण्यासाठी पायऱ्याही आहेत. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याच्या तटबंदीचे दृष्य छान दिसते. कोर्लईची तटबंदी, त्याचे आठ-दहा दरवाजे आजही चांगल्या स्थितीत आहे. येथे बुरुजांवर असलेल्या रोखलेल्या तोफा आणि सागराचे तीन बाजूने होणारे दर्शन अप्रतिम. कोर्लई गावाजवळच एक सुंदर बीचही आहे. 

कसे जाल मुरूड परिसरात?
मुरूड हे तालुक्याचे ठिकाण असून, अलिबाग-मुरूड सागरी मार्गावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेवरील कोलाड स्टेशन - ५० किलोमीटर. जवळचा विमानतळ - मुंबई - १५० किलोमीटर. लवकरच नवी मुंबई विमानतळ पूर्ण झाल्यावर हे अंतर आणखी कमी होईल. मुरूडपासून कोर्लईपर्यंत भरपूर हॉटेल्स व रिसॉर्टस् आहेत. जुलैमधील मोठ्या पावसाचा कालावधी सोडून वर्षभर केव्हाही येथे जाता येते. सूर्यास्ताची मजा पावसाळ्यानंतरच अनुभवायला मिळते. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

जंजिरा किल्ल्यातील दृश्य
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सतीश इंदापूरकर About 110 Days ago
अतिशय अप्रतिम लेख आणि इतिहास
0
0

Select Language
Share Link
 
Search