Next
या दिल की सुनो...
BOI
Sunday, January 21 | 06:45 AM
15 0 0
Share this story

स्रोत : कैफी आझमीअनेक उत्तमोत्तम रचना करणारे शायर कैफी आझमी यांची जन्मशताब्दी १४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या ‘या दिल की सुनो’ या त्यांनी लिहिलेल्या गीताबद्दल...
.........
१४ जानेवारीला आपण संगीतकार चित्रगुप्त यांची आठवण जागवली. १४ जानेवारी रोजीच १९१९ साली शायर कैफी आझमी यांचा जन्म झाला होता. म्हणजेच यंदाच्या १४ जानेवारीपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. प्रतिभासंपन्न असलेल्या या कवीच्या अनेक सुप्रसिद्ध रचनांनी हिंदी चित्रपट फुलवले, त्यांची कथानके प्रभावी केली, त्यामधील नायक-नायिकांच्या भावनांना वाचा फोडली आणि ती काव्ये रसिकांनी आपल्या संग्रही ठेवली. आजही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला ‘कर चले हम फिदा’ हे १९९४च्या ‘हकीकत’मधील गाणे ऐकल्याशिवाय हे राष्ट्रीय सण साजरे झाल्यासारखे वाटत नाही. या गीताचे शब्द कैफी आझमी यांचे होते.
फक्त देशभक्तिपरच नव्हे, तर प्रेम, आनंद, उदासी, वेदना अशा विविध भावना प्रकट करणारी त्यांची एकेक गीते म्हणजे अस्सल हिरे आहेत. विशेष म्हणजे १९७०नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा हिंदी चित्रपटांच्या कथानकात सूड-प्रतिशोध अशा प्रकारची लाट आली, सुवर्णकाळ संपून एक दशक संपले, तरीही त्यानंतर कैफी आझमी यांनी ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...’ (अर्थ), ‘ए दिलें नादान आरजू क्या है...’ (रझिया सुलतान), ‘माना हो तुम बेहद हँसी...’ (टूटे खिलौने), यूँ ही कोई मिल गया था.....’ (पाकिजा) अशी सुंदर, अर्थपूर्ण गाणी देऊन आपल्या प्रतिभेचा सुंदर आविष्कार दाखवला होता व रसिकांना तो आवडलाही होता.

उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील मिजवां या गावात १४ जानेवारी १९१९ रोजी कैफी आझमी यांचा जन्म झाला होता. सय्यद अख्तर हुसैन रिझवी असे त्यांचे मूळ नाव होते. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. १९व्या वर्षी ते कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांमध्ये मिसळले आणि त्यांच्या पत्रिकेत लेखन करू लागले. १९४७मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी ‘मजदूर मोहल्ला’ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले. 

१९५१मधील ‘बुझदिल’ या चित्रपटातील काही गाणी त्यांनी गीतकार शैलेंद्र यांच्याबरोबर लिहिली. त्यातील ‘रोते रोते गुजर गयी रात रे’ हे गीत लोकप्रिय झाले. नंतर १९५२मध्ये ‘बहू-बेटी’, १९५४मध्ये ‘गुलबहार’, १९५५मध्ये ‘नाता’ अशी त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार म्हणून वाटचाल सुरू झाली. १९५७पर्यंत त्यांना फारशी प्रसिद्ध मिळाली नाही; पण १९५८च्या ‘लाला रुख’ या चित्रपटातील, ‘है कली कली के लब पर.....’ आणि ‘प्यास कुछ और भी भडका दी.....’ ही दोन गीते खूप लोकप्रिय झाली आणि कैफी आझमी यांचे नांव लोकाच्या ओठांवर आले. १९५९च्या ‘चालीस दिन’ आणि ‘कागज़ के फूल’ या चित्रपटातील गीतांनी तर कैफी आझमी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. १९६१मधील ‘शमा’ ‘शोला और शबनम,’ १९६४मधील ‘हकीकत’, ‘कोहरा,’ ‘मैं सुहागन हूँ,’ १९६५मधील ‘दो दिल,’ ‘फरार,’ १९६६मधील ‘आखरी खत’ अशी त्यांच्या कारकिर्दीची चढती कमान चालू झाली. 

चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून प्रसिद्ध झालेले कैफी आझमी ‘इप्टा’ संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. रंगमंचाशी सक्रियपणे निगडित राहिल्याने चित्रपटगीतांकडील त्यांचे लक्ष थोडे कमी झाले. १९९५च्या ‘नसीम’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘सोने की चिडिया’ चित्रपटातील एक गीत त्यांनी स्वत: गायले होते.

भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पदवीने गौरविले होते. १९७३च्या ‘गर्म हवा’ चित्रपटाचे संवाद, तसेच पटकथा त्यांनी लिहिली होती आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, तसेच फिल्मफेअर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले होते. या व्यतिरिक्त त्यांना ‘सोविएत लँड नेहरू अॅवॉर्ड, उत्तर प्रदेश उर्दू अकादमी आणि साहित्य अकादमी पुरस्कार, गालिब पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांची पत्नी शौकत आझमी या रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार होत्या. त्यांची मुलगी अभिनेत्री शबाना आझमी यांना सारे ओळखतातच! तसेच त्यांचा मुलगा कॅमेरामन बाबा आझमी आणि जावई लेखक-शायर जावेद अख्तर हेही चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कलावंत आहेत. आपली अनेक सुंदर गीते मागे ठेवून हा प्रतिभावंत १० मे २००२ रोजी हे जग सोडून गेला. त्यांचे एक दर्दभरे, पण तरीही सुनहरे असणारे गीत आज पाहू या.

अनेकदा असे घडते, की मनात भावनांचे वादळ उठते. उलटसुलट विचारांनी मन त्रस्त होते; पण तरीही काही बोलावेसे वाटत नाही. गप्प राहावेसे वाटते. कारण आपले दुःख कोण समजून घेणार? उलट शहाजोगपणाचे सल्ले देऊन आपल्या मनाचा त्रास आणखी वाढवणार! त्यापेक्षा गप्प राहिलेले बरे! आपले अपमान आपले अपेक्षाभंग, आपली दुःख - इतरांना त्यात कितपत इंटरेस्ट? आणि जी आपली माणसे समजतो, ती आपला स्वार्थ, पैसा, अहंभाव सांभाळत अंत:करणावर डागण्या देऊन जातात. त्यामुळेच ‘तू गप्प का? काही तरी बोल ना?’ असे सांगणाऱ्यांना म्हणावेसे वाटते -

या मुझ को अभी चुप रहने दो 
मैं गम को खुशी कैसे कह दूँ
जो कहते हैं उनको कहने दो

(तू गप्प का, असे मला विचारणाऱ्या व बेगडी प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या दुनियेतील) लोकांनो, एक तर माझ्या मनीचे बोल, अंत:करणातील खळबळ (ऐकता येत असेल तर) ऐका, अन्यथा मला गप्प राहू दे. (तुम्ही ज्याला सुख समजता त्या) दु:खाला मी सौख्य कसे म्हणू? जे कोणी या दु:खाला सुख म्हणू इच्छित असतील, त्यांनी जरूर त्याला सौख्याची उपमा द्यावी. (माझी ना नाही; पण मी मात्र त्या दु:खाला सुख म्हणू शकत नाही.)

ये फूल चमन में कैसे खिला 
माली की नजर में प्यार नाही 
हसते हुए क्या क्या देख लिया 
अब बहते हैं आँसू बहने दो

(मी म्हणजे या विश्वाच्या बागेतील एक फूल आहे; पण मी केवढा दुर्दैवी आहे. कारण) मी या बगीच्यात उमललो (परंतु ज्याने मला फुलवलं त्या) माळ्याच्या नजरेत (माझ्याबद्दलचे प्रेम नाही) (आतापर्यंत) हसत हसतच मी काय काय पाहात आलो; पण आता अश्रू ढळू लागले आहेत. ते वाहू देत. त्यांना अडवू नका.

अनुपमा चित्रपटाच्या कथेतील नायिकेचा तिचेच वडील जन्मापासून तिरस्कार करत असतात. त्या दृष्टिकोनातून हे वरील कडवे खास लिहून घेतले असावे; मात्र या कडव्यानंतर कवी आपल्या विश्वात जातो व म्हणतो - 

एक ख्वाब खुशी का देखा नही 
देखा जो कभी तो भूल गये 
माँगा हुआ कुछ तुम दे न सके 
जो तुमने दिया वो सहने दो 

एक सौख्याचे स्वप्न मी पाहिले होते; पण तेही मी लगेच विसरून गेलो. (कारण ते पूर्ण होणार नव्हते हे मला जाणवत होते) मी जे मागितले ते तुम्ही देऊ शकला नाहीत (मग किमान) जे (दुःख) तुम्ही मला दिलेत ते तरी मला सहन करू दे!

आणि हे असे सांगितल्यावर अखेरच्या कडव्यात हा शायर समाजातील एक कटू सत्यही सांगतो. 

क्या दर्द किसी का लेगा कोई 
इतना तो किसीमें दर्द नही 
बहते हुए आँसू और बहे 
अब ऐसी तसल्ली रहने दो

(एखाद्याचं दुःख आपणहून स्वीकारायला त्या स्वीकारणाऱ्यानं दुःखाचा अनुभव घेतलेला असावा लागतो. अन्यथा त्या दुसऱ्याच्या दु:खाने तो गडबडून जातो. माझ्या सभोवताली असणाऱ्या बेगडी प्रेमिकांनो) असे कोणी दुसऱ्याचे दु:ख अनुभवले नसेल (म्हणूनच) हे वाहणारे अश्रू असेच वाहू देत. आता (त्यासाठी असे खोटे खोटे सांत्वनही नको. 

कैफी आझमी यांनी या काव्यात जेवढे प्रभावी शब्द वापरून दर्द भरला आहे, तेवढीच यथायोग्य चाल आणि वाद्यमेळ आणि स्वर ही जबाबदारी संगीतकार, गायक हेमंत कुमार यांनी उत्तमरीत्या सांभाळली आहे. नायिकेची व्यथा सांगणारे गीत नायक म्हणतो. सुरुवातीच्या काळातील आकर्षक धर्मेंद्र, अबोल शर्मिला! ऐकणे, पाहणे... अशा सर्व दृष्टीने हे दर्दभरे पण ‘सुनहरे’ असलेले गीत! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link