Next
भजनी मंडळ ते राज्य पुरस्कार; विजय गवंडे यांचा प्रेरक प्रवास
BOI
Tuesday, May 08 | 01:29 PM
15 0 0
Share this story

विजय गवंडे
मुंबई : ‘रेडू’ या आगामी मराठी/मालवणी चित्रपटातील ‘देवाक् काळजी रे...’ हे गाणे सध्या बरेच लोकप्रिय झाले आहे. सहा मे रोजी यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या या गाण्याचा व्हिडिओ आठ मेपर्यंत तब्बल ९४ हजार जणांनी पाहिला आहे. या चित्रपटातील गीतांना विजय नारायण गवंडे या तरुण संगीतकाराने संगीत दिले आहे. ५५व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना राज्य पुरस्कार मिळण्याचे हे सलग दुसरे वर्ष असून, लहानपणी भजनी मंडळात वडिलांबरोबर साथसंगत करणारा मुलगा ते राज्य पुरस्कार विजेते संगीतकार इथपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

कोणत्याही कला क्षेत्रातील आवड आणि त्यामधील सातत्य त्या कलाकाराला महान बनवत असते. विजय नारायण गवंडे यांच्या बाबतीत आपल्याला तेच पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील वालावल हे विजय यांचे गाव. लहानपणापासूनच विजय आपल्या वडिलांच्या भजनी मंडळाला साथसंगत करायचा. गणेशोत्सव असो, की अन्य कोणताही उत्सव, विजय आणि त्याची मित्रमंडळी त्या कार्यक्रमात हिरीरीने भाग घ्यायची. संगीताचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता विजय कोणतेही वाद्य अगदी लीलया वाजवायचा. वाडीतील लोकांना त्याचे संगीत खूप आवडायचे. शाळेत असताना अनेक कवितांना वेगळ्या चाली लावून, संगीत देऊन त्या विजय मित्र-मैत्रिणींना ऐकवायचा. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर विजयने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाणी आणि वाद्यांच्या आवडीमुळे अनेक नवीन मित्रमंडळी जोडली. 

विजयला एकदा मित्राने एका ऑर्केस्ट्राचे तिकीट दिले. त्या वेळी ऑर्केस्ट्रातील सिंथेसायझर आणि इतर आधुनिक वाद्ये पाहून विजय आश्चर्यचकित झाला. ही नवीन वाद्ये शिकायचा ध्यास विजयने घेतला. १९९४ सालच्या दरम्यान वडिलांकडून पैसे घेऊन एक नवीन सिंथेसायझर विकत घेतला आणि तिथून विजयचा संगीतातील आधुनिक वाटेवरचा प्रवास सुरू झाला. 

सुरुवातीच्या काळात विजय पुण्यात एका ऑर्केस्ट्राला साथ देऊ लागला. एके दिवशी त्याच ऑर्केस्ट्रातील प्रमुख संगीतकार आजारी पडले. त्या वेळी घाबरत घाबरत विजयने संपूर्ण कार्यक्रम उत्तमपणे पार पाडला. पुढे ‘चौफुला’ आणि इतर मोठे सांस्कृतिक कार्यक्रमही त्याने केले. उषा मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गजांना साथसंगत देण्याची संधीही त्याला मिळाली.

२००४ साली विजय यांनी मुंबई गाठली. एका ओळखीच्या गायकाने पार्श्वसंगीताचे काम दिले. मुंबईत विजय ज्या ठिकाणी राहायचे, तेथे शेजारी एक बंगाली व्यक्ती राहायची. विजय यांचा रोजचा सराव आणि रियाझ पाहून त्या व्यक्तीने त्यांचा गाण्याचा अल्बम करण्याची विनंती केली. मिलिंद शांताराम नांदगावकरांच्या स्टुडिओत गाणे रेकॉर्ड झाले. यातूनच पुढे अनेक चित्रपटांना विजय यांनी पार्श्वसंगीत आणि संगीत दिले. मराठीतील पार्श्वसंगीतासाठी त्यांना पहिल्यांदा पुरस्कार जाहीर झाला. ‘जोगवा’ या चित्रपटाला पार्श्वसंगीतासाठी संस्कृती कला दर्पणचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. पांगिरा, जिंदगी विराट या चित्रपटांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिले होते. गेल्या वर्षीच्या म्हणजेच ५४व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात विजय यांना ‘माचीवरला बुधा’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाला होता. यंदा ‘रेडू’साठी उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला.

‘रेडू’ चित्रपटातील सध्या हिट झालेले ‘देवाक काळजी रे’ हे गाणे गुरू ठाकूर यांनी लिहिलेले असून, ते अजय गोगावले यांनी गायले आहे. विजय यांनी संगीत दिलेला ‘आटपाडी नाइट्स’ हा चित्रपटही लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. अशा प्रकारे विजय यांची वाटचाल सुरू आहे.

(विजय गवंडे यांनी संगीत दिलेल्या, सध्या गाजत असलेल्या ‘देवाक् काळजी रे’ या गाण्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link