Next
मॅगसेसे पुरस्कारविजेत्यांमध्ये दोन भारतीय
डॉ. भरत वाटवानी आणि सोनम वांगचुक यांचा गौरव होणार
BOI
Thursday, July 26, 2018 | 06:11 PM
15 0 0
Share this article:‘हमको तो राहें थी चलाती, वो खुद अपनी राह बनाता....’
या शब्दांत ज्याचे वर्णन ‘थ्री इडियट्स’मध्ये केलेले आहे, तो ‘फुंगसुक वांगडू’ म्हणजेच प्रत्यक्षातले सोनम वांगचुक यांची यंदाच्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच भारतातून डॉ. भरत वाटवानी यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या हजारो मनोरुग्णांवर प्रेमाने उपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणारे डॉ. भरत वाटवानी आणि निसर्ग, संस्कृती व शिक्षण यांच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी लडाखसारख्या दुर्गम भागात झटणारे सोनम वांगचुक यांच्या कार्याचा या पुरस्कारामुळे गौरव झाला आहे.

आशियातील नोबेल पारितोषिक समजले जाणारे हे पुरस्कार फिलिपिन्सचे दिवंगत अध्यक्ष रेमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिले जातात. रेमन मॅगसेसे अॅवॉर्ड फाउंडेशनकडून २६ जुलै २०१८ रोजी यंदाच्या पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली. ३१ ऑगस्ट रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.


यंदाच्या पुरस्कारविजेत्यांबद्दल : 

सोनम वांगचुक :
श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी शिक्षणासाठी पैसे मिळवण्याकरिता क्लासेस घेतले. त्या वेळी ते १९ वर्षांचे होते. तयारी न झालेल्या अनेक मुलांना त्यांच्या शिकवणीमुळे नॅशनल कॉलेज मॅट्रिक्युलेशन परीक्षेत चांगले यश मिळवता आले. इंजिनीअरिंगची पदवी मिळाल्यानंतर वांगचुक यांनी १९८८मध्ये ‘स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी लडाखसारख्या दुर्गम भागातल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यापैकी किमान ९५ टक्के मुले अशी होती, की ती सरकारी परीक्षांमध्ये हमखास नापास होत असत. त्या मुलांना या संस्थेमुळे एक चांगला मार्गदर्शक मिळाला. १९९४मध्ये वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन न्यू होप’ची सुरुवात करण्यात आली. भागीदारीवर आधारित शिक्षण पुनर्रचना कार्यक्रमाचा विस्तार करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. या मोहिमेला त्यांनी अक्षरशः वाहून घेतले. त्यामुळे त्या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्या भागातील ७०० शिक्षक, एक हजार नेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मॅट्रिकच्या परीक्षेत तेथील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १९९६मध्ये केवळ पाच टक्के होते. ते २०१५मध्ये ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हीच वांगचुक यांच्या कार्याची किमया आहे. उत्तर भारतातील दुर्गम भागातील शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करून ती शिस्तबद्ध आणि सर्व घटकांना सामावून घेणारी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लडाखमधील युवकांच्या संधींमध्ये वाढ झाली. स्थानिक समाजाच्या सर्व घटकांच्या आर्थिक प्रगतीसाठी विज्ञान आणि संस्कृतीचा सुयोग्य वापर करण्यातून त्यांनी जे रचनात्मक कार्य केले आहे, त्यातून जगभरातील अल्पसंख्य लोकांच्या विकासासाठी एक आदर्श उदाहरण उभे राहिले असल्याचे पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे. 

डॉ. भरत वाटवानी : अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल करत शिक्षण घेत, भरत वाटवानी यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये मानसशास्त्रातील वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्नीसह एक वेगळी मोहीम हाती घेतली, ती म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या क्लिनिकमध्ये आणून त्यांच्यावर उपचार करण्याची. त्यातूनच १९८८मध्ये त्यांनी श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना केली. रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर मनोरुग्णांना आणून त्यांना मोफत अन्न, वस्त्र, निवारा आणि मानसोपचार या सुविधा देणे आणि त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्याशी त्यांची गाठ घालून देणे हा या केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश होता. त्यांच्या या कार्याला पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचीही मदत मिळू लागली. कर्जतमधील त्यांच्या या केंद्रात वैयक्तिक स्वच्छतेपासून वैद्यकीय उपचार, मानसोपचार अशा सगळ्या सुविधा मनोरुग्णांना दिल्या जातात. अत्यंत कठीण परिस्थितीत जगत असलेल्या व्यक्तींनाही सन्मानाने सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्कार समितीने केला आहे. 

युक चँग, कंबोडिया : कंबोडियातील भीषण नरसंहारातून वाचलेल्या मोजक्या लोकांपैकी एक असलेल्या युक यांनी वयाच्या १७व्या वर्षी स्वतःच्या जिवलगांच्या भयानक मृत्यूचे दुःख सोसले. १९७५ ते १९७९ या कालावधीत ख्मेर रोग याच्या राजवटीत पोल पॉट याच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या भीषण नरसंहारात १५ ते ३० लाख कंबोडियन नागरिकांना ठार करण्यात आले होते. युक चँग यांनी थायलंड सीमेद्वारे निर्वासित म्हणून अमेरिकेत प्रवेश केला. या दुःखद घटनांतून बाहेर येऊन त्यांनी या सगळ्या भीषण घटनांच्या नोंदींसाठी आपले आयुष्य वाहून घेतले. त्याचा उपयोग न्याय मिळवून देण्यासाठी आणि देशाच्या पुनर्उभारणीसाठी झाला. त्यांचे कार्य केवळ भूतकाळाकडेच पाहत नाही, तर देशाच्या भविष्याकडेही पाहते, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 


हॉवर्ड डी, फिलिपिन्स : एका मध्यमवर्गीय चिनी कुटुंबात जन्माला आलेल्या हॉवर्ड यांच्याकडे लहानपणापासूनच सामाजिक दृष्टिकोन होता. १९७०मध्ये त्यांनी ‘फिलिपिन बिझनेस फॉर सोशल प्रोग्रेस’ची स्थापना केली. यामधील सदस्य कंपन्या त्यांच्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सामाजिक विकासासाठी देतात. ‘न्यायासह विकासाच्या माध्यमातून शांतता’ हे तत्त्व घेऊन त्यांनी १९७५मध्ये असिसी डेव्हलपमेंट फाउंडेशन स्थापन केले. गेल्या चार दशकांत या संस्थेने ४१२३ प्रकल्प राबवले असून, त्याचा फायदा फिलिपिन्सच्या एक कोटीहून अधिक नागरिकांना झाला आहे. 


मारिया डी लोर्डस् मार्टिन्स क्रूझ, पूर्व तिमोर : मना लोऊ या नावाने प्रसिद्ध असलेल्या मारिया या एका कॉफी उत्पादक शेतकरी दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या सात बहिणींपैकी एक. १९८९मध्ये त्यांनी ‘सेक्युल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रदर्स अँड सिस्टर्स इन ख्रिस्त’ या संस्थेची स्थापना केली. आरोग्य, शिक्षण, शेती, पशुपालन आणि अन्य स्वमदत उपक्रमांतून गरिबांतल्या गरीब समाजाचा विकास करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली. अमेरिकन डॉक्टरच्या सहकार्याने मना लोऊ यांनी स्थापन केलेल्या बैरो-आटा क्लिनिकमध्ये दिवसाला किमान ३०० गरीब मोफत उपचार घेतात. ‘टीबी’वरील उपचार पुरविणारी ही त्या देशातील सर्वांत मोठी संस्था आहे. 


व्हो थी होंग येन, व्हिएतनाम : व्हिएतनामच्या डोंग नै या प्रांतातील दुर्गम गावात जन्मलेल्या व्हो थी यांना अडीच वर्षाची असताना पोलिओ झाला. त्यामुळे परावलंबी जिणे नशिबात आले; मात्र त्यांनी जिद्दीने अभ्यास करून हो चि मिन्ह विद्यापीठातून पदवी मिळवून कान्सस विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवली. तिथे त्यांनी २००४मध्ये मानव विकास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. अन्य तीन अपंग सहकाऱ्यांसह त्यांनी हो चि मिन्ह शहरात २००५मध्ये डिसेबिलिटी रिसर्च अँड कपॅसिटी डेव्हलपमेंट अर्थात अपंग संशोधन आणि क्षमतावृद्धी ही ना-नफा तत्त्वावर चालणारी संघटना सुरू केली. अपंगांकरिता समान आणि भेदभाव न करणारा समाज विकसित करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. गेल्या १३ वर्षांत या संस्थेने कौशल्यविकास, क्षमतावृद्धी, स्कॉलरशिप्स, नोकऱ्या, आवश्यक उपकरणे, कम्प्युटर्सच्या देणग्या, अपंगांसाठीच्या कायद्यांसाठीची वेबसाइट, अपंगांनाही वापरता येईल अशा सार्वजनिक साधनांचा डिजिटल मॅप तयार करणे अशा विविध माध्यमांतून १५ हजार अपंगांना साह्य केले आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search