Next
‘अल्काझी टाइम्स’ची मनोरम सफर
BOI
Thursday, August 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:अमाल अल्लाना आणि त्यांचे पती निस्सार अल्लाना यांनी मेहनत घेऊन इब्राहिम अल्काझी यांच्यासारख्या कलाकाराचे प्रचंड व्यक्तिमत्त्व आणि कार्य सहज समजेल अशा सोप्या दृश्यांच्या रूपात प्रदर्शनाच्या माध्यमात मांडले होते. अल्काझी यांच्या ५० वर्षांच्या विविधांगी कारकिर्दीचा आढावा कलेच्या वेगवेगळ्या माध्यमांतून या प्रदर्शनात घेण्यात आला होता. कलावंत कोणालाही क्षेत्रातला असो, त्याला समृद्धीकडे नेणारा अनुभव हे प्रदर्शन पाहून मिळाला. ‘स्मरणचित्रे’ सदरात या वेळी त्या अनोख्या प्रदर्शनाबद्दल...
.........
एखाद्या कलावंताचे पन्नास वर्षांचे योगदान एकाच प्रदर्शनास मांडायचे म्हणजे एका प्रकारे आव्हानच म्हणावे लागेल. असे आव्हान अमाल अल्लाना आणि त्यांचे पती निस्सार अल्लाना यांनी स्वीकारले. वर्ष-दीड वर्षाची मेहनत घेऊन त्यांनी इब्राहिम अल्काझी यांच्यासारख्या कलाकाराचे प्रचंड व्यक्तिमत्त्व आणि कार्य सहज समजेल अशा सोप्या दृश्यांच्या रूपात प्रदर्शनाच्या माध्यमात मांडले. हे प्रदर्शन पाहणे म्हणजे एक चिरस्मरणीय अनुभव होता. २०१६च्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालयात हे महत्त्वपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे शीर्षक होते ‘दी थिएटर ऑफ इब्राहिम अल्काझी - ए  मॉडर्निस्ट अॅप्रोच टू इंडियन थिएटर... ’

त्याचे झाले असे, की एका बैठकीसाठी मी मुंबईला गेलो होतो. कला इतिहासाच्या प्राध्यापिका डॉ. मनीषा पाटील यांनी ‘अल्काझींचे प्रदर्शन पाहाच’ असा सल्ला दिला आणि तत्काळ मी आणि केशव कासार आधुनिक कलासंग्रहालयात दाखल झालो. दुपारचे दोन वाजले होते. पांढऱ्या शुभ्र कपड्यांतील एक प्रौढ महिला समोर उभी राहिली आणि ‘तुम्ही गायडेड टूरसाठी आलायत का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ ‘हो’ म्हटले. त्यांनी थोडा वेळ वाट पाहायला सांगितली. बरोबर दहा मिनिटांनी त्या पुन्हा आल्या आणि ‘मी अमाल अल्लाना. इब्राहिम अल्काझींची मुलगी’ अस सांगून त्यांनी गायटेड टूरला सुरवात केली. प्रत्यक्ष क्युरेटर आणि अल्काझींची मुलगीच त्यांच्याविषयीच्या प्रदर्शनाची माहिती फिरून सांगणार म्हणून आम्ही उत्साहात होतो. इतक्यात विजया मेहता व त्यांचे पती तेथे आले आणि आमचा प्रदर्शन पाहण्याचा प्रवास सहा-सात लोकांसमवेत सुरू झाला. या प्रदर्शनाची मांडणी आणि तपशील केवळ असामान्य असाच होता.. अल्काझींचा जन्म (१८ ऑक्टोबर १९२५) पुण्यात एका अरबी व्यापारी कुटुंबात झाला. घरचा मसाल्याच्या पदार्थांचा व्यवसाय. प्रदर्शनाची सुरुवात अल्काझी कुटुंबाच्या फोटोग्राफ्सने झालेली. काळ समोर उभा करण्याचे सामर्थ्य या फोटोंच्या मांडणीत होते. १९२५च्या दशकातील वृत्तपत्रीय कात्रणे, बातम्या, जाहिराती आणि इतर दृश्य साहित्याद्वारे आणि कालरेषेद्वारे हा अनुभव प्रभावी करण्यात आला होता. भारतात, जगात त्या काळात काय महत्त्वाच्या घटना घडत होत्या, त्याचा गोषवारा दृश्यरूपात घेतला गेला होता. ‘रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट’मध्ये (राडा) त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आकर्षक, परंतु काल्पनिक रूपात ‘अल्काझी टाइम्स’ असे शीर्षक असलेल्या वृत्तपत्राच्या भल्यामोठ्या पॅनेलवर ही माहिती दृश्य रूपात मांडली होती. कालक्रमाचा आढावा त्यात होता. पहिल्या मजल्यावर काही विभाग होते. एका विभागात चित्रकार हुसेन यांनी काढलेले अमाल अल्लाना यांचे बालरूपातील चित्र होते. हुसेन, तय्यब मेहता आणि अनेक चित्रकारांचे स्टुडिओ पूर्वी मुंबईच्या भुलाभाई देसाई इन्स्टिट्यूटमध्ये होते आणि तेथेच अल्काझींचा नाट्य विभाग होता. त्या वेळी हुसेन यांनी रेखाटलेले हे अमाल यांचे चित्र. तेथे शिल्पकार बाकरे यांचे लाकडी शिल्पही होते. दृश्यकला आणि ‘थिएटर’सारखी प्रायोगिक कला यांचा योग्य संबंध अल्काझी यांनी सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच भारतात जुळवून आणला होता आणि तेव्हाच्या प्रयोगशील चित्रकारांनी त्याला साथ दिली होती. नाटकांशी संबंधित अनेक दस्तऐवज व्यवस्थित मांडलेले होते. अशा प्रयोगामागे अल्काझी कसे खंबीरपणे उभे असत,  याचे साक्षीदार असलेले फोटो आपण आज ज्याला इन्स्टॉलेशन आर्ट म्हणतो अशा मांडणी रूपात प्रदर्शित केले होते. खोक्याच्या चारही बाजूंना खोकी आणि चार ते पाच खोकी एकावर एक ठेवलेली अशी आकर्षक मांडणी होती. सुरुवातीच्या काळात अल्काझी मुंबईत प्रयोग करत, त्या काळातील फोटोही होते. विजया मेहता अल्काझींच्या विद्यार्थिनी असल्याने हा सगळा काळ त्यांनी अनुभवलेला. त्यामुळे त्यांच्यासह हे प्रदर्शन पाहताना तो तो काळ अनुभवता आला. 

अमाल अल्लाना आणि निस्सार अल्लानाअल्काझींनी प्रयोगांसाठी कुठे तरी थिएटर शोधत बसण्यापेक्षा आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरच लहानशी बैठकव्यवस्था करून थिएटर उभे केले होते. ते प्रचंड कल्पक होते. नाटकांविषयीच्या पुस्तकांमध्ये ह्याचे उल्लेख वाचनात आले होते. खुद्द विजया मेहतांच्या ‘झिम्मा’ या पुस्तकाचे वाचन मी नुकतेच पूर्ण केले होते, म्हणून प्रदर्शनातील अनेक संदर्भ उलगडत होते. अलेक्झांड काल्डर हा जगप्रसिद्ध शिल्पकार मुंबईत आला होता, तेव्हा त्याने अल्काझींच्या नाटकाच्या विद्यार्थ्यांना त्याची शिल्पे कशी पाहावीत, याबाबत एक व्याख्यान दिले होते आणि हलते शिल्पही दाखवले होते. त्या वेळी टिपलेले त्याचे फोटो होते. अनेक कलांच्या आकलनाने नाट्य बहरते आणि इतर कलांनाही परिपक्व होण्यास त्याचा फायदा होतो, अशा अनेक विचारांचा अल्काझींनी प्रत्यक्ष कृतीत अंगीकार केला होता. त्याचा प्रत्यय प्रदर्शनातील नानाविध वस्तूंची मांडणी आणि फोटोग्राफ्स देत होते. अल्काझींच्या या गच्चीतील थिएटरचे तंतोतंत प्रमाणबद्ध लहान मॉडेल त्यांच्या जावयांनी म्हणजे थिएटर डिझायनर निस्सार अल्लाना यांनी तयार यांनी तयार केले होते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांच्या सेट्सच्या लहान लहान प्रतिकृती मॉडेलच्या स्वरूपात मांडलेल्या होत्या. अल्काझी शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध होते. वेळेबाबत आणि दर्जाबाबत ते काटेकोर होते. प्रदर्शनाची मांडणीदेखील या गुणाचे प्रतीकात्मक स्वरूप होते. त्यांच्या बहुअंगी असण्याचे दर्शन प्रदर्शनातून घडवण्यात निस्सार यांच्या डिझाइनचा मोठा वाटा होता. इब्राहिम अल्काझी आणि रोशन अल्काझीअल्काझींनी दिल्लीत गेल्यावर ‘हेरिटेज’ नावाने कलादालन चालवले होते. समकालीन चित्रे, फोटोग्राफ यांचा संग्रह केला होता. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणे तितकेसे सोपे नाही. परंतु नाटककार असण्याबरोबरच नाट्यशाळेचे सर्वेसर्वा असताना रोहिणी हट्टंगडी, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा यांच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या काही पिढ्या अल्काझींनी घडवल्या. भारतात नाट्यकला शिक्षण आधुनिक काळात प्रायोगिक रूपात रुजवण्यामध्ये अल्काझींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्या योगदानाच्या फोटोंची मांडणी दालनाच्या दुसऱ्या मजल्यावर होती. अल्काझींच्या पत्नी रोशन या नामवंत वेशभूषाकार. भारतीय पोशाखावर त्यांचे तीन महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अल्काझींच्या नाटकातील वेशभूषेचा भाग त्या सांभाळत. या घटनांचाही मांडणीत सहभाग होता. रोशनजींची मूळ रेखाचित्रे आणि अल्काझींची मूळ रेखाटने मांडण्यात आली होती. यामुळे त्यांच्यातील कलागुणांचे अनेक अंगांनी दर्शन घडत होते. 

सर्वांत वरच्या मजल्यावर त्यांच्या मुलाखती, नाटकांच्या चित्रणाच्या फितींचे, नाटक बसवतानाचे चित्रीकरण यांनी हा अनुभव समृद्ध केला गेला होता. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर’ असे काहीसे वाटत होते. सोबत अमाल काही अनुभव सांगत होत्या. गिरीश कार्नाडांचे ‘तुघलक,’ मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन,’ धर्मवीर भारतींचे ‘अंधा युग’ अशा अल्काझींनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांच्या अंशांचे चित्रीकरण फितीद्वारे प्रक्षेपित केले गेले होते. हे सगळे एकत्रित पाहायला मिळणे दुर्मीळ होते. स्वातंत्र्योत्तर भारतात कलेचा पाया उभा करणाऱ्या मोजक्या मंडळीतील एक व्यक्ती म्हणजे अल्काझी. भारतीय लोकधर्मी नाट्य आणि आंतरराष्ट्रीय कलात्मक अभिरुची यांचा मिलाफ त्यांनी घडवला होता. दोन दशके मुंबईत प्रयोग करून ते दिल्लीला गेले. राष्ट्रीय नाट्यशाळेमध्ये (NSD) संचालक म्हणून त्यांनी कार्य केले. 

अल्काझींच्या पन्नासहून जास्त नाटकांपैकी निवडक नाटकांची पोस्टर्स तळमजल्यावर मांडण्यात आली होती. अल्काझींनी रेखाटलेली मूळ चित्रेही त्यात होती. कलावंत कोणालाही क्षेत्रातला असो, त्याला समृद्धीकडे नेणारा हा अनुभव होता. ‘ए मॉडर्निस्ट अॅप्रोच टू इंडियन थिएटर’ हे निस्सार आणि अमाल यांचे अल्काझींविषयीचे संपूर्ण ‘सीनिक डिझाइन’ होते.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(हे प्रदर्शन, तसेच इब्राहिम अल्काझींविषयीच्या काही व्हिडिओंच्या लिंक्स सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search