Next
राधाकृष्णाच्या प्रेमावरील तरल प्रेमकथा
प्रेस रिलीज
Wednesday, August 22, 2018 | 01:49 PM
15 0 0
Share this storyपुणे :
राधाकृष्णाच्या अमर प्रेमावर आधारित असलेली एक तरल प्रेमकथा ‘मीट मी ऑन दी मेडो’ या संगीतनृत्यातून मांडण्यात आली आहे. अनिता कुलकर्णी निर्मित-दिग्दर्शित असलेल्या या कार्यक्रमाचे शनिवारी, २५ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री आठ वाजता पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात सादरीकरण होणार आहे. कथक नृत्यशैलीत आणि हिंदुस्थानी संगीताच्या फ्युजन्समधून ही नयनरम्य कथा फुलत जाते. हे नाटक अभिजात भारतीय नृत्यसंगीतातील सौंदर्य एका वेगळ्याच भव्यदिव्यतेने पेश करते. मल्टिमीडियाचा नेत्रदीपक उपयोग समृद्ध शास्त्रीय नृत्यसंगीतासोबत करणारा हा एक विशेष प्रयोग आहे. नृत्यसंगीताबरोबरच काव्य, चित्रकला, रेखाटने अशा अनेक कलाप्रकारांचा समन्वय यात साधला गेला आहे. ही आधुनिक प्रेमकथा जागतिक तरुणाईला कालातीत संदेश देऊन जाते.
पेशाने वास्तुशास्त्रज्ञ असलेल्या अनिता कुलकर्णी यांची ही संकल्पना आहे. ‘संगीताला त्रिमिती मिळते आणि अशी एखादी निर्मिती साकार होते,’ अशी अनुभूती त्या व्यक्त करतात. ‘संपन्न कलासंस्कृतीचा भरत-वारसा जपावा, जागतिक मंचावर न्यावा, उत्कृष्ट कला समाजासमोर आणावी, पेशा म्हणून शास्त्रीय कला निवडणाऱ्या कलाकारांचा गौरव करावा, अशी अनेक उद्दिष्टे ठेवून मी कार्यरत आहे,’ असे अनिता कुलकर्णी सांगतात.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शर्वरी जमेनीस आणि नकुल घाणेकर कथक सादर करतात. सत्यजित केळकर, आमोद कुलकर्णी आणि चिन्मय कोल्हटकर या गुणी संगीतकारांनी अनिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची संगीत बांधणी आणि नियोजन केले आहे. एलईडी पडद्यांवरील सुंदर नृत्यांचे दिग्दर्शन तेजस्विनी साठे यांनी केले आहे. मल्टिमीडिया जबाबदारी मकरंद ब्रह्मे आणि चेतन देशमुख यांच्याकडे आहे. उथळ झगमगाटापलीकडे जाणारी आणि कथा उचलून धरणारी नाट्यमय प्रकाशयोजना या कार्यक्रमात पाहायला मिळते. हा प्रयोग मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये होऊ शकतो. इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी ‘वाइड विंग्ज मीडिया’चे कुशल खोत यांच्याकडे असून, हा कार्यक्रम लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यासाठी निघणार आहे.

२५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची तिकिटे कार्यक्रमस्थळी, तसेच बुकमायशो आणि तिकटीज डॉट कॉम या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला, अनिता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मॅग्नोनिया’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. अनिता कुलकर्णी यांच्या भारत व अमेरिका या दोन देशांतील व्यवसायाचे आणि कलाकारीवरचे एक कलंदर स्वानुभवकथन या पुस्तकात आहे. मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link