Next
आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, December 18, 2018 | 03:44 PM
15 0 0
Share this article:औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे ‘बौद्धिक स्वामित्व’ या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन ग्रेट मिशन ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. गणेश हिंगमिरे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी बोलताना डॉ. हिंगमिरे म्हणाले, ‘गरज ही शोधाची जननी आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार करीत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे बौद्धिक संपत्ती आहे. त्याचा योग्य उपयोग केल्यास आपण त्यावर स्वामित्व गाजवू शकतो. भारतात फक्त ५० टक्के क्षमता वापरली जाते. आपल्या देशावर इतर देशांनी राज्य करू नये यासाठी आपण आपल्या बौद्धिक संपत्तीचा वापर करणे आवश्यक आहे.’‘भारतातील अनेक कंपन्यांनी १२० कोटींहून अधिक लायसन्स मिळविलेली आहेत. आपल्याकडे २२ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या नावावर पेटंट मिळवण्याची अनेक उदाहरणे आहेत. एक पेटंट म्हणजे एक मोठी कंपनीच असते. कारण त्यामधून हजारो लोकांना चांगली नोकरी उपलब्ध होते. आयपीआरमध्ये भारताचा २९ टक्के, तर इतर देशांचा ७१ टक्के सहभाग असल्याचे दिसते. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण पेटंट मिळवू शकतो. त्यासाठी फक्त आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करणे आवश्यक आहे,’ डॉ. हिंगमिरे यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील डॉ. बी. पी. सिंग यांनी बौद्धिक संपदा ही मानवी बुद्धीपासून निर्माण होत असून, आपल्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग समाजहितासाठी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. पेटंट म्हणजे काय, पेटंट कसे मिळविता येते आणि पेटंट मिळवण्याची सुरुवात कशी झाली यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.दिल्ली विद्यापीठाच्या डॉ. रेखा चतुर्वेदी यांनी नाविन्यपूर्ण संशोधन कशाप्रकारे करता येईल आणि नाविन्यपूर्ण शोधांमधून समाजाचे कल्याण कसे करता येईल याविषयी, तसेच संशोधन करण्यासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्त्या कशाप्रकारे मिळवता येतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. डब्ल्यू. एम. दुमाने यांनी सामाजिक जाणिवेमधून आपण नाविन्यपूर्ण शोध लावला पाहिजे, असे सांगितले. आपल्या शोधामुळे अनेकांचे कल्याण होणार असेल, तर त्या शोधायला मूल्य प्राप्त होते. बाजारात आलेल्या विविध कंपन्या आणि त्या वापरत असलेला ट्रेडमार्क याबद्दल दुमाने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी पेटंट कशाप्रकारे मिळविता येऊ शकते, ते मिळविण्यासाठी काय करावे लागते, तसेच आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींना पेटंट मिळाले आहे त्या सर्व शास्त्रज्ञांची विविध उदाहरणे देऊन त्यांच्या शोधांची माहिती सांगितली. ‘नाविन्यपूर्ण शोधामुळे आपले आयुष्य बदलून जाते. त्यामुळे आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर नाविन्यपूर्ण शोध लावण्यासाठी करायला पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

कनिष्ठ शास्त्रज्ञ अंकिता नगरकर यांनी मला पहिली कल्पना सोळाव्या वर्षी सुचल्याचे सांगून स्टेपलर वापरताना त्यामधील शेवटच्या पिना रंगविल्या, तर आपल्याला पिना संपण्याचा संदेश मिळतो, या कल्पनेसाठी राष्ट्रीयस्तरावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पारितोषिक मिळाल्याचे सांगितले. नगरकर यांच्या या शोधाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून, आजपर्यंत त्यांनी १० नाविन्यपूर्ण शोध लावले आहेत. कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांच्या त्या रोल मॉडेल आहेत. त्यांच्या आईने ‘माझ्या अंकिताचा शोध’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील लॉ मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या अॅड. डॉ. सुनीता आढाव म्हणाल्या, ‘आपल्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करण्यासाठी आपण नाविन्यपूर्ण शोध लावले पाहिजेत; तसेच आपल्या हक्कांचा योग्य पद्धतीने वापर करून समाजहिताच्या दृष्टीने जागरूक असणे आवश्यक आहे. ‘बौद्धिक स्वामित्त्व’ या विषयावर दोन दिवस जी चर्चा झाली, त्यातून आपल्यामधून एखादा संशोधक अभ्यासक निर्माण होऊ शकेल.’

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘अनेक संशोधक अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना या चर्चासत्राच्या माध्यमातून स्वामित्व हक्क म्हणजे काय, पेटंट म्हणजे काय, ट्रेडमार्क म्हणजे काय या आणि इतर गोष्टींचे सखोल मार्गदर्शन मिळावे, या हेतूने हे चर्चासत्र घेण्यात आले.’या चर्चासत्रात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून विविध संशोधक अभ्यासक सहभागी झाले होते. हे चर्चासत्र  यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. सविता पाटील,  डॉ. संजय नगरकर, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. नलिनी पाचर्णे,   प्रा. एकनाथ झावरे, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. सायली गोसावी, प्रा. कुशल पाखले, प्रा. भक्ती पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. मयूर माळी, डॉ. अतुल चौरे यांचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Atul Choure About 213 Days ago
खूप सुंदर बातमी दिलीत...👍
0
0

Select Language
Share Link
 
Search