Next
दोन-तीन फेब्रुवारीला कोट गावात पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन
झाशीच्या राणीच्या गावात आयोजन
BOI
Wednesday, January 30, 2019 | 03:07 PM
15 0 0
Share this story

लांजा : कोट (ता. लांजा, जि. रत्नागिरी) या झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या गावात दोन आणि तीन फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि कोट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील साहित्यकारांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हे संमेलन आयोजित केले जाते. झाशीच्या राणीचे माहेर (तांबे) लांजा तालुक्यातील कोलधे या गावी असून, तिचे सासर (नेवाळकर) याच तालुक्यातील कोट या गावचे. त्यामुळेच हे संमेलन झाशीच्या राणीला समर्पित आहे. दोन फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, संमेलनस्थळाला शहीद भानू देवू नारकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई रानडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पत्रकार गजाजन वाघदरे हे पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर कवी सुनील दबडे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनस्थळी आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कवी सुहास आयरे यांच्या हस्ते, शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सैनिक सुभाष सावंत यांच्या, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के यांच्या, तर चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कादंबरीकार प्रा. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाच्या नाट्यांशाचे वाचन ‘कलांजली, पुणे’तर्फे केले जाणार आहे. 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण जोशी व्याख्यानातून आपला लेखनप्रवास उलगडणार असून, ‘ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज’ या विषयावर प्रा. डॉ. राहुल मराठे आपले विचार मांडणार आहेत. ‘आईची भूमिका आणि आजची आई’ या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी खेडकर, तर ‘महिलांनी उद्योगात गुंतले पाहिजे’ या विषयावर उद्योजिका उल्का विश्वासराव व्याख्यान देणार आहेत. 

ग्रामीण साहित्य संमेलन पत्रिकेसह काही पुस्तकांचेही या वेळी प्रकाशन होणार आहे. त्याशिवाय, कविसंमेलन, मुलांचे आणि महिलांचे विविध कार्यक्रम आणि ‘भूपाळी ते भैरवी’ हा भैरवी जाधव यांचा सुगम संगीताचा कार्यक्रमही या वेळी होणार आहे. पहिल्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, दुपारी दोन वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. या दिवशी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष धोंडू पां. खांडेकर हे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून, मुंबईतील उद्योजक अनिल पत्याणे उद्घाटक आहेत. कोट गावातील उद्योजक नंदकुमार उर्फ राजू नेवाळकर स्वागताध्यक्ष असून, स्थानिक आमदार राजन साळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, मुंबईतील उद्योजक प्रसाद पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी, लांजा पंचायत समितीचे सभापती संजय नवाथे, उपसभापती युगंधरा हांदे, टीव्ही अभिनेते देवेंद्र देव, मावळते संमेलनाध्यक्ष दशरथ राणे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, समाजसेवक या वेळी उपस्थित राहणार आहेत.
  
राजापूर-लांजा नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुभाष म. लाड हे कार्यक्रमाचे संयोजक असून, त्यांना सरचिटणीस रवींद्र हांदे आणि लांजा शाखाध्यक्ष किरण बेर्डे यांनी साह्य केले आहे. कोट ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाष्टे नियोजन प्रमुख असून, आबा सुर्वे, राजू नेवाळकर, मिलिंद पाध्ये, प्रकाश बाईत आणि सर्व वाडी प्रमुख यांचा नियोजन समितीत समावेश आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dinkar Prabhudesai About 19 Days ago
Wishing all the Best!!!
0
0

Select Language
Share Link