Next
प्रात्यक्षिकासह ‘मायक्रोग्रीन्स’च्या निर्मितीचे मार्गदर्शन
प्रशांत सिनकर
Tuesday, April 09, 2019 | 11:42 AM
15 0 0
Share this article:


डोंबिवली : येथील ‘कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट’ व ‘मैत्री फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मानपाडा रोडवरील राजहंस सोसायटीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या वृक्षामृत वाटप व प्रात्यक्षिक कार्यक्रमात, घरच्या घरी वृक्षामृताच्या साहाय्याने ‘मायक्रोग्रीन्स’ची निर्मिती कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. 

शहरांमध्ये सांडपाण्यावर वाढवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांमुळे अनेक प्रकारचे आजार तसेच दुष्परिणाम होऊ शकतात. यावर उपाय म्हणून घरच्या घरीच मायक्रोग्रीन्स तयार करता येतात, असे या कार्यक्रमात सांगण्यात आले. जागेची कितीही कमतरता असली तरी, घरातलेच सात-आठ कप घेऊन त्यामध्ये वृक्षामृताच्या साहाय्याने मायक्रोग्रीन्सची निर्मिती करता येऊ शकते. याबाबतचे प्रात्यक्षिक या आयोजित वृक्षामृत वाटप कार्यक्रमात दाखवण्यात आले. मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा व लेखिका सृष्टी गुजराथी यांनी हे प्रात्यक्षिक दाखवले.

‘शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे अंश पिकात उतरतात आणि पिकांद्वारे ते मानवी शरीरात प्रवेशतात. यामुळेच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने पीडित असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खतांवर सरकारने बंदी घालावी,’ अशी मागणी सेंद्रिय शेतीचे अभ्यासक डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी या वेळी केली. 

‘आपल्याच बालकनीत वाढलेल्या चार काकड्या खाणे, पिशवीत तयार झालेली मेथीची भाजी करणे, झाडाला लागलेली चार डाळिंबे खाणे यात एक औरच आनंद असतो. स्वतःच्या हातांनी वाढवलेल्या कुंडीतल्या गुलाबाला आलेले एखादे फूलसुद्धा स्ट्रेसबस्टर ठरते. यासाठी फार खर्च किंवा मोठी जागा हवीच असेही नाही. उलट चार भिंतीत घुसमटून रक्तदाब किंवा डिप्रेशनसारख्या आजारांची शिकार झालेल्यांना बागकाम ही एक उकृष्ट थेरपी आहे, याची जाणीवही शहरी शेती करणाऱ्यांना होऊ लागली आहे’, असे गुजराथी यांनी सांगितले. डॉ. तुकाराम सावदेकर यांचेही या वेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर इनामदार यांनी, तर आभारप्रदर्शन राधाकृष्ण गायतोंडे यांनी केले. या वेळी राधाकृष्ण गायतोंडे यांनी अल्पमोली-बहुगुणी अशा वृक्षामृताचे तंत्र उपस्थितांना समजावून सांगितले. उपस्थितांना शहरी शेतीकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच घरच्या घरी भाजीपाला कसा मिळवता येईल, याबाबत डॉ. तुकाराम सावदेकर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांना वृक्षामृताचे मोफत वाटप करण्यात आले. 

या वेळी गोसेवा प्रसारक निर्मला पाध्ये, ब्रँड कन्सल्टंट सुनील देवरुखकर, राधाकृष्ण गायतोंडे, सुरेखा अभ्यंकर, प्रवीण गावडे, प्रसाद अग्निहोत्री, राजेंद्र पाटील, गजेंद्र अडकर, बाबुभाई पटेल, वैष्णवी नवले, मनोज वैद्य, सुधीर बरडे, प्रचिती गावडे, सुनील शेवडे, मृणाल इनामदार, सुनील आंबर्डेकर, विकास अभ्यंकर, शैलेश जोशी, ज्ञानेश्वर परब, डॉ. विजयकुमार पोंक्षे, डॉ. अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित होते.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search