Next
समाज म्हणून आपण इतिहासातून शिकले पाहिजे
प्रशांत तळणीकर यांचे प्रतिपादन; ‘जोनराजकृत राजतरंगिणी’ ग्रंथाच्या अनुवादाचे प्रकाशन
प्रणित जाधव
Saturday, June 22, 2019 | 04:49 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘आजचे वर्तमान हा उद्याचा निर्माण होणारा इतिहास असतो. त्यामुळे एक समाज म्हणून आपण बऱ्याच गोष्टी इतिहासातून शिकू शकतो. इतिहास शिकण्याचे मूळ कारण तेच असते,’ असे प्रतिपादन काश्मीरच्या इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी केले. काश्मिरी राजांची गाथा सांगणाऱ्या ‘जोनराजकृत राजतरंगिणी’ या ग्रंथाच्या त्यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २२ जून रोजी पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

पुण्यातील सरहद संस्था आणि चिनार पब्लिशर्स यांनी संयुक्तपणे या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे होते. या वेळी ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते. 

तळणीकर म्हणाले, ‘राजेशाही आणि लोकशाही या दोन्हींचा संगम आपल्याला काश्मीरमध्ये पाहायला मिळतो. काश्मीरमध्ये राजेशाही होती, हे आपल्याला माहिती आहे; पण तेथील प्रजाच राजाला निवडून द्यायची, हे आपल्याला माहिती नसते.’

राजतरंगिणी या ग्रंथाबद्दल, तसेच त्याच्या अनुवादाबद्दलही तळणीकर यांनी सांगितले. ‘राजतरंगिणी एकूण पाच भागांत आहे. दोन वर्षांपूर्वी डॉ. अरुणा ढेरे यांच्यासोबत पहिल्यांदा ‘राजतरंगिणी’चा मराठी भाषेत अनुवाद करण्याची संधी मला मिळाली. राजतरंगिणी लिहिण्याची परंपरा विद्वान पंडितांपासून सुरू आहे. ती आपण पुढे चालू ठेवावी असा आमचा विचार होता. हा अनुवाद करण्यासाठी मी योगेशचंद्र दत्त यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा आणि रघुनाथ सिंह यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाचा, तसेच मूळ संस्कृत ग्रंथ या सर्वांचा संदर्भ घेतला आहे. एक अनुवादक म्हणून मला हे काम खूप समाधान देणारे होते. ’

डॉ. बहुलकर म्हणाले, ‘राजतरंगिणी हा फक्त इतिहास नसून, त्याला राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे. तसेच ते एक काव्यही आहे आणि त्यातून प्राचीन व मध्ययुगीन काश्मीर कसा होता, ते आपल्याला कळते. आपण इतिहास वाचताना त्यात काल्पनिक काय आहे आणि नेमके सत्य काय याची पडताळणी केली पाहिजे. द. के. केळकर लिखित ‘संस्कृती संगम’ हे पुस्तक वाचल्यानंतर राजतरंगिणी ग्रंथाबद्दल मला आकर्षण निर्माण झाले. काश्मीरमधील शारदा लिपीत लिहिले गेलेले ग्रंथ हा साहित्याचा एक खजिना आहे. तसेच आपण आज हे भाषांतर किंवा अनुवाद करण्याचे कार्य पाहतो, ते सुमारे आठव्या शतकापासून सुरू झाले आहे.’

संजय नहार करत असलेल्या कार्याचे कौतुक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. ‘इतिहास हे एक संचित असते आणि त्यातून आपल्याला भविष्याकडे पाहण्याची दृष्टी मिळते. आपण नेहमी जगभरातील गोष्टींवर बोलतो; पण आपल्या आजूबाजूच्या प्रदेशांकडेच दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्या प्रदेशांबद्दलही आपण माहिती घेणे गरजेचे आहे. सांस्कृतिक अनुबंध नेमके काय असतात, हे या ग्रंथाद्वारे आपल्याला कळेल. आपल्याला आपल्या देशाचा इतिहास हा तुकड्या-तुकड्यांतच समजून घ्यायला हवा आणि मग समग्रतेने आपण त्याकडे पाहू शकतो. महत्त्वाचे म्हणजे अनुवाद हा नागरिकांशी केलेला संवादच असतो आणि तो या ग्रंथाद्वारे चांगल्या रीतीने होईल,’ असे प्रा. जोशी म्हणाले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोरे म्हणाले, ‘काश्मीरच्या संस्कृत इतिहासाचा मराठी भाषेत अनुवाद ही सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची गोष्ट आहे. काश्मीर आणि भारत किंवा ईशान्य भारत आणि भारत यांचा संबंध पाहण्यासाठी आपण महाभारताचा संदर्भ घेऊ शकतो. काश्मीरचा इतिहास हा भारताच्या इतिहासाचा भाग आहे आणि तो वेगळा करता येऊ शकत नाही. राजतरंगिणी लिहिण्याची काश्मीरमध्ये परंपरा आहे आणि ती एखाद्या रिले स्पर्धेसारखी सुरू आहे. पर्शियन भाषेच्या काळात तरंगिणीचे भाषांतर ‘तारीख’मध्ये करण्यात येत होते. ’

काश्मिरातील लोकांची धारणा व तेथील धार्मिक प्रथेबद्दलही डॉ. मोरे यांनी भाष्य केले. ‘तेथील इस्लामी लोकांची अशी धारणा आहे, की सुलेमान येथे आले आणि त्यांनी दोन जीन येथे दिले. त्यातील पहिल्याचे नाव काष्ट आणि दुसऱ्याचे नाव मीर. त्यामुळे जे काही केले आहे ते या दोघांनीच असे ते मानतात. तसेच बौद्ध आणि शैव या दोन धर्मांमधील सहसंबंध आपल्याला काश्मीरमध्ये दिसून येतो,’ असे ते म्हणाले. ‘आजकाल सुरू असलेले जातीय वाद बाजूला सारून हा देश एकसंध कसा ठेवता येईल हे आपण पाहिले पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नहार यांनी केले. ते म्हणाले, ‘आज फक्त एका ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नसून, हा काश्मीरच्या राजकीय, सामाजिक इतिहासावर टाकलेला दृष्टिक्षेप आहे. राजतरंगिणीच्या माध्यमातून काश्मिरी लोकांची, ते जे काही वागतात त्यामागची पार्श्वभूमी कळायला मदत होते. आपल्या संस्कृतीतून जे काही चांगले मिळेल, ते आपण घ्यायला पाहिजे, भले ते कोणत्याही भाषेत असो. त्याचा उपयोग पुढील पिढीसाठी होत असेल तर ते करणे गरजेचे आहे. आम्ही काश्मीरसाठी उभ्या केलेल्या चळवळीत अनेकांनी सहभागी होऊन ती अधिक व्यापक बनवावी, अशी माझी इच्छा आहे.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाहिद भट यांनी केले. शैलेश वाडेकर यांनी आभारप्रदर्शन केले. 


(‘जोनराजकृत राजतरंगिणी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर लवकरच उपलब्ध होणार आहे. याआधी डॉ. अरुणा ढेरे व प्रशांत तळणीकर यांनी अनुवाद केलेले ‘राजतरंगिणी’ हे पुस्तक ‘बुकगंगा’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 104 Days ago
You can not write history if you have no records . But then , you have to write them , in the first place . We , as a society , havo no tradition of writing them . Well , we will have to get the habit . Everything has a beginning . ,
0
0
BDGramopadhye About 113 Days ago
More of similar translations , pl . They woud have to be subsided. Is that scrit very different from Devanagari ? Is it in use today ? Are there people who can read/ write it ?what is its pedigree?
0
0

Select Language
Share Link
 
Search