Next
विजयनगर - भाग दोन
BOI
Wednesday, November 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

विरूपाक्ष मंदिर

जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेल्या विजयनगरमधील काही ठिकाणांची माहिती आपण ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात घेतली. आजच्या भागात आणखी काही सौंदर्यपूर्ण मंदिरे, निसर्गरूपे आणि अभयारण्ये वगैरेंची माहिती घेऊ या. 
.........
विरूपाक्ष मंदिरातील कोरीव काम

विरूपाक्ष मंदिर :
सातव्या शतकापासून विरूपाक्ष मंदिराची इतिहासात नोंद दिसून येते. विरूपाक्ष मंदिर आणि पम्पा अरण्याचे अस्तित्व विजयनगरपूर्वीही होते. तसे इ. स. ९०० व इ. स. १०००मधील शिलालेखात आढळून आले आहे. चालुक्य व होयसळ राजवटीत या मंदिराचे काम झाले असावे; मात्र विजयनगर राजवटीत याचे विस्तारीकरण आणि जीर्णोद्धार झाला असावा. इ. स. १५०९मध्ये कृष्णदेवराय दुसरा याच्या राज्याभिषेकाच्या वेळी गोपुराचे बांधकाम करण्यात आले. दाक्षिणात्य पद्धतीचे विजयनगर शैलीतील मंदिर म्हणून स्थापत्यकलेत याचे महत्त्वाचे स्थान आहे. तालिकोटच्या लढाईत याचे फारसे नुकसान झालेले नाही. अगदी अलीकडेही उत्तरेकडील गोपुरांची दुरुस्ती करून छतावरील पेंटिंग्ज सुरक्षित करण्यात आली आहेत. 

पिनहोल कॅमेऱ्यातून दिसणारी उलटी प्रतिमा

तीन तोंडे असलेला नंदीविरूपाक्ष मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या वायव्य कोपऱ्यातील एक छोट्या खोलीत असलेला पिनहोल कॅमेरा. एका छोट्या छिद्रामधून समोरील गोपुराची उलटी प्रतिमा येथे दिसते. या मंदिरात तीन तोंडे असलेला नंदी आहे. तसेच एक अंध माणूस शिवलिंगाला पायाने स्पर्श करीत आहे, असे दाखविले आहे. याबाबत गाइडने अशी कथा सांगितली - महादेवाने त्या इसमाकडे त्याचा डोळा मागितला. त्याने लगेच काढून दिला. महादेवाने दुसरा डोळाही मागितला. तोही त्याने काढला व एका हातात घेऊन तो देवाला वाहण्यासाठी देव कोठे आहे हे पाहण्यासाठी चाचपडत असताना त्याचा पाय शिवलिंगाला लागतो असे दाखविले आहे. 

महानवमी मंच

महानवमी मंच

महानवमी मंच :
महानवमी प्लॅटफॉर्मला ग्रेट प्लॅटफॉर्म, ऑडियन्स हॉल, दशरा किंवा महानवमी डिब्बा असेदेखील म्हटले जाते. हे १९ एकर जागेत आहे. विजयनगरला भेट देणाऱ्या त्या वेळच्या अनेक परदेशी फिरस्त्यांनी याचा उल्लेख केला आहे. कृष्णदेवरायाने उदयगिरीवर (सध्याचे ओडिशा) विजय मिळवल्यानंतर हा डबा बनविला होता. याला काही जणांनी ‘विजय हाउस’ असेही म्हटले आहे. याला थिएटरमध्ये असतात तसे उतरते चार मोठे टप्पे आहेत. त्यावर पूर्वी लाकडी मंडप असावा. तो १५६५च्या लढाईनंतर जळून गेला असावा. पायरीवजा कॉम्प्लेक्समधील सर्वांत मोठ्या स्मारकाला तीन चढत्या चौरस अवस्था आहेत, ज्या मोठ्या, स्क्वेअर प्लॅटफॉर्मकडे नेतात. याची खालील बाजू ग्रॅनाइटमध्ये तयार करण्यात आली आहे. त्याचा वापर सैनिक संचलन, तसेच नृत्य वगैरे कार्यक्रमांसाठी होत असावा. 

मलयवंत रघुनाथ मंदिर (फोटो : hampi.in)मलयवंत रघुनाथ मंदिर : रामायणातील कथेनुसार, लंकेवर स्वारी करण्यापूर्वी पावसामध्ये राम आणि लक्ष्मण या ठिकाणी एक निवारा शोधत होते. मलयवंत टेकडीच्या दिशेने रामाने एक बाण सोडला व तेथे आसरा तयार केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिरात श्रीराम आणि लक्ष्मण हे आसनस्थ आहेत आणि सीता त्यांच्यासमोर आहे, असे शिल्प आहे. एका प्रचंड शिळेवर हे मंदिर आहे. येथे नैसर्गिक विहीरही आहे. 

चंद्रमौलीश्वर मंदिर : माथ्यावर चंद्रमुकुट असलेला शंकर म्हणजेच चंद्रमौलीश्वर. या मंदिराच्या आसपास प्रचंड शिळांचे साम्राज्य आहे. तुंगभद्रेच्या काठावरील हे मंदिर तेराव्या शतकातले आहे. स्थानिक लोकांच्या मते रामायणातील किष्किंधाकांडातील श्रीराम व श्री हनुमान यांची भेट या मंदिरासमोरील बेटांमध्ये झाली. विठ्ठल मंदिर मार्गावर सुग्रीवाची गुंफा आहे. 

अच्युतराय मंदिर

अच्युतराय मंदिर :
तालिकोटच्या लढाईपूर्वी इ. स. १५३४मध्ये बांधण्यात आलेले हे मंदिर वास्तुकलेच्या विजयनगर शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हंपीच्या इतर इमारतींच्या तुलनेत या मंदिरात वापरलेली वास्तुकला खूपच प्रगत आहे. अच्युतराय मंदिर हे बांधले गेलेले शेवटचे मोठे मंदिर होते. गंधामदन आणि मातंगा हिल्स या दोन टेकड्यांच्या मध्ये नैसर्गिक सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर आहे. 

श्रीकृष्ण मंदिर : हंपी बस स्टँडपासून ५०० मीटर अंतरावर श्रीकृष्ण मंदिर आहे. कृष्ण मंदिर हंपीमधील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवराय यांनी ते बांधले होते. उदयगिरीच्या (ओडिशासा) राजा गजपती विरुद्ध मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ हे मंदिर बांधण्यात आले, असा शिलालेखात उल्लेख आहे. मंदिरातील बाळकृष्णाची मूर्ती आता चेन्नई येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. हे मंदिर पंचायतन शैलीत असून, त्याला दोन दरवाजे होते. कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी मुख्य मंदिर बांधलेले असून, महामंडप, अर्धा मंडप, देवी मंदिर अशी रचना आहे. हे मंदिर तालिकोट लढाईनंतर लुटले गेले. तसेच त्याचे नुकसानही झाले. मंदिराचे स्वयंपाकघर मुख्य देवळाच्या आग्नेयेला आहे. मंदिराच्या खांबांवर शिलालेख, तसेच माहुतांसह हत्तीशिल्पे आहेत. हॉलच्या प्रवेशद्वारावरही शिल्पकाम आहे. पूर्वेकडील मुख्य गोपुर हे विजयनगर वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यावर असंख्य कोरीव शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला अप्सरा, तसेच श्री विष्णूचे अवतार दाखविले आहेत. 

हंपीमधील जैन मंदिर : हंपीमधील जैन मंदिरामध्ये हेमकूट जैन मंदिर, रत्नांत्रयकूट, पार्श्वनाथ आणि गणिगत्ती ही मंदिरे आहेत. ही मंदिरे साधारण १४व्या शतकात बांधली होती. दुर्दैवाने, मंदिरातील बहुतेक मूर्ती नष्ट झाल्या आहेत. 

अहमदखान कबर

अहमदखान कबर :
कमलपुरा ते आनेगुंदी रस्त्यावर हे एक मुस्लिम स्मारक आहे. इ. स. १४३९मध्ये हिंदू राजा देवराय दुसरा याच्या सैन्यातील मुस्लिम अधिकारी अहमदखान याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते बांधण्यात आले होते. स्मारकांमध्ये एक मशीद, अष्टकोनी विहीर आणि एक मकबरा आहे. 

सनसेट पॉइंट : येथून हंपीचे विहंगम दृश्य दिसते. तसेच येथील एका मंदिरात पखवाज व तत्सम वाद्याचे ध्वनी ऐकवणारे चार खांब आहेत. संगीत मंडपातील खांबांना स्पर्श करून वाजविण्याची बंदी असल्याने येथे तो अनुभव घेता येईल. 
विजयनगरच्या आसपास ठिकाणे

गुंफाचित्रेआनेगुंदी : रामायणातील किष्किंधा म्हणजेच आनेगुंदी. हंपीजवळच तुंगभद्रेच्या पलीकडे कोप्पल जिल्ह्यात हे ठिकाण आहे. रामायणातील पम्पा सरोवर येथेच आहे. हे चालत जाण्याच्या मार्गाने अडीच ते तीन किलोमीटरवर आहे; मात्र गाडी रस्त्याने जायचे झाल्यास २० किलोमीटरचा वळसा पडतो. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे हे पठार तीन हजार दशलक्ष वर्षांपूर्वीचे मानले जाते. इ. स. पूर्व १५०० वर्षे जुनी (३५०० वर्षे) गुंफाचित्रे येथे आहेत. पौराणिक कथेनुसार हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. तसेच शबरी व रामाची भेट येथेच झाली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हंपी व आनेगुंदीदरम्यान विजयनगरकालीन पुलाचे अवशेष अद्यापही आहेत. 

दरोजी अस्वल अभयारण्य (फोटो : विकिपीडिया)

दरोजी अस्वल अभयारण्य :
हंपीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. याला कराडी अभयारण्य असेही म्हणतात. हे ८२.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. अभयारण्य केवळ अस्वलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. या भागात असलेल्या शिळांच्या आडोशाला अस्वलांची वस्ती आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत येथे भेट देता येते. निरीक्षणासाठी मनोरेही उभारण्यात आले आहेत. 

बेल्लारी किल्ला

बेल्लारी :
बेल्लारी येथील किल्ला हनुमप्पा नायक यांनी विजयनगर राजवटीत बांधला. इ. स. १७६९मध्ये हैदरअलीने या किल्ल्याचा कब्जा घेतला व एका फ्रेंच इंजिनीअरकडून त्यात सुधारणा करवून घेतल्या. त्याच्याबद्दल संशय आल्याने त्यास फाशी देण्यात आले. मोठमोठ्या पाषाणशिळांमध्ये असलेला हा किल्ला बघण्यासारखा आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म शेजारील खेड्यामध्ये झाला होता. 

तुंगभद्रा धरण

होस्पेट :
होस्पेट शहर इ. स. १५२०मध्ये विजयनगरचे शासक कृष्णदेवराय यांनी बांधले होते. त्यांनी आपली आई नागलांबिकाच्या सन्मानार्थ हे शहर बांधले. शहराचे मूळ नाव नागपालपूर होते; तथापि, लोक शहराला होस पेट असे म्हणू लागले, ज्याचा अर्थ ‘नवे शहर’ असा होता. हंपी आणि होस्पेटदरम्यानच्या क्षेत्राला नागलापुरा म्हटले जाते. पर्यटकांसाठी हे विजयनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. जवळच तुंगभद्रेवरील मोठे धरण असून, धरणाच्या पायथ्याशी वृंदावनची छोटी आवृत्ती असलेला बगीचा आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंच टेकड्यांवरून धरणाचे विहंगम दृश्य दिसते. हे धरण कोप्पल जिल्ह्यात येत असले, तरी होस्पेटपासून पाच किलोमीटरवर आहे. या भागात असलेल्या लोखंडाच्या खाणीमुळे हा भाग प्रसिद्ध झाला आहे. अनेक परदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी येथे येत असतात. विजयनगरला येणारे बहुतांश पर्यटक मुक्कामासाठी येथेच राहतात. 

रामदुर्ग किल्ला : सांडूरपासून १६ किलोमीटर अंतरावर असून, समुद्रसपाटीपासून ३२५६ फूट उंचीवरचे हे हिलस्टेशन आहे. या हिलस्टेशनवरून एका बाजूला सांडूर व्हॅलीमधील सुंदर दृश्य दिसते. कांपलीचे राजकुमार कुमार रामा यांनी बांधलेला एक किल्ला आहे, जो आता पडक्या अवस्थेत आहे. येथे एक पुरातन राम मंदिर असून, त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. 

(विजयनगरच्या दोन्ही लेखांतील बरेच फोटो माझी मुलगी सौ. अनघा जोशी, जावई संदीप व नातू ओजस यांनी अलीकडेच काढलेले आहेत.)

कसे जाल, कोठे राहाल?
विजयनगरजवळ होस्पेट रेल्वे स्टेशन असून, हुबळी-चेन्नई रेल्वेमार्गावर होस्पेट व बेल्लारी स्टेशन्स येतात. जवळचा विमानतळ बेल्लारी येथे आहे. चित्रदुर्ग-विजापूर राष्ट्रीय हमरस्त्यावर होस्पेट आहे. होस्पेट येथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. या भागात ऑक्टोबर ते मेपर्यंत जायला हरकत नाही; पण फेब्रुवारीपर्यंत हवा चांगली असते. नंतर तीव्र उन्हाळा असतो. 

- माधव विद्वांस
ई-मेल :
 vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 

पंपा सरोवर

विरूपाक्ष मंदिरातील छतावरील पेंटिंग्ज

विरूपाक्ष मंदिरातील छतावरील पेंटिंग्ज

विरूपाक्ष मंदिर

विरूपाक्ष मंदिर
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search