Next
‘क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन राष्ट्रधर्माचे पालन केले’
आफळेबुवांनी उलगडला भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचा पराक्रम
BOI
Monday, January 07, 2019 | 04:33 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘२०-२२ वर्षांचे तरुण देशासाठी कसे हसत हसत फाशी जातात, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल, असे उद्गार भगतसिंगांनी फाशीवर जाताना इंग्लिश जेलरला उद्देशून काढले होते. देशासाठी काहीही आनंदाने करण्याची क्रांतिकारकांची तयारी होती, याचे हे मूर्तिमंत उदाहरण होते,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले. कीर्तनसंध्या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी (पाच जानेवारी २०१९) रोजी त्यांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंसह चंद्रशेखर आझादांचे क्रांतिकार्य उलगडून दाखविले. सावरकरांनी लिहिलेल्या ‘तुजसाठी मरण ते जनन’ या ओळीच जणू या क्रांतिकारकांनी खऱ्या करून दाखविल्या होत्या.

पूर्वरंगात आफळेबुवांनी ‘धर्माचे पालन, करण्या पाखंड खंडण’ हा संत तुकारामांचा अभंग घेऊन निरूपणाला सुरुवात केली. संत तुकारामांचे कार्य सांगितल्यानंतर, भगतसिंगांसह सर्व क्रांतिकारकांनी राष्ट्रधर्माचे पालन करण्यासाठी पाखंडांचे खंडण कशा प्रकारे केले, हे बुवांनी उत्तररंगात उलगडले. वीररसपूर्ण कीर्तनामुळे श्रोते इतिहास जणू अनुभवत होते, जागेला खिळून बसले होते. 

संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य मांडताना आफळेबुवांनी त्यांचा सावकारी धंदा, दुष्काळ पडला असताना लोकांना कर्ज देतानाचा व्यवहार अशा सगळ्या गोष्टींतून त्यांचा प्रवास मांडला. त्यांच्या अभंगांबद्दलही बुवांनी भाष्य केले. 

उत्तररंगात बुवांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांच्या गोष्टी रोमहर्षक पद्धतीने सादर केल्या. ‘जालियनवाला बाग हत्याकांड झाले, तेव्हा भगतसिंग सातवीत शिकत होते. हत्याकांड झाल्यावर ते घटनास्थळीही गेले होते. त्यानंतर त्यांनी शेतात बंदूक पुरून ठेवली होती. ‘आता बंदुका उगवतील आणि त्यांच्या साह्याने मी इंग्रजांच्या राज्याला दणका देईन,’ असे त्यांनी ठरवले होते,’ असे त्यांनी सांगितले. ‘सत्याग्रह आंदोलनात मुस्लिमांचा सहभाग नाही, हे महात्मा गांधीजींच्या लक्षात आले. तुर्कस्तानात खिलाफत चळवळ सुरू होती. त्यानुसार भारतीय स्वराज्याला मुस्लिमांनी पाठिंब द्यावा, अशी गांधींची अपेक्षा होती. काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात महंमद अली जीना यांनी गांधीजींना ‘महात्मा’ म्हटले नाही, म्हणून काँग्रेसजन भडकले. काँग्रेस हिंदूंची आहे, असे म्हणून जिना यांनी काँग्रेस सोडून मुस्लिम लीगची स्थापना केली. त्या वेळीही ते वंदे मातरम् म्हणत नव्हते. गांधीजींनी समेट करण्याचाही प्रयत्न केला. १९२२ला साराबंदी आंदोलन सुरू झाले; पण दोन महिन्यांत शेतकऱ्यांनी पोलीस चौकीला आग लावली. हिंसा झाल्याने गांधींनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर ब्रिटिशांनी गांधींना १९२८पर्यंत आंदोलनाला बंदी घातली,’ असे बुवांनी सांगितले.

‘चंद्रशेखर आझाद यांनी भारतीय रिपब्लिकन आर्मी स्थापन केली. क्रांतिकारकांचे संमेलन झाल्यानंतर खजिना नेणारी रेल्वे अडवून तिजोरी फोडण्यात आली. त्यात पाच हजार रुपयांची चिल्लर सापडली. तिचे वजन तीन मण होते. ही चिल्लर आझाद यांनी सायकलवरून आणली. रोज ५०० जोर-बैठका मारणाऱ्या या धिप्पाड आझादांकडे प्रचंड सामर्थ्य होते. पोलिसांनी त्यांना पकडले, तेव्हा त्यांच्या मनगटात बेडी बसत नव्हती. साखळीने फटके मारण्याची भयानक शिक्षा त्यांना झाली; पण त्यातूनही ते ताकदीने उभे राहिले. या कामगिरीबद्दल त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली,’ अशा शब्दांत बुवांनी आझादांचे चित्र उभे केले. ‘लाला लजपतराय यांनी लाहोरमध्ये १९२७ला सायमन गो बॅक आंदोलन करण्याचे ठरवले. त्यात लाठीहल्ला झाला आणि लाला जखमी झाले. आंदोलन तात्काळ मागे घेण्यात आले. गांधीजींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता. भगतसिंगांनी संघटनेचे नाव हिंदुस्थान समाजवादी रिपब्लिकन आर्मी असे केले. त्यांनीही निदर्शनांत भाग घेतला होता. स्कॉट व सँडर्सने लाठीहल्ला केला. लाला लजपतराय यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे मासिक श्राद्ध गोऱ्या अधिकाऱ्यांचे रक्त सांडूनच करू, असा पण भगतसिंगांनी केला होता. त्यानुसार जयगोपाल, चंद्रशेखर आझाद, शार्प शूटर भगतसिंग आणि सुखदेव यांनी साँडर्सला मारण्याचे ठरवले. त्यांच्यासोबतचे राजगुरू हे पुण्याजवळचे. ते बनारसला संस्कृत शिकण्यासाठी गेले होते. तिथे लाठीकाठी शिकले. दयानंद कॉलेजजवळ नियोजन करून साँडर्सला आठ गोळ्या झाडून मारण्यात आले. त्याचा अंगरक्षकही मेला,’ या प्रसंगाचे उत्तम पद्धतीने वर्णन करून बुवांनी तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा केला.

‘आज हमारी सच में शादी हुई’
‘नंतर साऱ्यांनी वेश बदलला. भगवतीचरण बोहरा या मित्राच्या पत्नी दुर्गा भाभी हिला भगतसिंगांची पत्नी भासवून साऱ्यांनी लाहोरमधून कलकत्त्यापर्यंतचा प्रवास केला. हे काम अत्यंत जोखीमपूर्ण होते. भगवतीचरण काँग्रेस अधिवेशनासाठी आधीच कलकत्त्याला गेले होते. त्या वेळी पत्नीने भगतसिंगांना केलेली मदत पाहून, क्रांतिकार्यात आपल्याला साथ देणाऱ्या आपल्या पत्नीचे कार्य पाहून, ‘आज हमारी सच में शादी हुई’ असे भारावलेले उद्गार त्यांनी काढले होते. भगवतीचरण यांनी बाँब बनविण्याची विद्या शिकून आग्रा-मुझफ्फरपूर येथे कारखाना सुरू केला होता. बाँबची चाचणी घेताना भगवतीचरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तरी त्यांच्या पत्नीने खचून न जाता क्रांतिकारकांना मदतच केली,’ ही गोष्टही बुवांनी उलगडून सांगितली.

तरुण क्रांतिकारक हसत फासावर गेले
‘भगतसिंगांनी विधिमंडळात बाँब फोडण्याचे ठरविले. बैठक सुरू झाली. मोतीलाल नेहरू, मदनमोहन मालवीय, जिनाही बैठकीला होते. तिथे दोन बाँब फेकून भगतसिंग पोलिसांकडे स्वाधीन झाले. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी आयर्विनला मारण्यासाठी रेल्वेखाली बाँब फोडला; पण तो बचावला. इंग्रजांची भगतसिंगने माफी मागितली तर माफीसाठी शब्द टाकू, अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती. भगतसिंगांनी तसे करण्यास नकार दिला आणि ‘त्यापेक्षा आम्ही फाशी जाऊ’ अशी भूमिका त्यांनी घेतली आणि ते हसत हसत फासावर गेले,’ हा पराक्रम आफळेबुवांनी सादर केल्यावर उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरवपरंपरा पाळताना विचार हवा
उपासनेचे महत्त्व मोठे आहे. प्रत्येकाने उपासना करणे आवश्यक आहे, असे बुवा म्हणाले. टीव्हीच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. धर्माचे पालन करताना योग्य गोष्टींना प्रोत्साहन देऊन खोट्या गोष्टींना विरोध केला पाहिजे. परंपरा पाळताना, धार्मिक विधी करताना त्यामागचा विचार लक्षात घेतला पाहिजे, असे बुवांनी सांगितले. ‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करा, असे सांगितलेले आहे; त्याचे अनेक फायदे आहेत; पण अलीकडे सर्व जण वडाच्या फांदीची घरात पूजा करतात. ते चुकीचे आहे. त्याऐवजी ज्यांना शक्य आहे त्यांनी वडाचे झाड आणून लावायला हवे,’ असे आवाहन त्यांनी केले..

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, खेळ मांडियेला, हे अभंग, तसेच ‘उठा राष्ट्रवीर हो’ हे गीतही बुवांनी कीर्तनात सादर केले. प्रश्नेमंजूषा स्पर्धेत केतकी ढापरे, अदिती जोशी, चिन्मय सागवेकर या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना बुवांच्या हस्ते ‘शिव-समर्थ योग’ हे पुस्तक बक्षीस देण्यात आले. मध्यंतरामध्ये ‘सोहळा’ चित्रपटाचे निर्माते श्री. गुंदेचा यांचा सत्कार बुवांच्या हस्ते करण्यात आला.

हेरंब जोगळेकर, मधुसूदन लेले, वैभव फणसळकर, उदय गोखले, प्रथमेश तारळकर, हरेश केळकर यांनी बुवांना वाद्यसाथ केली. तसेच अभिजित भट याने गायनसाथ केली.

मदतीचे आवाहन
‘रत्नागिरीतील युवकांनी पुढाकार घेऊन केलेला कीर्तनसंध्या हा उपक्रम आठ वर्षे सुरू आहे. तो असाच सुरू राहण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. किमान ५०० माणसांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिले, तरी मोठा निधी उभा राहील. प्रत्येकाने यथाशक्ती मदत केल्यास कीर्तनसंध्या उपक्रम पुढेही अशाच पद्धतीने सुरू राहू शकेल,’ असे आवाहन आफळेबुवांनी केले. 

(भगतसिंग आणि सहकाऱ्यांच्या पराक्रमाच्या आफळेबुवांनी केलेल्या वर्णनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुसऱ्या दिवशीचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तिसऱ्या दिवशीचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. २०१८च्या कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 124 Days ago
Kirtan -- veryowerful medium to spread a message . However it is Not suitable for cultivating the habit of critical thinking .
0
0
Balkrishna Gramopadhye. About 145 Days ago
Their contribution? Spreading the idea of Indianness.
0
0
Balkrishna Gramopadhyee About 145 Days ago
They created the idea pg
0
0
Balkrishna Gramopadhye About 145 Days ago
How do
0
0

Select Language
Share Link
 
Search