Next
कला जिवंत करणारे व्यक्तिमत्त्व!
BOI
Friday, December 15 | 06:17 PM
15 0 0
Share this story

उषा मंगेशकरभारतीय संगीत क्षेत्रातील एक सन्माननीय आणि नामवंत घराणं म्हणजेच मंगेशकर. या कुटुंबातील सर्वच जण गायन क्षेत्रात असले तरी त्यातील प्रत्येकाची आपली एक वेगळी अशी ओळख आहे. वेगळा एक बाज आहे. याच कुटुंबाचा एक अविभाज्य घटक म्हणजे उषा मंगेशकर... त्या गायिका तर आहेतच; पण तितक्याच ताकदीच्या चित्रकारही आहेत. आज, १५ डिसेंबर रोजी उषाताई ८२व्या वर्षात प्रदार्पण  करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या या वेगळ्या पैलूबद्दलची माहिती देणारा आणि त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणारा हा लेख...
............
उषाताईंनी रेखाटलेले चित्रउषाताई, म्हणजे रंगांना जिवंत करणाऱ्या कलावंत. मग ते चित्र असो, रांगोळी असो किंवा मग गाणरंग... त्यांचं नाव घेताच ही अनुभूती होते, की वय हे फक्त दार्शनिक आहे. आजही उषाताई तेवढ्याच हुरूपाने सगळी कामं करतात. त्याच उत्साहाने लतादीदींची सेवाही करतात. वयाच्या या टप्प्यावरही त्या जिद्दीने आणि तेवढ्याच ताकदीने खंबीरपणे उभ्या आहेत. 

१५ डिसेंबर १९३५ रोजी सांगलीच्या भूमीत उषाताईंचा जन्म झाला मीना, लता, आशा, हृदयनाथ अशा सर्व भाऊ बहिणीमध्ये या चौथ्या. अर्थातच, त्यांचे वडील स्वर्गीय मास्टर दीनानाथ मंगेशकरांमुळे गाणं हे त्यांच्यात उपजतच होतं.अर्थात मी किंवा इतर कोणीही त्यांच्या कलेबद्दल बोलण्यास पात्र नाहीच. हे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं होईल. 

बालपणी उषाताई अगदी खेळकर होत्या. त्यांना क्रिकेट, सागरगोट्या आणि भातुकलीची प्रचंड आवड होती. सर्व भाऊ-बहीण एकत्र येऊन हे सर्व खेळ आवडीने खेळायचे.पुढे गाण्याच्या क्षेत्रात येतानाही ताईंनी खूप मेहनत घेतली. केवळ हिंदी आणि आणि मराठीच नव्हे, तर बांगला, नेपाळी, भोजपुरी, आसामी, गुजराती, कानडी व इतर अनेक भाषांमधून त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 

उषा मंगेशकर आणि लता मंगेशकरत्यांच्या प्रवासाची सुरुवात १९५३ सालच्या ‘सुबह का तारा’ चित्रपटामधील ‘मेरी भाभी आई’ या सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याने झाली.त्यानंतर त्यांनी लता दीदींसोबत १९५५ सालच्या ‘आजाद’ चित्रपटासाठी ‘आपलंम चपलम..’ हे द्वंद्वगीत गायलं.सिनेमा क्षेत्रातील हे पहिलं असं गाणं होतं, जे दोन बहिणींनी मिळून गायलं आणि दोन बहिणींवर ते चित्रित करण्यात आलं. त्यानंतर ‘जय संतोषी माँ’, मुंगळा, मराठीमध्ये ‘रचिल्या ऋषीमुनींनी’ आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटासाठी गायलेली सर्व गाणी आजही तेवढीच ताजी आणि आनंद देणारी आहेत. या गाण्यांमधील त्यांच्या सुरांनी रसिकजणांच्या मनामधील तारा छेडल्या आणि त्यांच्या मनात घर करून राहिल्या.

उषाताईंनी रेखाटलेले चित्रकेवळ गायिकाच नव्हे, तर उषाताई तेवढ्याच ताकदीच्या चित्रकारही आहेत. विविध माध्यमं वापरून चित्र रंगवण्यात त्यांच्या हातखंडा आहे. व्यक्तीला समोर बसवून त्यांची चित्रे काढण्यावर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी काढलेलं मीनाताईंचं चित्र मी पहिलं, ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व लता दीदी यांचीही त्यांनी काढलेली चित्रे अतिशय भावपूर्वक व जिवंत वाटतात. त्यांनी काढलेलं खूप नावाजलेलं चित्र म्हणजे शिवाजी गणेशन याचं चित्र. जे आजही सुप्रसिद्ध आहे आणि अजूनही लोकांची तारीफ मिळवत आहे.आजही जेव्हा त्या परदेशात हॉलंड, रशिया, फ्रान्स या देशांमध्ये जातात तेव्हा इतर कलाकारांची चित्रं बघून त्याचा अभ्यास करून, ती शैली आपल्या चित्रात उतरवण्याचा त्या प्रयत्न करतात. 

उषा मंगेशकरउषाताईंच्या भाचेमंडळींमध्येही त्याच सर्वांच्या लाडक्या. कारण त्या सगळ्यांना विविध ठिकाणी पर्यटन करायला नेत असत. त्यांना स्वतःला ऐतिहासिक वास्तू, ठिकाणं आणि विविध संग्रहालय यांची खूप ओढ आहे. अजूनही त्याच दमाने उषाताई गातात आणि सर्वांची मने जिंकतात. एवढंच नाही, तर आजही इतकी वर्षं होऊनसुद्धा त्या कधीही रियाज चुकवत नाहीत. संगीत अभ्यासकांसाठी आता उषाताई ‘मास्टर दीनानाथ संगीत विद्यालय’ स्थापन करत आहेत. याठिकाणी सर्व संगीत अभ्यासकांनी संगीताचा अभ्यास करावा, अशी त्यांची इच्छा आहे. याचा ध्यासच त्यांनी घेतला आहे. 

उषाताईंनी रेखाटलेले चित्रलता दीदींवर त्यांची भाची रचना खडीकर-शाह आणि मी एक पुस्तक केले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने प्रभुकुंजवर माझी उषाताईंची भेट झाली. या पहिल्या भेटीत मला क्षणभरही असं वाटलं नाही, की मी त्यांना पहिल्यांदा भेटत आहे. अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने त्यांनी आमचं स्वागत केलं. यादरम्यान त्यांनी दिलेल्या लिंबू सरबताची गोडी माझ्यासाठी अतुलनीय आहे..! माझ्या पुस्तकासाठी प्रत्येक पावलागणिक त्यांनी मला खूप आधार दिला आहे आणि सहकार्य केले आहे. उषाताईंकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मला उमगल्या. एकीकडे त्यांच्यात असलेला नम्रपणा आणि दुसरीकडे त्यांचं स्वतंत्र खंबीर व्यक्तिमत्त्व, या दोन्ही गोष्टी त्यांना त्यांच्या इतर भाऊ-बहिणींमधून वेगळं करतात. आपण देशावर परिवारावर आणि स्वतःच्या अस्तित्वावर किती उदंड प्रेम करावं याचं उषाताई हे एक ज्वलंत उदाहरण आहे. 

मला अजूनही विश्वास बसत नाही, की आज उषाताई ८२व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यांच्या शंभरीलाही मला त्यांची मुलाखत घेण्याचे सौभाग्य लाभावे आणि पुढील आयुष्यात त्यांच्या मायेचा आणि प्रेमाचा सहवास मिळत राहावा, अशीच प्रार्थना मी आजच्या दिनाच्या निमित्ताने करतो. 

- ऱ्हिदम वाघोलीकर 

मंगेशकर कुटुंब
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link