Next
‘तिने’ विघ्नावर मात करून सुरू ठेवली विघ्नहर्त्याची मूर्तिशाळा
आचऱ्यातील १९ वर्षीय अमृताने वडिलांच्या निधनानंतर पेलली जबाबदारी
नीलेश जोशी
Friday, September 07, 2018 | 03:59 PM
15 1 0
Share this article:मालवण :
संकटे सर्वांनाच येतात. काही जण त्यामुळे कोलमडून पडतात, तर काही जण आलेल्या संकटाने खचून न जाता धैर्याने तोंड देऊ उभे राहून समाजासमोर आदर्श निर्माण करतात. आचरा हिर्लेवाडी येथील खडपे कुटुंबातील अमृता आणि मानसी या भगिनी त्यापैकीच. वडिलांचे छत्र अचानक हरपल्यावर दुःख बाजूला ठेवून त्यांनी वडिलांची गणेश मूर्तिशाळा सुरू ठेवली. एवढेच नव्हे, तर त्यांनी केलेले मूर्तिकाम अनेकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे अमृता, मानसी या दोघी जणींचे कौतुक होत आहे. गावातील नागरिक आणि महिलांनीही त्यांना उभे राहण्यास मदत केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी येथे संजय खडपे यांचे कुटुंब राहते. वर्षभर मोलमजुरी आणि हंगामात मूर्तिशाळा हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन. त्यामुळे उत्पन्न बेताचेच. वयाच्या पन्नाशीत असलेल्या संजय खडपे यांचे एप्रिल २०१८मध्ये अचानक आकस्मिक निधन झाले. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नी संजना आणि १८-१९ वर्षांच्या दोन मुली अमृता, मानसी यांचा आधार हरपला; पण आलेल्या संकटाने हे कुटुंब खचून गेले नाही. नुकत्याच बारावी झालेल्या अमृताने वडिलांवर स्वतः अंत्यसंस्कार करून कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. वडिलांच्या आकस्मिक जाण्याने खचलेल्या आईला आणि बारावीत शिकणाऱ्या आपल्या मागच्या बहिणीला आधार देऊन वडिलांची गणपती चित्रशाळा सुरूच ठेवण्याचा निर्धार तिने केला.

अमृता आणि मानसी खडपे

वडिलांच्या दिवसकार्यानंतर अमृताने या दृष्टीने प्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले. घरातील सर्वच कामे तिच्या अंगावर पडली होती. पाळलेल्या म्हशीच्या देखभालीसह दुधाचे रतीबही तिला घालावे लागत होते; पण वडिलांनी आवडीने सुरू केलेली मूर्तिशाळा चालवण्याचा निर्धार तिला गप्प बसू देत नव्हता. वडिलांसोबत वावरताना मिळालेल्या मूर्ती घडविण्याच्या केवळ जुजबी ज्ञानावरच तिने मूर्तिशाळा सुरू करण्याचे ठरवले; पण यासाठी आवश्यक माती, साहित्य कुठून आणायचे, असा प्रश्न अमृतासमोर उभा ठाकला. वडिलांची वही चाळून आवश्यक त्यांच्याशी संपर्क साधून तिने साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली; पण आपण केलेल्या मूर्ती लोक घेतील का, हा प्रश्न तिला सतावू लागला. ...पण प्रत्येकाने अमृता आणि तिच्या बहिणीचा उत्साह वाढवला. ‘तू जशी मूर्ती साकारशील, तशी स्वीकारू’ असे सगळे जण सांगू लागले. मुलगी वडिलांच्या पश्चात मूर्तिशाळेत गणपती साकारत आहे, ही बातमी सगळीकडे समजल्यावर अमृताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी काही जणांनी घरी येऊन त्यांचा हुरूप वाढवला. तीन-चार मूर्ती करायच्या असा विचार केलेल्या त्यांच्या मूर्तिशाळेला बघता बघता काही दिवसांतच तीस-पस्तीस मूर्तींची ऑर्डर मिळाली. हुरूप वाढलेल्या अमृताने मे महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती घडविण्याचा शुभारंभ केला.

अमृता आणि मानसी यांच्या मूर्तिशाळेतील मूर्ती

एक मुलगी गणपती मूर्तिशाळा सुरू करतेय म्हटल्यावर वाडीतील काही महिलासुद्धा मदतीला पुढे सरसावल्या. कीर्ती पेडणेकर, श्रीमती मेस्त्री वहिनी यांच्याबरोबरच नारायण होडेकरदेखील मदतीला धावून आले. दहावीचे वर्ष असूनही मामेबहीण, तसेच कॉलेज सांभाळून धाकटी बहीण मानसीसुद्धा अमृताला मदत करत आहे. अमृताने मूर्तिशाळा सुरू करण्याचे हे पहिलेच वर्ष असूनही तिने मूर्तिशाळेतील गणपतींचे केलेले रंगकाम अनेकांना खूप आवडले आहे.

संकटे सर्वांवरच येतात; पण मुलगी आहे म्हणून हातपाय गाळून न बसता केवळ जिद्दीच्या जोरावर अवघ्या एकोणिसाव्या वर्षी घराची जबाबदारी पेलून अमृताने वडिलांच्या मूर्तिशाळेचा वारसा सुरू ठेवला आहे. तिची ही जिद्द समाजासमोर निश्चितच एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search