Next
योगायोगाच्या किंचित बाहेर...
BOI
Thursday, February 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

दी रनिंग टॅप अँड दी मिथ ऑफ क्रिएशन
मानवी डोळे वांग्याला असते तर, हाताच्या पंजाला सगळी बोटं म्हणजे तर्जनीच असं रूप असतं, तर योगायोगाच्या किंचित बाहेरचं ठरलं असतं. अशाच योगायोगाच्या किंचित बाहेरच्या कलाकृती साकारणारा अन् प्रसिद्धीपराङ्मुख असलेला कलावंत म्हणजे देवाशिष भट्टाचार्य. त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाबद्दल आज पाहू या ‘स्मरणचित्रे’ या सदरात...
............
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अलीकडे चांगली प्रदर्शने पूर्वीच्या तुलनेत कमीच. २००३च्या पावसाळ्यात जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं शिल्पांचं... देवाशिष भट्टाचार्य या फारशा परिचित नसलेल्या शिल्पकाराच्या शिल्पकृतींचं... ‘योगायोगाच्या किंचित बाहेर’ अशा आशयाचं शीर्षक त्या प्रदर्शनाला होतं. या प्रदर्शनातली अगदी सगळीच शिल्पं निनावी होती. नाव नसलं, तरी आशयानं भरलेली आणि गहन-गंभीर प्रकृतीची. देवाशिष बोलके आणि प्रसिद्धीपराङ्मुख प्रवृत्तीचे आहेत. आता त्यांचे वास्तव्य कोलकात्याला; परंतु २००२पर्यंत ते सुप्रसिद्ध अशा महाराजा सयाजीराव विद्यापीठात शिल्पकलेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्या हाताखाली शिल्पकला शिकलेल्या विद्यार्थ्यांची अनेक प्रदर्शनं झाली असतील. परंतु देवाशिष प्रदर्शनाच्या बाबतीत फारसे उत्साही नसावेत. कारण वयाच्या ३८व्या वर्षी त्यांनी हे पहिलं एकल प्रदर्शन भरवलं होतं. त्यांच्या अनेक शिल्पांपैकी लक्षात राहिलेलं शिल्प म्हणजे वांग्याला अनेक डोळे असलेलं काष्ठशिल्प. काष्ठशिल्प म्हणताना देवाशिष यांच्यासारखे कलावंत माध्यमांपेक्षा त्यांच्या अपेक्षित दृश्याला महत्त्व देतात, तेव्हा त्यात अनेक माध्यमे सहभागी असतात. या लाकडी वांग्याला ओतकाम केलेला धातूचा देठ आणि सिरॅमिकचे अनेक डोळे लावलेले होते. एकूणच शिल्पानुभव धक्का देणारा होता. वेगळी दृश्यं सामावणारा होता. 

दुसऱ्या शिल्पसमूहात जुन्या हवेलीचे-बंगालीचे असावेत असे चार खांब मांडलेले... त्याला पत्र्याचं छत. चौरसाकार शेड वाटावी, अशी मांडणी. या शेडमध्ये एक जुनं शिवणाचं मशीन ठेवलेलं. वर मोठ्या आकाराची फायबर ग्लासची शेंग... आणि त्यामधून बाहेर येणारा कापूस. हे मिश्र माध्यमातलं मांडणीशिल्प होतं. आणखी एका उल्लेखनीय अशा शिल्पात पाच बोटे असलेला हात होता. धक्कादायक म्हटलं तरी चालेल असा. कारण अंगठ्याच्या जागी बोटच होतं. शिल्पाचं शीर्षक ‘पाच तर्जनी’ असंच होतं. शिल्पं पाहताना ‘योगायोगाच्या किंचित बाहेर’ हे शीर्षक किती सर्मपक होतं, त्याची पदोपदी प्रचीती येत होती. मानवी डोळे वांग्याला असते तर, हाताच्या पंजाला सगळी बोटं म्हणजे तर्जनीच असं रूप असतं, तर योगायोगाच्या किंचित बाहेरचं ठरलं असतं. एक तर धक्का देण्याचं तंत्र हा आधुनिकोत्तर कलेतला महत्त्वाचा गुणधर्म त्यांनी कलेत आचरणात आणला होताच आणि तो करताना माध्यमाच्या सर्व मर्यादा गाठल्या होत्या. 

साधी वेशभूषा, हिरवा गडद शर्ट आणि फिकी करडी विजार अशा साध्या वेशात हा कलावंत वावरत होता. गप्पांमध्येदेखील सहजता, आत्मप्रौढीचा लवलेशही नाही. अनेक ठिकाणी कलाशिक्षण घेतलेला आणि बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात अनेक पदव्या प्राप्त केलेला हा कलावंत आणि प्राध्यापक नुकताच कोलकात्यातील रवींद्र भारती विद्यापीठात नव्या क्रांतीचे बीज रुजवण्यास रुजू झाला आहे. मनाच्या क्लृप्त्या आणि निसर्गातल्या घटकांची सरमिसळ करून अतिवास्तववादाच्या पुढील पिढीतील म्हणाव्यात अशा नाना प्रतिमा प्रदर्शनात मांडल्या होत्या. 

एक खुर्चीसदृश वस्तूही या प्रदर्शनात मांडलेली होती. ‘अॅन ऑब्जेक्ट लाइक चेअर’ हे त्याचं शीर्षक. साध्या लाकडी खुर्चीला एका बाजूने त्रिकोण लावून पाचवा पाय साधला होता. त्या खुर्चीच्या बसण्याच्या जागेवर आणि खाली मातीचे शंक्वाकृती लहान चार-पाच आकार मांडले होते. सगळं काही अतिवास्तववादी भाषेशी नातं सांगणारं. परंतु प्रायोगिक. कदाचित आकारांचाच अनुभव देणारं... आज जरी मांडणीशिल्प हा कलाप्रकार सर्व कलावंत मंडळी वापरत असली, तरी १५ वर्षांपूर्वी भारतात मर्यादित सर्जनशील व्यक्तीच हा कलाप्रकार वापरत असत. असं एक मांडणीशिल्प या प्रदर्शनात प्रदर्शित झालं होतं. अर्थात, ‘अनटायटल्ड’ या नावाने. जमिनीवर रिकामे कुंडीसारखे मातीचे भांडे. त्यावर तरंगता आयताकृती आरसा आणि त्यावर साधारण फूट-दीड फुटावर नग्न मानवाकृती... कृत्रिम रेझीनपासून बनवलेली ही मानवाकृती पुरुषाची होती.. तरंगणारी पालथी आकृती. त्रिमितीतलं हे शिल्प जवळजवळ ‘लाइफ साइझ’ होतं. 

देवाशिष यांच्या ‘दी रनिंग टॅप अँड दी मिथ ऑफ क्रिएशन’ हे शिल्प अगदी वेगळं असं भिंतीवर लावलेलं लहानसं शिल्प. यात नळातून बादलीत पडणाऱ्या पाण्याचा फोटो, त्या शेजारी सापाची अंडी व त्याभोवती तांब्याचे बनवलेले, एकमेकांना गिळणारे दोन साप, एकमेकांच्या शेपटीच्या बाजू गिळणारे. बहुधा फोटो व सर्पशिल्पे या दृश्यांमधील ‘अखंडत्व’ हा दुवा या दोन भिन्न दृश्यांमध्ये असावा. एक रूपक प्रतिमा अनेक संस्कृतीमध्ये येणाऱ्या पारंपरिक कथानकांवर आधारित. आणि दुसरे रोजच्या जीवनाच्या झगड्याचे रूपक. अशा रचना स्वीकारायला अवघड जातात. 

अनटायटल्ड
अशा रचनांना कलाकृती म्हणायचं का, का म्हणायचं, अशा नानाविध प्रश्नांची उकल तत्काळ होणे अशक्य असते. त्या प्रदर्शनाला येणारे सर्वच प्रेक्षक कलादृष्ट्या साक्षर असतीलच असे नाही. मराठी साहित्यातील पु. शि. रेगेंच्या काही कविता किवा जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनातील काही उतारे वाचनाच्या क्षेत्रात तरंगणाऱ्या व्यक्तींना अतिवास्तववाद म्हणून परिचित असतीलच, असे नाही. तरीही अनुभव म्हणून स्वीकारण्यावर मदार असतेच. असेच काहीसे दृश्यकलेतील अशा प्रयोगशील कलावंतांच्या कलाकृती पाहताना लक्षात घ्यावे लागते. सराव असावा लागतो. 

आता देवाशिष भट्टाचार्य यांच्या वांग्याच्या शिल्पाला असलेले डोळे सर्व परिचित स्वरूपाचे होते. विशेषत: जैन देवतांना किवा इतरही देवतांना सिरॅमिक माध्यमातील डोळे बसवतात. तेच डोळे देवाशिष यांनी वांग्याच्या आकाराला बसवून त्याचा संपूर्ण संदर्भच बदलला. आपल्या पुराणकथांमध्ये सहस्राक्ष किंवा सहस्रपाद असे शब्द येतात, तेव्हा ते आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर येत नाहीत. त्यामुळे तो अनुभव परिचित असूनही अनेकांना अर्थबोध न झालेला जाणवतो. तेव्हा देवाशिषसारख्या शिल्पकाराच्या कृती पाहायला, अनुभवायला आणि स्वीकारायला थोडा सराव हवा. पाहण्याचा रियाझ हवा. 

कला महाविद्यालयातील शिक्षणाने अशा कलाकृती स्वीकारण्याची किंवा बघण्याची क्षमता येतेच असे नाही. त्यासाठी अशा स्वरूपाचे प्रयोग आपल्या आजूबाजूला सुरू असतात, ते पाहणे गरजेचे असते. साल्वादोर दालीची प्रदर्शन पुस्तके किंवा ब्युनियेलसारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट आणि अगदी बालसाहित्य म्हटलं तर सुपरिचित ‘हॅरी पॉटर’च्या कथानकात असे ‘योगायोगाच्या किंचित बाहेर’ असणारे शेकडो अनुभव आपल्या परिचयाचे होत असतात. 

देवाशिष यांचं प्रदर्शन आज १५ वर्षांनंतरदेखील मनात घर करून आहे. त्याचं कारण त्यांच्या कलाकृतीत असलेलं धाडस, शक्यतांचा धांडोळा आणि हुडक्याची भूमिका. कलाजगात महत्त्वाचा, परंतु फारसा प्रसिद्ध नसलेला देवाशिष भट्टाचार्य पहिलं-वहिलं एकल प्रदर्शन करतोय म्हटल्यावर कलाकृतींचे फोटो ध्रुव मिस्त्रींसारखा समृद्ध कलावंत काढून देतो, तिथे माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या मनावर प्रदर्शनाच्या प्रतिमा चिरकाल गोंदल्या जाणं स्वाभाविक होतं.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer Bhagwat About 347 Days ago
Very nice article.
0
0

Select Language
Share Link