Next
‘तळजाई’वरील क्रीडांगणाचे २६ नोव्हेंबरला लोकार्पण
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 01:01 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून येथील तळजाई टेकडीवर महान क्रिकेटपटू कै. सदू शिंदे यांच्या नावाने एका सुसज्ज क्रिकेट क्रीडांगणाची निर्मिती केली आहे. पुण्यातील नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर उभारलेल्या या क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा २६ नोव्हेंबर २०१८ रोजी माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या क्रीडांगणावर प्रशिक्षण आणि सरावाच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. या वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, कै. सदू शिंदे यांचे कुटुंबीय, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व खासदार, आमदार आणि पक्षनेते, स्थानिक नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बागुल म्हणाले, ‘शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी माझ्या संकल्पनेतून एक सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत प्रथमच तळजाई टेकडी परिसरात पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प साकारला जात आहे. विशेष म्हणजे वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी नागरीक यांच्या सहभागाने प्रकल्प होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे पाच एकर जागेवर कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात आले आहे. या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उभारणीत सिमेंट आणि काँक्रीटचा वापर टाळून स्थानिक पातळीवर मिळणार्‍या दगड, मातीचा वापर केला आहे. त्यामुळे हे स्टेडियम पूर्णपणे पर्यावरणपूरक  आहे. विशेषतः येथे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत  दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर या सोहळ्यात  बांबू उद्यान नक्षत्र गार्डन, सोलर रूफ पॅनल या प्रकल्पांचेही   भूमिपूजन होणार आहे.’तळजाई टेकडीच्या पर्यावरणपूरक नियोजनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘गेली २७ वर्षे मी राजकारण आणि समाजकारणात आहे. अनेक पथदर्शी प्रकल्प माझ्या कारकिर्दीत शहरात साकारले आहेत. सहकारनगर भागात काम करण्याची तीव्र इच्छा होती; मात्र प्रभागरचनेमुळे तशी संधी मिळाली नाही. आता नव्या प्रभागरचनेमुळे कार्य करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. तळजाई टेकडीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकासात्मक कामे होत आहेत. या पार्श्वभूमीवर वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांसह विद्यार्थी, कलावंत, पर्यावरणप्रेमी, महिला, तरुण यांसह सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार्‍या पथदर्शी प्रकल्पांचा आणि मूलभूत सुविधांसह तातडीच्या सेवांचा समावेश असलेला सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे.’

‘प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून, वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी, १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे. वाहनतळापासून   जाण्या-येण्यासाठी ई-रिक्षा सायकल उपलब्ध असणार आहेत. नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. व्यायाम आणि चालण्यासाठी येणार्‍या नागरिकांसाठी, तसेच वनक्षेत्रात वर्दळ संपूर्णत: रोखण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरू केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही होत आहे,’ असे बागुल यांनी सांगितले.

मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, महिलांसाठी स्वतंत्र क्रीडांगण, सांस्कृतिक क्षेत्राला वाव देण्यासाठी अँफी थिएटर, रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे तळ्यांची निर्मिती, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर्क स्टेशन्स, रोजगार निर्मितीसाठी, तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू अथवा अन्य उपक्रमांसाठी खुले प्रदर्शन केंद्र, रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीला चालना देणारा प्रकल्प होणार आहे आणि उत्पादित शेतमालासाठी तेथेच विक्री केंद्र, मध्यवर्ती भागात पर्यटकांसह नागरिकांसाठी ‘मार्केट प्लेस’, पक्ष्यांच्या अभ्यास व निरीक्षणासाठी ‘गाईड विथ टूर’ हा महत्त्वाचा प्रकल्पही या आराखड्यात आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहे व अन्य नागरी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
 
कार्यक्रमाविषयी :
दिवस :
२६ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : कै. सदू शिंदे क्रीडांगण, तळजाई टेकडी, पुणे.

(मैदानाचा ड्रोनच्या साह्याने चित्रित केलेला व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search