Next
भिवंडी, शहापूर परिसराचा फेरफटका..
BOI
Wednesday, August 07, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे मँचेस्टर मानले जाणाऱ्या भिवंडी व शहापूर भागात. 
...........
तानसा, भातसा, वैतरणा आणि मोडक सागर ही या भागातील चार धरणे मिळून मुंबईची तहान भागवत असतात. भिवंडी व शहापूरच्या आसपासचा भाग हा ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेला आहे आणि निसर्गरम्यही आहे. या भागातून मुंबईला पिण्याच्या पाणीपुरवठा केला जात असल्याने राज्य शासनाने या भागाला नो केमिकल झोन म्हणून घोषित केले आहे. तानसा नदी, उल्हास नदी आणि काळू नद्यांमुळे येथील निसर्गसौंदर्य वाढले आहे. 

वज्रेश्वरी देवी

भिवंडी निजामपूर महापालिका :
सन २००२मध्ये ही महानगरपालिका अस्तित्वात आली. भिवंडी हे यंत्रमागाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भिवंडीत १९२७मध्ये खानसाहेब समदशेठ यांनी पहिला यंत्रमाग सुरूकेला. ‘सोने विका आणि यंत्रमाग घ्या’ अशी त्यांची घोषणा होती. आजमितीला पाच लाख माग येथे आहेत. सध्या या उद्योगावर मंदीची लाट आहे. पूर्वीच्या काळी कामोरी नदीतून वसई खाडीमार्गे भिवंडी ते गुजरात, तसेच दक्षिण भारतातही व्यापार चालत असे. तांदूळ, लाकूड आणि हातमाग कापड या वस्तूंची मुख्यत्वे जहाजाद्वारे ने-आण या ठिकाणी होत असे. म्हणूनच भिवंडीच्या या परिसराला ‘बंदर मोहल्ला’ या नावाने आजही ओळखले जाते. भिवंडीत आजमितीला दिसणारी मोठी कुटुंबे २५० वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्तानेच या ठिकाणी आली असावीत. भिवंडी गावात यापैकी काही कुटुंबीयांची भातशेती आणि सावकारी होती. आजही भिवंडीत भाताच्या काही गिरण्या शिल्लक आहेत. गावातील निजामपुरा, सौदागर मोहल्ला, बंदर मोहल्ला, भुसार मोहल्ला, तांडेल मोहल्ला, दर्गा रोड, सुतार आळी, हमाल आळी, ब्राह्मण आळी आदी परिसरांत जुन्या वास्तू आजही पाहायला मिळतात. भिवंडीतील ब्राह्मण आळीत असणारा १८ खोल्यांचा जोगळेकर वाडा त्यापैकीच एक. याच्या भिंती दोन फूट जाडीच्या आहेत आणि तो चौपाखी कौलारू आहे. अनेक जुन्या वाड्यांची जागा आता अपार्टमेंटनी घेतली आहे. 

वारलादेवी तलाववारलादेवी तलाव : हा विस्तीर्ण तलाव म्हणजे भिवंडीकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. येथे उद्याने, जॉगिंग ट्रॅक आहेत. सायंकाळी येथील वातावरण खूपच छान असते. तलावाच्या पूर्वेस ‘इस्कॉन’ मंदिर आहे. कलवार भागात कालिकामाता मंदिर आहे. हे मंदिर पर्यटन केंद्र व्हावे अशी भिवंडीकरांची मागणी आहे. भिवंडी शहरात मुस्लिम वस्तीही पूर्वापार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मशिदीही आहेत. 

लोनाड  बौद्ध लेणीलोनाड बौद्ध लेणी : ‘एक अपूर्ण राहिलेले अजिंठा’ असे इतिहासकार लोनाडचे वर्णन करतात. सन १८७५मध्ये सिनक्लेअर या अधिकाऱ्याने ही लेणी शोधली. कल्याणजवळील ही बौद्ध लेणी गेली १५०० वर्षे निसर्गाशी लढा देत महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत उभी आहेत. ही लेणी इसवी सनाच्या पाच ते सातव्या शतकात कोकणचे मौर्य राजे यांच्या काळात कोरण्यात आली आहेत. एका टेकडीच्या मध्यभागी एक चैत्य गुंफा आहे. शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना असलेली ही गुंफा असून, शिल्पपट्ट्यात जातककथा कोरलेल्या दिसून येतात. बाहेर चार खांब असलेला वऱ्हांडा आणि आतील बाजूस मोठे सभागृह आहे. गुहेच्या एका बाजूला पाण्याचे टाके आहे. उन्हाळ्यातही येथे पाणी असते. लेण्यातील काही मूर्तीवर शेंदूर फासला असल्याने शिल्पाची ओळख पटत नाही. गुहेमध्ये दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात खांडेश्वरी देवीची मूर्ती आहे, तर दुसऱ्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे. या मूर्ती नंतर बसविल्या असाव्यात. प्राचीन काळी लोनाड हे बौद्धधर्मीयांचे केंद्र होते. बौद्ध भिक्खू त्या काळात या गुहेमध्ये आराम करत. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणी जरूर भेट द्यावी. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनोळे फाटा लागतो. या फाट्यावरूनच लोनाडला जाता येते. 

लोनाडचे शिवमंदिर : लेण्यांपासून काही अंतरावर हे शिवमंदिर आहे. ठाणे परिसरात सन ५००च्या सुमारास बौद्ध संस्कृती अस्तित्वात होती, तर सन १२००च्या दरम्यान शिलाहार राजे सत्तेवर होते. त्यांच्या काळात उभारलेल्या मंदिरापैकी हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. साधारण त्याचा सुमारास अंबरनाथचे शिवमंदिरही उभे राहिले. हे मंदिर अंबरनाथच्या मंदिराअगोदर ५० वर्षे बांधले असावे. अपरादित्य राजाचा प्रधान मंगलय्या याचा पुत्र अन्नपय्या याचा ताम्रपट सापडला आहे. शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या मंदिराला देवाच्या पूजेसाठी ‘दक्षिणायन दान’ म्हणून भादाणे गाव इनाम दिले, अशा आशयाचा मजकूर त्यावर आहे. रामेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची मोठ्या प्रमाणावर वाताहत झालेली आहे. मंदिरातील गाभारा व शिवलिंग चांगल्या स्थितीत आहे; मात्र खांब मोडकळीस आलेले आहेत. मंदिरातील खांबांवर आणि भिंतीवर नक्षीकाम आणि विविध देव-देवतांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. 

बापगाव शिलालेख : लोनाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर चौधरपाडा गाव आहे. येथील बाबू वाकडे यांच्या शेतात कित्येक वर्षांपूर्वी एक शिलालेख आढळून आला. उल्हास नदीवरील गांधारी पूल ओलांडल्यानंतर कल्याण-आधारवाडी-सापे रस्त्यावर बापगाव नावाचे गाव आहे. येथे केशिदेव दुसरा याच्या चौधरपाड्यातील शके ११६१मधील (सन १२३९) शिलालेखात बापगाव किंवा बोपेग्रामचा पहिला उल्लेख वाचायला मिळतो. सन १८८२मध्ये पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी हा शिलालेख उजेडात आणून त्याचे वाचन केले. लेखाची भाषा संस्कृत आणि नागरी आहे. त्यावर शक संवत ११६१ विकारी संवत्सर, माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री म्हणजे ग्रेगॅरियन कॅलेंडरप्रमाणे २४ जानेवारी १२४०, श्रीकेशीदेव दुसरा (अपरार्कराज याचा पुत्र) याचे सोमेश्वर (रामेश्वर) मंदिर. अशी मंदिरासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती तेथे आहे. ही शिळा एक फूट जाड, एक फूट पाच इंच रुंद व सहा फूट उंच असून, शिलालेखात वरच्या बाजूला मध्यभागी मंगलकलश व त्याच्या दोन बाजूला चंद्र-सूर्य असे चित्र कोरले असून, त्याखाली देवनागिरी संस्कृतमध्ये २२ ओळी आहेत व सर्वांत खाली मिथुनशिल्प कोरले आहे. या शिलालेखातील वरच्या काही ओळींत शिलाहार राजांची वंशावळ आहे. उघड्यावर पडून राहिलेला शिलालेख गावकऱ्यांनी गावातील शिवमंदिरात जतन करून ठेवला आहे. 

टिटवाळा महागणपतीटिटवाळा : हे ठिकाण येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिरामुळे प्रसिद्ध झाले. हे मंदिर चिमाजीअप्पांनी वसईत पोर्तुगीजांवर विजय मिळविल्यानंतर बांधले. माधवराव पेशवे यांची श्री गणेशावर नितांत श्रद्धा होती. पेशवाईत राज्यकारभार करताना अधूनमधून विश्रांतीसाठी ते टिटवाळा या रम्य ठिकाणी येत असत. या देवळाचा अनेक वेळा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिर बांधल्यावर माधवराव पेशव्यांनी श्रींची पूजा, तसेच मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जोशी कुटुंबीयांना वहिवाटदार म्हणून नेमल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत इंग्लंडच्या महाराणीने १८५९मध्ये नव्याने सनदा करून दिल्या. त्या आजदेखील जोशी कुटुंबीयांनी जतन करून ठेवल्या आहेत. टिटवाळा येथे विठ्ठल मंदिरही आहे. 

टिटवाळा तलावगणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. स्थानिक प्रचलित कथेप्रमाणे येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस ‘विवाहविनायक’ असे म्हटले जाते. दुर्वास मुनींच्या शापामुळे दुष्यंत राजाला पत्नी शकुंतलेचा विसर पडला. त्याच्या विरहाने शकुंतला व्याकुळ झाली होती. त्या वेळी कण्व मुनींनी याच मूर्तीची स्थापना करून उपासना करण्यास शकुंतलेला सांगितले होते. 

चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरव्ही येथे फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नाही. आपण थेट गाभाऱ्यात पोहचतो. मंदिर परिसरात गेल्यावर मनाला शांती मिळते. शेंदरी रंगाची गणेशमूर्ती खूपच आकर्षक आहे. टिटवाळा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने धर्मार्थ हॉस्पिटलही चालविले जाते. तसेच दुष्काळग्रस्तांना मदतही केली जाते. ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक उपक्रम चालविले जातात. मंदिर परिसर खूप छान असून, एक छोटा तलावही येथे आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरले, की मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. विशेष म्हणजे येथील रस्त्यावर अजूनही टांगे धावतात.
 
श्रीगंगा गोरजेश्वर

श्रीगंगा गोरजेश्वर :
शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळ्यापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी काळू नदीपात्रात हे एक पुरातन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात होडीने जावे लागते. हे मंदिर ५०० वर्षे जुने असावे, असे बोलले जाते. त्याचे बांधकाम प्राचीन हेमाडपंती शैलीतले. मंदिरातील शिवलिंगही पाण्यात आहे. मंदिर परिसरातील विविध देव-देवतांच्या मूर्ती, शिल्प आणि घोटीव शिलालेख या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. मंदिराच्या वरच्या बाजूला नदीपात्रात असणाऱ्या मोठ-मोठ्या दगडांवर अवाढव्य अशी सात भोके कोरलेली दिसून येतात. या मंदिरामागे गरम पाण्याची पाच कुंडे आहेत. येथे पर्यटन विभागाने लक्ष देऊन मंदिर परिसरातील गाळ काढावा, तसेच रस्त्याची सुविधा करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. आसपासच्या गावातून भाविक, तसेच अभ्यासू पर्यटक येथे येत असतात. 

वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंडे

वज्रेश्वरी :
पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील देवतेच्या सन्मानार्थ या शहराचे नाव वज्रेश्वरी करण्यात आले. हे मंदिर थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजीअप्पांनी नव्याने बांधले. वज्रेश्वरीला वज्रबाई आणि वज्रयोगिनी म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवर देवी पार्वती किंवा आदिमायेचा अवतार मानले जाते. तिच्या नावाचा शब्दशः अर्थ ‘वज्राची बाई (गडगडाट)’ असा आहे. हे गाव गरम पाण्याच्या कुंडांमुळे प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेप्रमाणे, श्रीराम आणि श्री परशुराम यांची येथे भेट झाली असे म्हणतात. पौराणिक कथेत म्हटले आहे, की परशुरामांनी वडवली येथे यज्ञ (अग्नी अर्पण) केला. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशी भावना आहे. 

वज्रेश्वरी मंदिर

या मंदिराच्या आजूबाजूला पाच ते १० किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याची २० ते २२ कुंडे आहेत. सन १७३९मध्ये चिमाजीअप्पांनी वसईचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी वडवली भागात तळ ठोकला होता. तीन वर्षे ही मोहीम चालू होती. चिमाजीअप्पांनी वज्रेश्वरी देवीला प्रार्थना केली होती, की वसई मोहीम फत्ते झाली तर आपण देवीसाठी मंदिर बांधू. स्थानिक दंतकथेनुसार, चिमाजीअप्पांना वज्रेश्वरी देवी स्वप्नात दिसली आणि किल्ला कसा जिंकता येईल हे तिने सांगितले. त्याप्रमाणे वसईत पोर्तुगीजांचा पराभव झाला. त्याचा विजय साजरा करण्यासाठी आणि वज्रेश्वरी देवीला बोललेले नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजीअप्पांनी मंदिर बांधून घेतले. 

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार वसईच्या किल्ल्याप्रमाणे बांधले असून, त्यावरील नगारखाना बडोद्याचे राजे गायकवाड यांनी बांधला आहे. मंदिराला तटबंदी आहे. मंदिरासमोरील दीपमाळा नाशिक येथील सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या २२ पायऱ्यांपैकी एका पायरीवर सुवर्णकासवही कोरलेले आहे. मुख्य मंदिराचे तीन विभाग आहेत. मुख्य गर्भागृह (गाभारा), आणखी एक गर्भागृह आणि सभामंडप. गाभाऱ्यात एकूण सहा मूर्ती आहेत. उजव्या व डाव्या हातात तलवार आणि गदा असलेली वज्रेश्वरी देवीची मूर्ती आहे. बाजूला रेणुकादेवी व महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. देवीच्या मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी आणि मुकुटांनी सुशोभित केल्या आहेत, तसेच चांदीच्या कमळांवर उभ्या आहेत आणि चांदीच्या छत्र्या त्यांच्या मस्तकावर आहेत. बाहेरील गर्भागृहात गणेश, भैरव, हनुमान आणि मोराबा देवीसारख्या स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. 

अकलोली : तानसा नदीच्या काठावर असलेली येथील गरम पाण्याची कुंडे प्रसिद्ध आहेत. येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व आहे. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशी भावना आहे. सुट्टीच्या दिवसांत या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात. हे ठिकाण वज्रेश्वरीजवळ आहे. 

गणेशपुरीगणेशपुरी : वज्रेश्वरीच्या उत्तर-पूर्व बाजूस गणेशपुरी येथेही गरम पाण्याची कुंडे आहेत. पौराणिक कथेप्रमाणे वसिष्ठ ऋषींनी येथे गणपतीची आराधना केली होती. म्हणूनच गणेशपुरी असे नाव गावाला देण्यात आले आहे. स्वामी नित्यानंद यांचे शिष्य बाबा मुक्तानंद यांनी स्थापित केलेले गुरुदेव सिद्ध पीठ येथे असून, परदेशातूनही त्यांचे अनुयायी येथे येत असतात. स्वामी मुक्तानंदांनी आपल्या गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री गुरुदेव आश्रम असे नाव दिले. स्वामी नित्यानंद यांची समाधी, भीमेश्वर गणेश मंदिरे आश्रमाच्या अगदी जवळ आहेत. वारली या आदिवासी जमातीसाठी येथे एक आश्रम चालविला जातो. 

शहापूर : महाराष्ट्र शासनाने शहापूरला पर्यटनाचे केंद्र म्हणून घोषित केले. शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. हा तालुका ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा आहे. शहापूर हे निसर्गाच्या कुशीत विसावलेले आहे. शहापूर पश्चिमेकडील घाटाने (सह्याद्री) वेढलेले आहे. माहुली किल्ला आणि आजोबा पर्वत यांसारखी येथील ठिकाणे ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहेत. स्थानिक मंदिरांमध्ये मानस मंदिर आणि गुरुद्वारा यांचा समावेश आहे. 

मानस मंदिर, आसनगाव

मानस मंदिर, आसनगाव :
शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळ अत्यंत सुंदर जैन मंदिर आहे. माहुली किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य ठिकाणी ही सुंदर वस्तू जैन समाजाने निर्माण केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर हे ठिकाण आहे. 

मानस मंदिर, आसनगाव

आटगांव शिवमंदिरआटगाव : या मंदिराची फारशी ऐतिहासिक माहिती नाही. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरातील गाभाऱ्यामधील शिवलिंग काळाच्या ओघात नष्ट झाले असावे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील गणपतीचे शिल्प हे ते मंदिर शिवाचे असल्याचे द्योतक आहे. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटलीकर, शैलेश पाटील व सात्त्विक पेणकर यांच्या लेखनामुळे अशी अपरिचित गावांची इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासकांना माहिती होते आहे. या गावातील प्राचीन मंदिर पूर्ण भग्नावस्थेत आहे; पण अस्तित्वात असलेले जोते, नक्षीकाम केलेले आडवे पडलेले अखंड खांब आणि गाभाऱ्यावरून मंदिराचे स्वरूप डोळ्यापुढे येते. येथील विखुरलेल्या अवशेषांवरून व येथे दिसून येणारे वीरगळ यांमुळे हे मंदिर बहुधा शिलाहार काळात अंबरनाथ मंदिराच्या वेळीच बांधले गेले असावे, असा कयास आहे. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मंदिराबद्दल माहिती आहे. 

आटगाव शिवमंदिरातील वीरगळ (आटगाव फोटो सौजन्य : थिंक महाराष्ट्र)अभेद्य माहुलीगड : या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली याबद्दल माहिती उपलब्ध नाही. शहापूर तालुक्यातील त्रैकुटक उर्फ माहुलीगड हा गिरिभ्रमण, दुर्गभ्रमण करणाऱ्या साहसी तरुणांचा अत्यंत आवडता गड मानला जातो. याची समुद्रसपाटीपासून उंची २८५० फूट आहे, हा गड घनदाट अरण्याने व्यापलेला असून, नवरा, नवरी, भटजी नावाचे त्याचे आकाशाला भिडणारे सुळके दुरूनच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या ठिकाणाला पौराणिक, तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेतील हे महत्त्वाचे ठिकाण आहे. 

माहुलीगड अतिशय प्राचीन आहे. ११व्या शतकात माहुली पर्वताचा उल्लेख गोरक्षनाथांनी आपल्या किमयागार ग्रंथात रामायणातील ‘किष्किंधाकांड’ अध्यायातील अजय पर्वत, त्रैकुटक उर्फ माहुली असा केला आहे. देवगिरीचे यादव व शिलाहार यांच्यातील लढाईनंतर शिलाहारांचे अस्तित्व संपुष्टात आले. त्यानंतर ठाणे प्रदेशावर नागरशाचा काही काळ अंमळ होता. महिकावतीच्या बखरींप्रमाणे या वेळी देवगिरीच्या यादवांनी त्यांचा प्रधान हेमाड पंडित याला ठाणे जिंकण्यासाठी पाठविले. परंतु नागरशाचा पराक्रमी पुत्र त्रिपुरकुमार याने हेमाड पंडिताचा पराभव केला. त्या वेळी त्रिपुरकुमारने हेमाड पंडिताला माहुली गडापर्यंत मागे हटविले. हेमाड पंडिताने माहुलीगडावर आश्रय घेतला होता. तेथे त्याची कोंडी झाली. हेमाड पंडित देवगिरीस परत गेला. 

त्यानंतर देवगिरीच्या रामदेवराव यादवांनी शांतपणे रणनीती आखली होती; पण त्याच वेळी अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला व लूट करून निघून गेला. त्यानंतर रामदेव यादव याचा मुलगा राजा बिंबदेवाने ठाण्यावर आक्रमण केले व ठाणे परिसराचा ताबा घेऊन नागरशाचे राज्य संपविले. त्यानंतर इ. स. १४८५मध्ये हा परिसर निजामशहाकडे गेला. त्यानंतर बहामनी काळात शहाजीराजे निजामशाहीमध्ये दाखल झाले, त्या वेळी दिल्लीच्या मुघल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाहीवर हल्ले करू लागल्या. १६३५-३६च्या सुमारास शहाजीराजांनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर-शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला व या जागेला बालशिवाजींचा पदस्पर्श झाला.
 
माहुली किल्ला

त्या वेळी महाबतखानचा मुलगा खानजमान याने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंना किल्ला सोडावा लागला. पुढे जानेवारी १६५८मध्ये रोजी शिवरायांनी हा किल्ला मुघलांकडून परत घेतला; पण १६६१मध्ये तो मुघलांना परत द्यावा लागला. लगेचच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकूट परत करावे लागले. त्यानंतर मुघलांचा सरदार मनोहरदास गौड याने गडावर बरेच बांधकाम करून गड बळकट केला. फेब्रुवारी १६७०मध्ये खुद्द शिवाजीराजांनी माहुलीवर हल्ला केला; पण तो अयशस्वी झाला. नंतर १६ जून १६७० रोजी मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला व मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे तीनही किल्ले जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. 

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत; मात्र किल्ल्यावरून भातसा, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. पूर्वेला हरिश्चंद्रगड, दक्षिण-पूर्वेला माथेरान रांग, दक्षिण-पश्चिमेला तानसा खोरे व कोणत्याही दिशेला नजर जाईल तिथपर्यंत सह्याद्रीची गिरिशिखरे पाहायला मिळतात. मोडक सागर, भातसा या तलावांचे विहंगम दृश्य दिसते. आसनगावमार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने जावे लागते. किल्ल्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. पहारेकऱ्यांच्या देवड्या, वाड्याचे काही अवशेष, ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष दिसत नाहीत. माहुलीगडावर घनदाट जंगल आहे. मोर, ससे, रानडुक्कर, साळिंदर, सांबर, हरीण आणि बिबटे अशा वन्य प्राण्यांची येथे वस्ती आहे. मुख्य म्हणजे येथील जंगलसंपदा विविधतेने नटलेली आहे. साग, ऐन, खैर, पळस, पांगारा, सावर या वृक्षांच्या बरोबरीने कडुनिंब, निर्गुंडी, अडुळसा, रिठा अशा अनेक प्रकारच्या वनौषधी आढळतात. येथील आदिवासी गडावरील रिठ्याची फळे गोळा करून विकतात. गाइडशिवाय या किल्ल्यावर जाऊ नये. 

कसे जाल भिवंडी परिसरात? 
भिवंडी हे दिवा-वसईरोड मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे; मात्र कल्याण हे मोठे जंक्शन असल्याने उत्तर-दक्षिण-पूर्व बाजूने येणाऱ्या गाड्यांसाठी सोयीचे आहे. भिवंडीतून दोन महामार्ग नाशिककडे जातात. एक जव्हार मार्ग व दुसरा कसारा-इगतपुरी मार्ग. भिवंडी रस्तेमार्गाने पुणे-मुंबईशी जोडलेले आहे. जवळचा विमानतळ मुंबई. राहण्यासाठी येथे चांगली हॉटेल्स उपलब्ध. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून पर्यटनासाठी योग्य. 

(या भागातील काही माहितीसाठी ‘थिंक महाराष्ट्र’चे सात्त्विक पेणकर यांचे सहकार्य लाभले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयश्री चारेकर About 14 Days ago
नविन बरीचशी माहिती मिळाली.मस्तच
0
0

Select Language
Share Link
 
Search