Next
योगसाधना म्हणजे आत्मशक्ती ओळखण्याचे साधन
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे प्रतिपादन; योगदिन रत्नागिरीत उत्साहात साजरा
BOI
Friday, June 21, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘योगसाधना म्हणजे आत्मशक्ती ओळखण्याचे साधन आहे. योगसाधनेतून स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करू या,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २१ जून रोजी जागतिक योगदिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले.

योगासने करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मान्यवर

रत्नागिरीतील माळनाका परिसरातील भागीरथी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीकर उत्साहाने यात सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक संकल्पना दिली आहे. २०१४मध्ये त्यांनी योगासनांसाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भाषण केले आणि जून २०१५पासून आंतरराष्ट्रीय योगदिन सुरू करण्यात आला. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये काम करीत असताना प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी असते. हे सर्व करीत असताना आपले मन आणि शरीर यांच्यात ताळमेळ ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत असते. योग म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रिया असे मला वाटते. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आपण आपल्यामधील क्षमता जागी करू आणि नियमित योगासने करून आरोग्यसंपन्न राहू या.’ वैद्य अक्षता सप्रे यांनी योगासनांचे जीवनातील महत्त्व सांगितले. ‘आरोग्याच्या जपणुकीसाठी, बदलत्या जीवनशैलीमध्ये होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न राहण्यासाठी योगासने करणे फार महत्त्वाचे आहे,’ असे त्या म्हणाल्या.या वेळी शिर्के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी योगगीत सादर केले. राज्य स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या वेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे यांनीही या वेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. या वेळी पतंजली योग समितीच्या रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष ॲड. विद्यानंद जोग यांनी उपस्थितांना योगासनांचे धडे दिले.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मैदानावर योगदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, कंचन चव्हाण, पतंजली योग समिती, राज्य कार्यकारिणीच्या सदस्या रमाताई जोग, रत्नागिरी पतंजली योग समितीचे अध्यक्ष ॲड. विद्यानंद जोग, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जिल्हा परिषदेचे श्री. आयरे, वैद्य अक्षता सप्रे, अनंत आगाशे आदी योगप्रेमी, तसेच गोगटे- जोगळेकर महाविद्यालयासह रा. भा. शिर्के हायस्कूल, जीजीपीएस आणि नानल विद्यालय आदी विद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केला.

(योगासनांची शास्त्रीय माहिती आणि शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. नेहमी योगासने करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्याचा उपयोग होऊ शकेल.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search