Next
‘मोदी सरकारचे काम गांधी विचारांनुसार’
गांधी विचारांच्या प्रसारासाठी राज्यभरात पदयात्रा
प्रेस रिलीज
Wednesday, October 03, 2018 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नागपूर येथे काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री पदयात्रेचे नेतृत्व करताना देवेंद्र फडणवीस.मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरला त्यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी अभिवादन केले आणि गांधी विचाराच्या प्रसारासाठी पदयात्रा काढल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे हजारो कार्यकर्त्यांच्या पदयात्रेचे नेतृत्व केले, तर प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी जालना जिल्ह्यात अंबड येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

या प्रसंगी फडणवीस नागपूर येथे बोलताना म्हणाले, ‘गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण भारतात गांधी विचार व कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य भारतीयांना जोडले व त्याचबरोबर स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास अशी तत्त्वे दिली. गांधीजींच्या विचाराने मोदी सरकार काम करत आहे. मोदीजींनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ ही महात्मा गांधी यांना आदरांजली आहे. या योजनेत भारतात मोठ्या प्रमाणात शौचालय निर्माण करण्यात आली. महाराष्ट्रात २०१४पर्यंत ५० लाख शौचालये होती व ४५ टक्के जनतेला ही सुविधा उपलब्ध होती. राज्यात गेल्या तीन वर्षात ६० लाख शौचालये निर्माण करण्यात आली असून, राज्य १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. गांधी विचार जनतेत रुजले पाहिजेत यासाठी ठिकठिकाणी प्रत्येकी दीडशे किलोमीटरपर्यंत पदयात्रा टप्प्या-टप्प्याने काढण्यात येतील.’

मुंबई येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना शिक्षणमंत्री विनोद तावडे.स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत मुख्यमंत्री सहभागी झाले होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, लघु उदयोग विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी पदयात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी पदयात्रेत पाच किलोमीटर चालून अभिवादन केले.

राज्यातील ११६ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘भाजप’च्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढल्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम आश्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली.

या वेळी खासदार रामदास तडस, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी चरख्यावर सूत कताई केली व यात्री निवास येथे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील विविध आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या ‘गांधी पॅनोरमा- २०१८’ फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन केले. जगातील सर्वांत मोठ्या चरखा मांडणी शिल्पाचे अनावरण मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

जगातील सर्वांत मोठे चरखा मांडणी शिल्प‘सबकी योजना सबका विकास’ अभियानाचे उद्घाटन मुंबईत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. या प्रसंगी त्या म्हणाल्या, ‘महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, स्वच्छता, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले, तरच खेड्यांचा विकास होऊ शकतो. हेच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावीपणे राबविले आहेत.’

मुंबईत ‘भाजप’ कार्यकर्त्यांनी भव्य पदयात्रा काढली. शिक्षणमंत्री तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता व प्रदेश उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. राज्यात ठिकठिकाणी ‘भाजप’ कार्यकर्ते पदयात्रांमध्ये उत्साहाने व मोठ्या संख्येने सहभागी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी येथे पदयात्रा काढली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी येथे खासदार कपिल पाटील यांनी सभेमध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली व तेथून कार्यकर्त्यांच्या दोन पदयात्रा सुरू झाल्या. भिवंडी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी या पदयात्रांचे स्वागत केले.

चरख्यावर सूत कताई करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवा.‘भाजप’ प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी येथे पदयात्रेचे नेतृत्व केले व स्वच्छता अभियानात भाग घेतला. नाशिक शहरात कुष्ठरोगी बांधव पदयात्रेत सहभागी झाले. सुरगाणा तालुक्यात आदिवासी भागात ‘भाजप’ प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. या वेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व ‘भाजप’ लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अहमदनगर शहरात साध्वी प्रीती सुधाजी महाराज पदयात्रेत सहभागी झाल्या व त्यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड येथे ‘भाजप’ कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारा रथ तयार केला व संपूर्ण शहरात संदेश देणारी पदयात्रा काढली. पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भव्य पदयात्रा काढली. या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ‘भाजप’चे सर्व आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. लातूरमध्ये स्वच्छता व आरोग्याचा संदेश देणाऱ्या पदयात्रा ठिकठिकाणी काढण्यात आल्या. त्यामध्ये कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील सहभागी झाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search