Next
‘टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा’
दुष्काळ निवारण समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना
BOI
Wednesday, November 14, 2018 | 11:36 AM
15 0 0
Share this storyसोलापूर : ‘या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून टॅंकरसाठी मागणी येईल. अशी मागणी आल्यास टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या.

जिल्हा दुष्काळ निवारण समितीची बैठक पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजित केली होती. त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागाला त्यांनी सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘या वर्षी जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाला आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने आठ उपाययोजना निश्चित केल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होईल. अशा प्रकारची मागणी आल्यास त्याबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांत पाठवला जावा. प्रत्यक्ष पाहणी केली जावी.’

‘चारा पिकविण्यासाठी प्राधान्य दिले जावे; तसेच खासगी क्षेत्रातील आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पिकवल्या जाणाऱ्या चाऱ्याबाबतची माहिती संकलित केली जावी,’ अशा सूचनाही देशमुख यांनी या वेळी दिल्या.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, ‘पुढील मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात सुमारे ५४० टँकर आणि २१७ चारा छावण्या सुरू कराव्या लागतील. शासनाने निश्चित केलेल्या आठ उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल; तसेच सर्व संबंधित विभागानीही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात.’

दरम्यान, या बैठकीत जिल्ह्याबाहेर चारा विकण्यास बंदी, चारा पिकविण्यासाठी प्राधान्य, बियाण्यांचे वाटप, थकीत कर्जाचे पुनर्गठण, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक हिताची कामे, दुष्काळ निवारण नियंत्रण कक्षाची स्थापना, टँकर आणि चारा छावण्या या ठळक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उपजिल्हाधिकारी किशोर पवार, सचिन ढोले, मारुती बोरकर, प्रमोद गायकवाड, दीपक शिंदे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे भांजे, जीवन प्राधिकरणाचे चंदनशिवे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link