Next
‘पानगळ’ : मनाला चक्रावून टाकणारं अद्भुत कोडं
BOI
Tuesday, April 02, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हृषीकेश गुप्ते या लेखकाच्या लांब पल्ल्याच्या गूढ कथा कायमच व्यक्ती आणि त्यांच्या भावनावलयांना शब्दबद्ध करू पाहतात. आदिम जाणिवा, मूलभूत गरजा-भावना, डोकं चक्रावून टाकणारी कोडंसदृश मांडणी आणि ठराविक टप्प्यांवर वाचकाला बसणारे जबरदस्त धक्के या सर्वांतून जन्म घेणाऱ्या या कथा असतात. याच प्रकारच्या घटक तत्त्वांचा सुयोग्य अंतर्भाव असणारी ‘पानगळ’ वाचकाच्या दीर्घकाळाकरिता स्मरणात राहते... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘घनगर्द’ या हृषीकेश गुप्तेंच्या संग्रहातील ‘पानगळ’ या कथेबद्दल.... 
.....................
उत्क्रांतीपासूनच मनुष्य काही आदिम भावना सोबत घेऊन आलेला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत या भावना मनुष्यासोबत असतात. इतकंच नाही, तर त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमितही होतात. प्रत्येक भावनेची लक्षणे वेगवेगळी, पोत निरनिराळा. प्रत्येकाच्या संवेदनेत पाझरत असणारं त्या त्या भावनेचं स्थान आणि प्रमाणही वेगवेगळं. आयुष्याच्या एकूण परिघात, एखाद्या भावनेशी होणारी पुनर्भेटही घडते ती वेगवेगळ्या टप्प्यांवर. व्यक्तीची एकूणच प्रकृती, तिची जडणघडण, पूर्वजन्मीचे संचित, वर्तमान आणि भविष्यातली स्पष्टता अथवा संदिग्धता, आजूबाजूस घडणाऱ्या आणि मनात स्रवणाऱ्या घटनांचा टकराव, त्या व्यक्तीच्या नशिबातील बरे-वाईट योग इत्यादी गोष्टींचा एकत्र मिलाफ होऊन ती व्यक्ती घडत असते. प्रत्येक व्यक्तीसोबत तिच्या भावनांचं वलय असतं. 

हृषीकेश गुप्तेंच्या लांब पल्ल्याच्या गूढ कथा कायमच अशा काही व्यक्ती आणि त्यांच्या भावनावलयांना शब्दबद्ध करू पाहतात. अशा व्यक्ती, त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या अथवा घडू पाहणाऱ्या काही घटना व त्यांची दृश्यादृश्य भावनावलये अशी सर्व सामग्री हाताशी घेऊन गुप्ते त्यांच्या कथेचं जाळं एखाद्या कुशल कारागीराप्रमाणे निगुतीने विणायला घेतात. कथा नावाचं एक चित्ताकर्षक जाळं तयार होतं आणि गुप्तेंचा वाचक पाहता पाहता या जाळ्यात अलगद अडकतो. गुरफटतो. धडपड करून सुटू पाहतो. गोष्टीत विचारलेल्या कूटप्रश्नांची उकल करू पाहतो. गोष्ट वाचून संपल्यानंतरही त्याचं अनेकदा पुरेसं समाधान होत नाही. तो उत्तर शोधत राहतो. गोष्ट वाचून संपली असली, पुस्तक मिटून ठेवलेलं असलं, तरी वाचकाच्या संज्ञ मनात मात्र ही गोष्ट काही काळाकरिता सुरूच राहते. 

गुप्तेंच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘घनगर्द’ नावाच्या तिसऱ्या गूढ कथासंग्रहात ‘पानगळ’ नावाची गोष्ट आहे. ‘भय’, ‘अपराधगंड’ आणि ‘काम’ या आदिम भावनांवर आधारलेली ही एक दीर्घकथा आहे. या संग्रहातील माझी सर्वांत आवडती कथा. कथेच्या प्रारंभी, कथानायकाच्या हातात एक पत्र पडतं. त्याचं बालपण ज्या छोट्याशा खेडेगावात गेलं आहे, तिथे निघून ये असं त्या पत्रात सुचवलेलं असतं. पत्रातला मजकूर वाचून लेखकाला मनात कैक वर्षं दाबून ठेवलेला अपराधगंड सतावू लागतो. तो पत्रात लिहिलेल्या गावी म्हणजेच फुलवर्धनला जायला निघतो. या प्रवासात कथानायकाला त्याचा इतिहास आठवू लागतो. आठवणी फेर धरू लागतात. हृषीकेश गुप्तेंच्या खासमखास उपमा अलगद समोर येऊ लागतात. ‘निर्जीव आणि निर्लेप स्वभावाचे वडील’ आणि ‘नुकत्या भिजलेल्या मातीचा जिवंत आणि लकाकणारा ओलावा असणारी आई’, यांसारख्या केवळ दोन वाक्यांत दोन व्यक्तिचित्रं स्वभावासकट उभी राहतात. 

कथानायक बसमध्ये बसून चाललेला असताना बाहेर कोसळणारा पाऊस आणि मनात येणाऱ्या आठवणी एका तालात आणण्याकरिता, त्यांच्यात तादात्म्य साधण्याकरिता, ‘आठवणी कोसळत राहिल्या’सारखी मुद्दामहून केलेली योजना दिसते. मग कथेत होतो सर्वांत मुख्य पात्राचा प्रवेश. देवधर काकूंचा. शाळेतून येताना तिन्हीं सांजेच्या वेळी रस्त्याच्या कडेच्या ओहोळात खेळणारी मुलं, त्यांच्यात असणारं सांस्कृतिक अंतर, कातरवेळ सुरू असतानाची संदिग्धता, असुरक्षितता इत्यादी गोष्टींचं वर्णन अवघ्या दोन पानांत करून गुप्ते कथेतल्या केंद्रस्थानी असणाऱ्या पात्राकडे येतात. देवधर काकूंच्या प्रथम दर्शनाबरोबरच, कथानायक नाथाच्या मनात जागृत झालेल्या आदिम भावना लेखक मोठ्या समर्थपणे मांडतो. ‘देवधरकाकूंची नाथाच्या गालावर थांबलेली उष्ण बोटं, मोरपिसासारखी मखमली आणि फणसाचा वास असलेली. उष्ण पण हवाहवासा चटका देणारी.’ कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त परिणाम साधणारी, सुरेख तरीही सहज, अशी वाक्यरचना. 

या अकस्मात भेटीनंतर नाथा जेव्हा घरी जातो, तेव्हा देवधरकाकूंबद्दल त्याच्या आईने व्यक्त केलेलं मत. लैंगिक भावनांच्या उद्दीपनेबरोबरच तातडीने निर्माण होणारी भयाची भावना. संपूर्ण कथेत एकामागून एक येणाऱ्या उलटसुलट भावना आणि त्यांची अप्रतिम गुंफण मोठ्या नजाकतीने केलेली दिसते. भय भावना निर्माण होते, तोपर्यंतच नाथाच्या वडिलांची टिप्पणी सामोरी येते. त्यातून केलेलं सूचक भाष्य, परत एकदा नायकाला आणि पर्यायाने वाचकाला संभ्रमात पाडणारं आहे. यानंतरचा प्रसंग, गुप्तेंच्याच ‘चौरंग’ कादंबरीच्या मुखपृष्ठाची आठवण करून देणारा वाटतो. लेखक स्वतःची पुनर्भेट घेतो, तशा स्वरूपाचा हा प्रसंग. सूचक. कमीत कमी शब्दात मांडणी असणारा. ठसठशीत प्रतिकं दर्शवून अतिशय परिणामकारक ठरणारा असा. यानंतर कथानायक आणि त्याचा साथीदार रघू, देवधरवाडीत प्रवेश करतात. ही देवधरवाडी म्हणजे कथेतलं एक महत्त्वाचं पात्र आहे. अस्सल कोकणी बाजाचं. जिवंत आणि रसरशीत! ‘नारळाच्या झावळ्यांवर लकाकणारा उन्हाचा पिवळसर वर्ख’, अंगणाचं वर्णन,’ वाडीला गोलाकार वही घातली होती’सारखी वाक्यरचना, ‘विणावळ’ सारखे खास शब्द, फुलझाडे, विहीर इत्यादी गोष्टींचे वर्णन, तिथे असणारं नागांचं युग्म इत्यादी गोष्टींनी युक्त असलेली ही वाडी गुप्ते अतिशय मेहनतीने डोळ्यासमोर उभी करतात.

 वाचकांच्या मनात एकाच वेळी आकर्षण आणि भीती जागवताना त्याला सुप्त लैंगिक पदरही जोडतात. या पदराबरोबरच, येते ती अपराधी भावना. कथेच्या मुळाशी असणाऱ्या या भावना जागोजाग आपल्या भेटीस येत राहतात. पावला-पावलांवर भेटतात. मग अचानक दिसतो तो या बागेतला हापूस! अवकाळी आलेला. नाथा आणि रघूच्या बालमनात आकर्षणनिर्मिती करणारा. त्यामागून वाचकाच्या नजरेसमोर उभं राहतं ते देवधर वाड्याचं दार. दाराच्या जवळचा प्रसंग वाचताना अंगावर काटा फुलतो. या काट्यातून सावरतो न सावरतो, तोपर्यंत देवधर काकू परत दिसतात. एकाच वेळी सारख्याच तीव्रतेनं आकर्षक आणि भयप्रद भासणाऱ्या. या नंतरच्या प्रसंगात गुप्ते देवधरकाकूंसोबत भयाची भावना जोडण्याकरिता कथेत आधी येऊन गेलेल्या गोष्टींबरोबर त्यांच्या पात्राची अनोखी वीण विणू लागतात. ती पात्रं, वास्तू, तिथले नाद केवळ डोळ्यांसमोर उभेच करत नाहीत, तर ते वाचकाला जाणवतील अशी शब्दयोजना करतात. गुप्तेंच्या शब्दांना एक अनोखा नाद आहे. लय आहे. त्याला एक शिस्तबद्ध ताल आहे. विवक्षित रचना आहे. यानतंर, नाथाच्या नजरेतून उभी राहते, ती देवधरवाड्यातील पुढची खोली. तिथल्या गूढ वस्तू. त्या खोलीत जाणवणारा ताण दर वाक्यागणिक जाणवू लागतो. मग नाथाला दिसतो तिथला वेगळ्या प्रकारचा काळोख. 

नाथा काळोखात शिरतो आणि त्याला उलगडू लागतं एक अपरिचित जग. इथलं वर्णन करतानाही देवधरवाडीमधल्या इतर वस्तूंसोबत त्याचा धागा जोडायला गुप्ते विसरत नाहीत. नाथाबरोबरच त्या आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या वास्तूरचनेत वाचक गुरफटू लागतो. कथा वर्तमान आणि भूतकाळात दोलायमान होत होत पुढे सरकू लागते. गुप्तेंच्या कथेमधला विचार, तत्त्वज्ञान, रचना, वर्णन हे सगळं अस्सल आहे. अनुभवाधिष्ठित आहे. या लिखाणात कोकणातल्या वाडीचा जिवंतपणा आहे. तिथल्या माणसांच्या जगण्यामधल्या व्यथा आहेत. संभ्रम आहे. रितेपण आहे. दु:खमिश्रीत गूढ आहे. निराळ्या संवेदना आहेत. गावभागात चर्चिल्या जाणाऱ्या सवंग गोष्टीदेखील आहेत. आसपास दरवळणारे गंध आहेत. चवी आहेत. नाद आहेत. एकूणच, ‘पानगळ’ ही सर्व गात्रांनिशी अनुभवायची गोष्ट आहे. फुलवर्धनचं बसस्थानक, तिथलं कँटीन, तिथे मिळणारी मिसळ, देवधरवाडी, तिथला हापूस, तिथली जनावरं, वाडा, देवधरकाकू, मंदिराचा परिसर, गाव, गावातला पाऊस हे सगळं गुप्तेंनी अतिशय ताकदीनं उभं केलं आहे. वाचताना या सर्व गोष्टी जिवंत झाल्याचं भासतं. देवधरवाडी, तिथलं रहस्य, त्या रहस्याचे साक्षीदार ठरल्याने उर्वरित आयुष्यावर झालेले परिणाम, देवधरकाकू आणि नाथा मंदिराच्या गाभाऱ्यात असतानाचा प्रसंग, रहस्य नाथाला कळतानाचा प्रसंग, रहस्य कळल्यानंतर काही काळाकरता वाटलेली मजा आणि उर्वरित काळाकरिता आतून सतत डाचत राहिलेली अपराध भावना हे सगळंच अतिशय परिणामकारकपणे समोर येतं. हृषीकेश गुप्तेंच्या कथांमध्ये गोष्टींमधली इमेजरी अतिशय बारकाईने उभी केलेली असते. रंग, स्पर्श, चव, वास, गंध, जाणिवा, अनुभव, कल्पना, सत्य, घटना, तत्त्व, तत्त्वज्ञान, भावना इत्यादींचा अनोखा मिलाफ या कथांमध्ये अनुभवायला मिळतो. प्रत्यक्ष ठिकाणी न जाताही त्या स्थळांची अनुभूती येईल इतक्या ताकदीचं हे लिखाण आहे. गोष्टीचं मूलतत्त्व, त्यात असलेलं कोडं, कोड्याची रचना, त्या रचनेत ठराविक जागी असणारे घटक, या घटकांची आणि तत्त्वांची घट्ट वीण असलेली बांधणी, जागोजाग बसणारे धक्के आणि शेवट होत असताना उलगडणारं एक निराळंच सत्य, हा गुप्तेंच्या कथांचा ठराविक साचा आहे. परंतु हा साचा दरवेळी नवं रूप घेतो, नवी किमया दाखवतो आणि बुचकळ्यात पाडतो. यातले प्रश्न, यातली पात्रं ही आपल्या रोजच्या बैठकीतली, विचारातली नसली, तरीही ती त्यांच्या जाणिवा आणि स्वभाव लेवून येतात. या जाणिवा व स्वभाव मनुष्यजातीच्या आरंभापासून त्यांचं स्थान अबाधितपणे राखून असतात. आपण या पात्रांमधे नकळत गुंतत जातो. लेखकाने केलेल्या योजनेनुसार अनेकदा चुकतो. चकतो. धडपडतोही, पण अशा चुकण्यात मजा आहे. कथा शेवटाकडे येताना उलगडणाऱ्या वेगळ्या सत्यातही मजा आहे. या केवळ गोष्टी म्हणून न उरता एक अनुभूती म्हणून लक्षात राहतात. ‘पानगळ’च्या केंद्रस्थानी अपूर्ण झालेल्या लैंगिक जाणिवा आहेत. कामेच्छा आहेत. 

गुप्तेंच्या लेखनात या सगळ्याच भावना व वर्णने थेट असतात. त्यात शृंगार असतो, वेडेपण असतं, आवेग असतो, आकर्षण असतं आणि वैचित्र्यही असतं. असे प्रसंग असणाऱ्या कथा बऱ्याचदा केवळ त्याच प्रसंगांकरिता स्मरणात राहतात. ‘पानगळ’बाबत असं होत नाही. ही कथा वाचून संपल्यावरही स्मरणात राहते, ती त्यातल्या रचनेमुळे. त्यातल्या पात्रांच्या संवेदना वाचकाला खोलवर जाणवल्यामुळे. सर्व गात्रांना जाणवलेल्या एका आगळ्या अनुभूतीमुळे. गाव आणि वाडीच्या, अंगावर काटा उभा करणाऱ्या वर्णनामुळे. तिच्या अस्सल, लयदार भाषेमुळे. गुप्तेंच्या कथा इतर गूढकथांहून वेगळ्या ठरतात ते यांमुळेच. आदिम जाणिवा, मूलभूत गरजा-भावना, डोकं चक्रावून टाकणारी कोडंसदृश मांडणी आणि ठराविक टप्प्यांवर वाचकाला बसणारे जबरदस्त धक्के या सर्वातून जन्म घेणाऱ्या या कथा असतात. याच प्रकारच्या घटक तत्त्वांचा सुयोग्य अंतर्भाव असणारी ‘पानगळ’ वाचकाला दीर्घकाळाकरिता स्मरणात राहील हे मात्र नक्की..!

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(हृषीकेश गुप्ते यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी इथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra Deore About 192 Days ago
पानगळ कथा मला आवडलीच होती पण आपल्या आस्वादक समीक्षैमुळे त्यात भर पडली. असंच कायम लिहा शुभेच्छा..
0
0

Select Language
Share Link
 
Search