Next
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात मुलांसाठी सुट्टीचा खजिना
BOI
Monday, April 29, 2019 | 05:32 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने मुलांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध केली आहेत. त्यात मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावणारे बहुमूल्य वाचनसाहित्य असून, इंग्रजीची भीती घालवण्यासाठी द्विभाषक पुस्तकेही उपलब्ध करण्यात आली आहेत. पुस्तकांच्या या खजिन्याचा लाभ घेऊन मुलांनी सुट्ट्यांमधील वेळ सत्कारणी लावून स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. 

सध्याच्या काळात माहिती मिळवण्यासाठी मुले, तरुण पिढी सोशल मीडियाची वाट धरते. पुस्तकांचे वाचन कमी होत चालले आहे; मात्र व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन नक्कीच महत्त्वाचे आहे. वाचन मुलांच्या जडणघडणीत, विचार सामर्थ्यात विशेष भर घालते आणि उज्ज्वल भवितव्य घडवते. मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा एक अतिशय उत्तम मार्ग म्हणजे त्यांना वाचनाची गोडी लावणे. मुलांनी रोज काही ना काही वाचले पाहिजे. त्यातून त्यांची चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता वाढीस लागते, असे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने मुलांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध केली आहेत. त्यामध्ये बोक्या सातबंडे, चिंटू, गेरोनिमो स्टिलटन (Geronimo Stilton), पर्सी जॅक्सन, नॅन्सी ड्र्यू (Nancy Drew), एनिड ब्लायटन (Enid Blyton) या लेखकांची मुलांना प्रिय असणाऱ्या पुस्तकांची संपूर्ण सीरिज, याचबरोबर शेरलॉक होम्स, बोक्या सातबंडे, फास्टर फेणे यांची पुस्तके यांचा समावेश आहे. आपल्या बहुमूल्य वाचनसाहित्याच्या माध्यमातून मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावणारे व त्यांना वाचते करून वाचनाची गोडी लावणारे सुप्रसिद्ध लेखक सुधा मूर्ती, राजीव तांबे यांचीही विविध पुस्तके वाचनालयात उपलब्ध करण्यात आली आहेत. त्याचबरोबर द्विभाषक पुस्तकेदेखील (इंग्रजी मजकूर व त्याखाली त्याचे मराठी भाषांतर) वाचनालयाने उपलब्ध केली आहेत. ही पुस्तके मुलांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती घालविण्यासाठी खूप उपयुक्त आहेत, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. 

‘शाळांना सुट्टी पडल्यावर मुलांना जसे मामाच्या गावी जाण्याचे वेध लागतात, तसेच वाचनालयाकडे जाण्याचे वेधही लागतात. एप्रिलच्या सुरुवातीलाच हा बालवर्ग वाचनालयाकडे येऊ लागला आहे. जी मुले आजूनही वाचायला शिकलेली नाहीत; मात्र त्या मुलांना वाचनाची गोडी याच वयात लागेल हे जाणून असणारे पालकसुद्धा आपली जबाबदारी पार पडताना दिसून येत आहेत. असे पालक बालविभागात आपल्या मुलाचे नाव नोंदवून त्या मुलाच्या वयाला साजेशी पुस्तके घरी घेऊन जातात. त्यांना त्या पुस्तकातील काऊ-चिऊच्या, परीराणीच्या गोष्टी, बडबडगीते वाचून दाखवतात. ही बाब नक्कीच सुखावह आणि कौतुकास्पद आहे,’ असे वाचनालयातर्फे सांगण्यात आले.

‘इंटरनेटच्या मोहमयी व आभासी दुनियेत या मुलांनी हरवून जाऊ नये, त्यासाठी मुलांना उत्तम वाचनसाहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना त्याचा लाभ घेता यावा या हेतूने पाच ते १६ या वयोगटासाठी वाचनालयात बालविभाग आहे. या विभागाचे सभासद होण्यासाठी अनामत रक्कम केवळ ५० रुपये असून, दर महिन्याला केवळ २५ रुपये वर्गणी आकारले जातात. यामध्ये एका वेळी दोन पुस्तके मुलांना घरी वाचनासाठी नेता येतात. महिनाभरात अशा प्रकारे किहीही पुस्तके वाचता येतात. या बालविभागाचा मुलांनी भरभरून लाभ घ्यावा,’ असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. 

‘बालवाचकांमधून तीन ते पाच उत्तम वाचक निवडले जातील. त्यांना ५०० रुपयांपर्यंतची पुस्तके व प्रमाणपत्रे पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येतील. चांगला प्रतिसाद मिळाल्यास मुलांसाठी सकाळी दोन तास व सायंकाळी एक तास मुक्त वाचन विभाग सुरू केला जाईल. या विभागात भरपूर पुस्तके तिथेच बसून वाचण्यासाठी उपलब्ध केली जातील. काही लोकप्रिय मान्यवरांना निमंत्रित करून विविध विषयांवर मुलांसोबत पुस्तकांसंदर्भात गप्पागोष्टी करण्याचाही मानस आहे. पालकांनी जागृत राहून या संधीचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन अॅहड. पटवर्धन यांनी केले आहे.

(मुलांसाठीची हजारो पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’ या पोर्टलवर उपलब्ध आहेत. पुस्तके ऑनलाइन खरेदी करून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 104 Days ago
Except idea . Hope , this becomes regular , annual activity . No reason why other cities cannot follow the example . Politics Need not come into this . It will be available to all , useful to all .
0
0

Select Language
Share Link
 
Search