Next
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान - अस्तंबा डोंगर
शशिकांत घासकडबी
Friday, October 26, 2018 | 10:55 AM
15 0 0
Share this storyनंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात असलेले अस्तंबा म्हणजेच अश्वत्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत असलेले चार हजार फूट उंचीवर असलेले ठिकाण मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाभारतातील चिरंजीव अश्वत्थाम्याचे हे स्थान असल्याचे मानले जाते. ऐन दिवाळीत धनत्रयोदशी ते भाऊबीज या काळात होत असलेल्या या यात्रेबद्दल...
............
अस्तंबा ऋषींच्या डोंगरावर जाण्याचा रस्ता कधी खोल दरी, पाय थोडाही घसरला तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही, असा खडतर आहे. अर्थात याही परिस्थितीत हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने अश्व त्थाम्याच्या दर्शनाला येत असतात. ऐन दिवाळीत धनत्रयोदशी ते भाऊबीज यादरम्यान ही यात्रा असते. नंदुरबार जिह्यातील अक्राणी (धडगाव) तालुक्यात असलेला श्री अस्तंबा (अश्वत्थामा) ऋषी डोंगर म्हणजे शूलपाणी झाडीमधील एक उंच शिखर आहे. असे म्हटले जाते, की या शिखरावरून अश्वत्थामा संपूर्ण शूलपाणी झाडीवर नजर ठेवून असतो.

मध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाविकही पायपीट करून या यात्रेला येतात. वर शिखरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अश्वत्थाम्याची प्रतिकृती म्हणून एक दगड आहे. तेथे मोठ्या श्रद्धेने लोक नवस करून नारळ फोडतात व पूजा-अर्चा करतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. या शिखरावर अतिशय कमी जागा असली, तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते. हा अश्वशत्थाम्याचा चमत्कार असल्याचे लोक सांगतात. या शिखरावरून सृष्टीच्या खऱ्या सौंदर्याचे दर्शन घडते. येथून दिसणारा सूर्योदय, तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी जाण्याचा व परतीचा मार्ग वेगळा आहे. 

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील अस्तंबा यात्रोत्सवाला धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवात होते. सातपुडा पर्वतरांगेतील तिसऱ्या पर्वतावर अस्तंबा ऋषींचा यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवासाठी भाविक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दाखल होतात. ही यात्रा तळोदा शहरापासून सुरू होते. सातपुड्यातील उंच डोंगर व अस्तंबा ऋषींच्या दर्शनाच्या ओढीने येणारे भाविक घोषणा करत चार हजार फूट उंचीचे शिखर सहज चढतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणूनच या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे. 

भाविक हाती भगवा झेंडा घेऊन ‘अस्तंबा ऋषी महाराज की जय’ असा जयघोष करत पदयात्रेने हजेरी लावतात. ‘शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वत्थामा आपल्या जखमांसाठी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांत तेल मागतो. आजही शिखरावर जाणाऱ्या यात्रेकरूंना तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो,’ अशी अस्तंबा ऋषींची दंतकथा आहे. अश्वत्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला, तरी त्यांचे स्थान भारतात अन्यत्र कुठेही आढळत नाही; मात्र अश्वत्थाम्याचे (अस्तंबा) स्थान सातपुड्याच्या कुशीमध्ये उंच शिखरावर असल्याचे दिसून येते. दिवाळीच्या पर्वावर सुरू होणाऱ्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेसाठी एक दिवस अगोदरच सर्व भाविक, यात्रेकरू तळोदा शहराजवळील शेतमळ्यावर मुक्कामाला थांबतात. तेथून तळोदा महाविद्यालयापासून वाजत-गाजत मिरवणुकीने शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतात. भाविकांचे मोठमोठे जथ्थे दाखल होत असल्याचे दृश्य तळोदा शहरात पाहायला मिळते.

यात्रेकरू कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जुना अस्तंबा, भीमकुंड्या या मार्गाने चालत यात्रेला जातात. रानटी श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे, मशाली अशा दीर्घ काळ जळणार्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करून अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेऊन ध्वज लावतात. सुमारे तीन दिवसात ही यात्रा पूर्ण केली जाते. एकदा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वत्थामाला पूजण्यामागे केवळ एक श्रद्धा आहे. त्याच्यासारखे दीर्घायुष्य मिळावे, यासाठीच कदाचित ही यात्रा असते, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्र येऊन ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढतात. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. 

या पदयात्रेदरम्यान डफच्या तालावर ठेका घेऊन ‘अस्तंबा ऋषी की जय,’ ‘पावबा ऋषी की जय’ असा जयघोष करून नृत्य करतात. त्यानंतर पदयात्रा पूर्ण करून परततात. हे भाविक यात्रोत्सवाला सुरुवात करताना गोऱ्यामाळ, चत्र्यादेव अशा टेकड्या पार करून शेवटी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेऊन तेथून नकट्यादेव, जुना अस्तंबा या मार्गे मामा-भाचा टेकडी, देवनदी व चांदसैली घाटमार्गे कोठार येथून परत येत असतात. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pramod Sonawane About 100 Days ago
nice information
0
0
jaypal bahadursing padvi About 135 Days ago
mast mahiti
0
0
Vandana Pawara About 135 Days ago
छान माहिती
0
0
Subhash pawara About 136 Days ago
Nice
0
0
Yogesh Dudave About 137 Days ago
Very nice place
0
0
Dipak marathe About 142 Days ago
Nice
0
0
Gavade Sudhakar Babulal About 142 Days ago
Every one having faith about Shri Krishna, should visit as Ashwathma have been allocated work to do in "Kaliyuga". Krishna have great assignment from Arjuna's Gurubandhu i.e. Ashwathma. So we should salute to this holly place. Have nice journey.
0
2
Deva More About 142 Days ago
asvastamba
1
0
Manoj kulthe About 144 Days ago
फारच सुंदर
0
0

Select Language
Share Link