Next
दृक्-श्राव्य लेखन
BOI
Sunday, March 18, 2018 | 11:45 AM
15 0 0
Share this story

‘किमया’ म्हणजे चमत्कार किंवा परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने होणे. एखादे पुस्तक वाचल्यामुळे, काही घटना घडल्यामुळे जीवनात परिवर्तन होते. कालिदासाला संस्कृत येत नसल्यामुळे पत्नीने निर्भर्त्सना केल्यावर तो तिरमिरीत घराबाहेर पडला, प्रचंड अभ्यास केला आणि जगाला एक महान नाटककार मिळाला. ‘बरसात’ या आपल्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी राज कपूरने शंकर-जयकिशन यांची निवड केली आणि एका रात्रीत ते प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. देवावर विश्वास नसलेले विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात आले आणि त्यांनी साऱ्या जगाला भारतीय तत्त्वज्ञान दिले. अशाच प्रकारच्या विविध ‘किमयां’बद्दल लिहिणार आहेत ‘पॅपिलॉन’सारखे एकाहून एक सरस अनुवाद करून गेली ४० वर्षे मराठी वाचकांना वेगळी साहित्यिक मेजवानी देणारे ज्येष्ठ अनुवादक  आणि साहित्यिक रवींद्र गुर्जर. ‘किमया’ हे त्यांचे साप्ताहिक सदर गुढीपाडव्याच्या औचित्याने सुरू करत असून, ते दर रविवारी प्रसिद्ध होईल. जीवनाला स्फूर्ती वा कलाटणी देणाऱ्या गोष्टींपासून नवे विचार, सामाजिक-राजकीय-साहित्यिक आदी क्षेत्रांत अपेक्षित असलेले परिवर्तन, नाट्य-चित्र-पुस्तक परीक्षण, मुलाखती, संगीत, प्रवास, कार्यक्रमांचे वृत्तांत अशा विविध गोष्टींचा या सदरात समावेश असेल. आजचा पहिला लेख दृक्-श्राव्य लेखनाबद्दल... 
.............
रोमन हॉलिडे चित्रपटामधील एक दृश्यफेब्रुवारीत ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात पार पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांत हॉलिवूडमध्ये ‘ऑस्कर’ पुरस्कार वितरणाचा ९०वा दिमाखदार सोहळा साजरा झाला. घरी निवांत बसून दूरदर्शनवर हा कार्यक्रम बघणे म्हणजे अद्भुत आनंद आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण आहोत, अशीच अनुभूती त्या वेळी मिळते. हॉलिवूडमध्ये शक्य नसले, तरी फिल्मफेअर, झी गौरव, मटा सन्मान अशा पुरस्कार समारंभात आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात आहोत, असा भास अनेक वर्षे मला होत असतो.

चित्रपट बघणे हा माझा ध्यास आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमधील हजारो चित्रपट मी पाहिलेले आहेत. गेली ६० वर्षे अखंड ते ‘व्रत’ चालू आहे. म्हणजे (१२ वर्षांची एक याप्रमाणे) पाच तपश्चर्या पूर्ण झालेल्या आहेत. एकाच तपश्चर्येत देव प्रसन्न होतो, तर पाच म्हणजे - गणपती, सरस्वती, लक्ष्मी (!) इत्यादी अनेक देवता प्रसन्न झाल्या असणारच! त्यामुळेच मी लेखक बनलो, असा माझा आवडता सिद्धांत आहे. 

काळजात ‘महाल’ निर्माण करणारा पहिला इंग्रजी चित्रपट ‘रोमन हॉलिडे.’ मी दहा वर्षांचा असताना सन १९५६मध्ये तो पुण्याच्या ‘अलका’ थिएटरला पाहिला. त्या वेळी अंगावर उभे राहिलेले रोमांच अजूनही तसेच आहेत. म्हणजे नुसता ‘रोमन हॉलिडे’ उच्चार केला तरी पुरतो. त्या दिवसापासून मी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा धडाकाच लावला. प्रेमकथा, विनोदी, रहस्यमय, युद्धपट, सामाजिक असे सगळे विषय यात आले. मराठी व हिंदीतील चित्रपट बघणेही चालू होतेच.

स्मरणशक्ती ही मला मिळालेली एक चांगली देणगी आहे. ५०-६० वर्षांपूर्वीच्या गोष्टीही मी विसरलेलो नाही. त्यातल्या त्यात चित्रपटांमधील महत्त्वाचे प्रसंग, परिणामकारक संवाद तर नक्कीच लक्षात राहतात. तीच गोष्ट संपर्कात आलेल्या लोकांची. माझे भाग्य असे, की हजारो लोकांशी माझा संबंध आलेला आहे. आत्या सर्वांशी देहबोली, ते काय आणि कसे बोलतात आणि त्या वेळचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव या सगळ्या गोष्टी मेंदू बारकाईने टिपून घेतो आणि त्यांचा कायमस्वरूपी साठा करून ठेवतो. जोडीला नाटक, संगीत आणि प्रवास यांचे संस्कार घडतच असतात.

ऑड्री हेपबर्न आणि ग्रेगरी पेक यांच्या सर्वांगसुंदर ‘रोमन हॉलिडे’प्रमाणे अन्य काही महान इंग्रजी चित्रपटांचा नुसता उल्लेख करतो - बेन हर, सायको, साउंड ऑफ म्युझिक, माय फेअर लेडी, दी गोल्ड रश, मॅग्निफिसंट सेव्हन, टेन कमांडमेंट्स, दी ग्रेट एस्केप, लॉरेन्स ऑफ अरेबिया, गॉडफादर इत्यादी इत्यादी. ही केवळ प्रातिनिधिक नावे आहेत. प्रेक्षकांच्या हृदयावर त्यांनी अधिराज्य केलेले आहे, अजूनही करत आहेत. 

आता एक साधा गणितीय अभ्यास करू. एक चित्रपट घेतला, तर त्यात नायक नायिका, खलनायक, विनोदी आणि सहायक अभिनेते येतात. आपण असे धरू, की प्रत्येक कलाकृतीत आठ व्यक्तिरेखा आहेत. त्याचप्रमाणे प्रसंगानुसार घडत जाणारी कथा. त्यात देश-विदेश, तेथील निसर्ग, वातावरण, संगीत हे सर्व आलेच.

पॅपिलॉनतात्पुरते असे धरू, की मी लेखन सुरू करण्यापूर्वी एक हजार चित्रपट पाहिले होते. म्हणजे त्यातील एकूण आठ हजार व्यक्तिरेखा, शेकडो शहरे-नगरे, वेगवेगळी कथानके आणि संगीत हे सगळे माझ्या मनात ठसले होते. ते बहुतांशी लक्षात राहण्याची उपजत कला होतीच. या पार्श्वभूमीमुळे, मी अनुवादित केलेले आणि प्रसिद्ध झालेले ‘पॅपिलॉन’ हे पहिलेच पुस्तक विलक्षण यशस्वी ठरले. लेखन स्वतंत्र असो, की अनुवादित, त्याची भाषा, निवेदनशैली, ओघ इत्यादी गोष्टी इतक्या ‘जिवंत’ पाहिजेत, की पुस्तक वाचताना जणू काही आपण समोर चित्रपटच बघत आहोत, असे वाटले पाहिजे. तेवढे सामर्थ्य लेखनात असेल, तर ते नक्कीच ‘दृक्-श्राव्य’ अनुभूती देणारच! शब्द आणि नाद हा आकाशाचा गुणधर्म आहे. जसे, पृथ्वीचा गंध, आपाचा रस, तेजाचे रूप आणि वायूचा गुणधर्म स्पर्श इत्यादी असतात. म्हणूनच, पुस्तक वाचताना/ऐकताना, संगीत श्रवण करताना आपण थेट आकाशतत्त्वाला जाऊन भिडतो. आपल्या पांचभौतिक शरीराची खालील चार तत्त्वे गळून पडतात. आत्मानंदात आपण विहरत असतो. ती अनुभूती जितकी प्रभावी, प्रत्ययकारी असेल, त्यानुसार ती साहित्यकृती किंवा संगीत कमी-जास्त श्रेष्ठ ठरत असते. श्रोते किंवा वाचकांच्या हृदयात त्याचे कायमस्वरूपी अधिष्ठान राहते. तो लेखक/कलाकार यशस्वी ठरतो. लोकांच्या प्रेमादाराला पात्र ठरतो.

एखाद्याची पहिलीच कलाकृती जेव्हा लोकप्रिय होते, तेव्हा त्याने आधी किती मौल्यवान ‘संपत्ती’ गोळा केली असेल, हे लक्षात येते. लेखनाचे तांत्रिक शिक्षण, अनुवाद कसा करावा इत्यादी पुस्तकी सैद्धांतिक ज्ञान नेहमीच दुय्यम स्वरूपाचे असते. त्याचेही महत्त्व नक्कीच आहे. परंतु ‘आडातच नसेल, तर पोहऱ्यात काय येणार?’ 

रवींद्र गुर्जरलोकप्रिय, अजरामर साहित्यकृतींना ‘दृक्-श्राव्य’ची कसोटी लावून बघा. त्यात सगळ्याच उच्च श्रेणी प्राप्त करतील. प्रत्येक कथा, कादंबरी, ललित कृती ही एक प्रकारे पटकथाच असते. कथा-विषयाचा पट त्यात क्रमश: उलगडत जातो. साहित्य आणि नाट्य-चित्र क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे अनुभवविश्व अतिशय समृद्ध असते.

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link