Next
सेक्रेड गेम्स : विस्तीर्ण व्याप्ती असणारं गुंतागुंतीचं कोडं
BOI
Tuesday, September 03, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:एका मोठ्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश, हे ‘सेक्रेड गेम्स’चं वन लाइन स्क्रिप्ट म्हणून सांगता येईल. एका कुख्यात गँगस्टरच्या निवेदनातून उलगडत जाणारी ही एकूण सोळा भागांची कथा आहे. जुन्या-नव्या घटनांची बेमालूम मिसळ, तगडे परफॉर्मन्सेस व दिग्दर्शन आणि उच्च निर्मितीमूल्यं या सगळ्या जोरावर ही निश्चितच चांगली वेबसीरिज ठरते. ‘रसास्वाद’ सदरात आज ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजबद्दल...
...........
लेखक विक्रम चंद्रच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकावर आधारित वेबसीरिजचा दुसरा सीझन १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. मालिकेच्या पहिल्या सीझनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. काळाचा इतका विस्तीर्ण पट असलेली, अतिशय स्टायलिश अशी भारतीय मालिका, भारतीय प्रेक्षक बहुधा प्रथमच अनुभवत होता. एका उत्कंठावर्धक वळणावर पहिला सीझन येऊन संपला होता. त्यामुळे, दुसरा सीझन कधी येणार आणि त्यामध्ये काय असणार याबद्दल जबरदस्त उत्सुकता होती. सेक्रेड गेम्स या वेबसीरिजची निर्मितीमूल्ये उच्च आहेत. या मालिकेच्या कथानकात, भारतात (मुख्यत्वे मुंबईत) यापूर्वी घडून गेलेल्या घटना आणि सद्यस्थितीत घडणाऱ्या काही घटना यांचं आकर्षक व सफाईदार मिश्रण आहे. 

गणेश गायतोंडे (नवाझुद्दिन सिद्दिकी) नावाच्या एका कुख्यात गँगस्टरच्या निवेदनातून उलगडत जाणारी ही एकूण सोळा भागांची कथा आहे. ही कथा साध्या-सरळ पद्धतीनं सांगितली असती, तर कदाचित कंटाळवाणी वाटू शकली असती. एका मोठ्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश, हे सेक्रेड गेम्सचं वन लाइन स्क्रिप्ट म्हणून सांगता येईल. आता कथा साधी-सरळ वाटू नये म्हणून काहीशा मसाल्याची गरज असते. इथे, या मालिकेत, राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकालातील गैरप्रकरणे, बाबरी, दाऊद आणि राजनची प्रत्यक्ष नावं न घेता दिलेल्या हिंट्स, जुन्या मुंबईत घडलेल्या काही घडामोडी, ‘धर्म’ या संकल्पनेचा फायदा स्वार्थासाठी करून घेणारे राजकारणी किंवा इतर काही शक्तींनी घडवलेल्या काही घातपाती गोष्टी या सगळ्याचे पुसटसे, निसटते केलेले उल्लेख म्हणजे हा मसाला आहे. याबरोबरच प्रचंड शिवीगाळ, हिंसाचार आणि न्यूडिटीचा तडकाही पहिल्या सीझनला देण्यात आला होता. पहिल्या सीझनचे पहिले चार भाग संपेपर्यंत, या सीरिजमागे एक प्रपोगंडा तत्त्व आहे, जे अगदी स्पष्टपणे दिसून येत होतं. ही सीरिज २०१९च्या मतदानाची तयारी आहे असं वाटण्याइतपत; पण चौथ्या एपिसोडनंतर मालिका अचानक गियर बदलते. तिचा फोकस आणि तत्त्व बदलू लागतं. मालिका शेवटाकडे पोहोचते तेव्हा हे ‘प्री-इलेक्शन एनव्हायर्न्मेंट’ असल्याची शक्यता बरीचशी मावळते. 

पाच, सहा आणि सात नंबर एपिसोड जबरदस्त आहेत. सध्याच्या घटना आणि इतिहासातल्या घटना, त्यामध्ये बेमालूमपणे मिसळल्या आहेत. जुन्या मुंबईचं वातावरण चांगलं उभं केलं आहे. अनेक पॅरलल टाइमलाइन्सवर ही कथा पुढे सरकत राहते. पहिल्या सीझनमध्ये आरती बजाजचं एडिटिंग अफलातून होतं. आरती बजाजनं यापूर्वी अनुराग कश्यपच्या बऱ्याच सिनेमांचं एडिटिंग केलंय. कश्यपची ती पूर्वाश्रमीची पत्नी आहे. दमदार दिग्दर्शन, अभिनय, संवाद या सगळ्याबरोबरच एडिट या गोष्टीचा ही मालिका स्पीडी आणि क्रिस्पी होण्यामागे मोठा वाटा आहे. सर्वांचेच अभिनय जबरदस्त आहेत. विशेषकरून सैफ अली, नवाझ, नीरज काबी आणि जितेंद्र जोशी. विक्रम मोटवाणे आणि कश्यप या जोडीचं दिग्दर्शन लाजवाब. एखाद्या सिनेमाइतक्याच निगुतीनं ही सीरिज बनवली आहे. मोठ्या लांबीचे (पाऊण तास ते एक तास) एपिसोड्स असूनही मालिका कुठेही कंटाळवाणी होत नाही. म्युझिक आणि बॅकग्राउंड स्कोअर्स लाजवाब. संवाद एकदम खमंग आणि चुरचुरीत. पहिल्या सीझनमध्ये असणारी शिवीगाळ, हिंसाचार आणि न्यूडिटी मात्र भयाण आणि अंगावर येणारी आहे. वेबला सेन्सॉरशिप नाही म्हणून इतका सढळ हस्ते सगळ्या गोष्टींचा वापर करायची खरंच गरज होती का, हे नक्कीच वाटतं. कथा आणि सिच्युएशनच्या दृष्टीनं जरी बघितलं, तरी या गोष्टी, फार मोजक्या जागा वगळता, इतक्या अंगावर येणाऱ्या पद्धतीनं आल्या नसत्या, तरीही मालिका तितकीच उठावदार वाटली असती. ‘सेक्रेड गेम्स सीझन दोन’ची रंगत तिसऱ्या भागाच्या शेवटापासून चढू लागते. कधी एकदा पुढचा भाग पाहतो असं होत नाही पहिल्या सीझनसारखं; पण या सीझनची मजा वेगळी आहे. संथ पेसनं चालणारा सीझन आहे. यात रेखाटलेली पात्रं, अनेक गोष्टींची आपसात जुळलेली नाती, प्रॉडक्शन डिझाइन, गुन्हे अन्वेषणाची तपशीलवार पद्धत, एकंदर डीटेलिंग आणि दोन टाइमलाइन्सवरचं सफाईदार संकलन अफलातून आहे. आध्यात्मिक गुरूचं पात्र, त्याचा लोकांवर दोन पिढ्यांहून अधिक काळ टिकून असणारा प्रभाव, त्यांच्या नावाभोवती असणारं वलय, अध्यात्म, गुन्हेगारी, राजकारण आणि दहशतवाद यांचं आपसात असणारं नातं आणि त्याचा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हल्सवर असणारा स्प्रेड, हे सगळं पाहणं फार रंजक आहे. या मालिकेतली प्रचंड मोठ्या संख्येनं असणारी पात्रं, त्यांचे स्वभाव आणि मालिकेचा एकंदर पट, अफाट आणि अचाट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनची तुलना न-करता, फक्त त्यांच्यातली समान सूत्रं लक्षात ठेवून बघितला, तर हा सीझनही आवडण्याची शक्यता आहे. हा सीझन पहिल्या सीझनच्या तुलनेत अतिशय संथ गतीनं जातो. 

पहिले दोन भाग रटाळ आहेत; पण साधारण तिसऱ्या भागाच्या मध्यापासून हा सीझन ग्रिप घेतो‌. एखादं मोठं जिगसॉ पझल हळूहळू सुटत जावं तसा अनुभव प्रेक्षकाला येतो. पात्रांच्या मनोभूमिका, त्यांचे झपाट्यानं बदलत जाणारे आलेख, त्यांची आपसांतली नाती आणि त्या नात्यांचं जोडकाम हे सगळं निगुतीनं विणलं आहे. गुरुजी आणि त्यांचं एकंदर साम्राज्य परिणामकारक पद्धतीनं उभं केलं आहे. पात्रांच्या तोंडच्या शिव्या या सीझनमधे अती झाल्यात. या सीझनमध्ये घटना कमी आहेत. कथनाचा वेग बराच लो. न्यूडिटीला जवळपास फाटा दिला आहे. या कादंबरीची विक्रम चंद्रनं केलेली रचना कमालीची आहे. अनेक घटना, अनेक पात्रं, गुंतागुंत असणारं हे कथानक शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवतं. अनुराग कश्यप आणि टीमनं या कथानकात काही बदल करत, मूळ रचनेला धक्का न लावता साजेसं काम केलं आहे. शेवटचे एपिसोड्स लेटडाउन असल्याचं ऐकलं होतं; पण मला तेही आवडले. 

क्लायमॅक्सच्या वेळचं सगळंच बरंच फिल्मी आहे; पण ते हास्यास्पद/लेटडाउन नक्कीच वाटत नाही. मालिकेचा शेवट संदिग्ध आहे. दोन ठळक पर्याय समोर ठेवून जाणारा. सैफ अली, नवाझुद्दीन, पंकज त्रिपाठी, आमिर बशीर आणि सुरवीन चावला या सगळ्यांचं काम आवर्जून पाहण्यासारखं‌. त्या तुलनेत मराठी कलाकार अतिशय वाया घालवले आहेत. दुसऱ्या सीझनमधलं गुरुजीचं पात्र जबरदस्त आहे. शांतता अथवा ‘पीस’ या शब्दाचा अतिशय वेगळा अर्थ गुरुजी लावतात आणि आपल्या खास अनुयायांना जमवून एक वेगळी सुरुवात करू पाहतात. शांततेच्या आवरणाखाली शिजत जाणारा हा भयानक कट बघत असताना उत्सुकता ताणली जाते. सध्याच्या जगातला केऑस, एकूण अस्वस्थता आणि अशांतता यामुळे भरकटत चाललेल्या समाजाचा एक विवक्षित छेद या मालिकेत पाहायला मिळतो. दिशाहीनपणे भरकटणाऱ्या काही आयुष्यांचा एकत्रितरीत्या वापर करून, घातपाती कारवाया करून शांतता प्रस्थापित करण्याचा गुरुजींच्या पात्राचा मानस अतिशय भयंकर भासतो. परदेशी असणारं शूट, उत्कृष्ट निर्मितीमूल्यं आणि भव्य सेट्स इत्यादींमुळे मालिका अतिशय देखणी बनली आहे. मोठ्या क्षेत्रफळावर पसरलेलं हे जिगसॉ पझल सोडवत जाताना प्रेक्षकाची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. सीरिज म्हणून सेक्रेड गेम्स चांगली असली, तरी ती फारच भारी, ‘मस्ट वॉच’ वगैरे कॅटेगरीत मोडणार नाही. आपल्याकडे आधी येऊन गेलेल्या अनिल कपूर अभिनित, निर्मित ‘२४’इतकी ती पोकळ नक्कीच नाही; पण यातला कंटेंट ‘आउट ऑफ दी वर्ल्ड’ वगैरेही नाही. विक्रम चंद्रच्या मूळ नॉव्हेलमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. सध्या मूळ कादंबरी दोन भागांत विभागून, ‘सेक्रेड गेम्स नेटफ्लिक्स टाय इन एडिशन’ या नावानं नव्या आवृत्त्या बाजारात आल्या आहेत. (अॅमेझॉनवर मिळतात). हे बदललेलं स्क्रिप्ट, जुन्या-नव्या घटनांची बेमालूम मिसळ, तगडे परफॉर्मन्सेस व दिग्दर्शन आणि उच्च निर्मितीमूल्यं, या सगळ्या जोरावर ही निश्चितच चांगली वेबसीरिज ठरते. 

तुम्हाला जर गँगस्टरपट पाहायची सवय असेल, बेफाम शिवीगाळ, हिंसाचार, रक्तपात, सेक्स इत्यादी प्रकार पाहून तुम्हाला फारसं अस्वस्थ व्हायला होत नसेल, तर सेक्रेड गेम्स पाहायला हरकत नाही. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. ‘रसास्वाद’ या त्यांच्या पाक्षिक सदराचा हा शेवटचा भाग आहे. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra Gandhi About 13 Days ago
Excellent.... yet to see season 2
0
0

Select Language
Share Link
 
Search