Next
पावसाळ्यातील प्रयोगशील आहार
BOI
Wednesday, June 13, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, याचे कारण पावसाळ्यात सतत बदलणारे वातावरण. यामुळे अशा वातावरणात लवकर पसरणारे विविध साथीचे आजार आणि इतर इन्फेक्शन्स यांपासून आपला बचाव करण्यासाठी या काळातील आपला आहार सकस, योग्य आणि पौष्टिक असणे गरजेचे आहे. ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या पावसाळ्यातील प्रयोगशील आहाराबद्दल... 
.................
पावसाळा सुरू झाल्यावर सर्व वर्तमानपत्रे, साप्ताहिकातून पावसाळ्यातील आहाराबद्दल भरभरून लिहिले जाते. सर्वसाधारणपणे संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त अशी माहिती त्या लेखांमध्ये असते. घरातील आई-बाबा, आजी-आजोबा या वयोगटातील लोकांनी या मोसमात जास्त खाल्ले, तर त्यांना त्रास होतो हे माहीत असते; पण प्रश्न आहे तरुण वर्गाचा. पावसात भिजायचे व टपरीवर गरमागरम भजी, चहा घ्यायचा, मजेत फिरायचे. फिरताना मधेच कुठे गरम वडापावची गाडी दिसली, की परत गाडी थांबवायची व वडापावपण हाणायचा. कणीस तर सगळ्यांचे आवडते आहेच. असे करता करता पोटावर अत्याचार चालू असतो व दुसऱ्या दिवशी खरी गंमत होते. पावसात उभे राहून खाल्लेली गरम गरम भजी व वडापाव त्रास देऊ लागतात. 

यावर अगदी सहज पडू शकेल असा प्रश्न म्हणजे, इतर ॠतूंमध्ये इतका लगेच त्रास होत नाही, पण पावसाळ्यात का होतो? तर पावसाळ्यात वातावरणात सतत बदल होतात. हवा दमट झाली, की सूक्ष्मजंतू, माशा, डास यांची लगेच वाढ होते. असे वातावरण हे अनेक आजारांना निमंत्रणच असते. अशा वातावरणात रोगांच्या साथी सुरू होतात. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यांना ह्याचा फटका बसत नाही; पण ज्यांचा आहार संतुलित नाही, फळे, भाज्यांचा अभाव, प्रथिनांची कमतरता असेल, तर यामुळे जंतुसंसर्ग लगेच होतो. मग लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही याचा त्रास होऊ शकतो.

पावसाळ्यात पचनसंस्थाही कमकुवत होते. त्यामुळे अती खाणे किंवा जड पदार्थ यांमुळे हमखास पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यात भर पडते ती दूषित पाण्याची. पावसामुळे पाणी गढूळ होते व अनेक साथीचे रोग उद्भवतात. सर्दी, खोकला, ताप असताना अन्नावरील वासना उडते, पण अन्नाशिवाय ताकद येणार कुठून? अशा वेळी आपल्याला खरे तर भरपूर उर्जेची गरज असते. कारण प्रत्येक वाढलेल्या एक डिग्री तापामागे आपले चयापचय १३ टक्क्यांनी वाढलेले असते. त्यामुळे शरीराची ऊर्जेची गरजही वाढलेली असते. ऊर्जेप्रमाणेच प्रथिनांची गरजसुद्धा वाढलेली असते. परंतु यादरम्यान आपला आहार कमी झालेला असतो. त्यामुळे मग अशक्तपणा येतो. खनिजांचे व जीवनसत्त्वांचे महत्त्व इन्फेक्शनपासून बचावासाठी अधिक असते. त्यातही ब आणि क जीवनसत्त्वांचे महत्त्व विशेष आहे. हे सर्व सांभाळणे अवघड असले, तरीही अशक्य नाही.  

मुळातच अशी आजारपणे उद्भवू नयेत म्हणून पावसाळ्यात काही प्रयोग स्वतःवरच करावेत. हे प्रयोग आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा करावेत व स्वतःच त्याचे उत्कृष्ट परिणाम बघावेत.  

प्रयोग क्र. १ - आठवड्यातून एक दिवस फक्त पातळ पदार्थच खावेत. ज्यामध्ये खूप वेगवेगळी सूप्स, तांदळाची पेज, कढी, अत्यंत पातळ मुगाची खिचडी, ताकातील नाचणीची लापशी, असे पदार्थ असावेत. 

प्रयोग क्र. २ - एक दिवस उपवास करावा. यामध्ये पोटाची शुद्धी / विश्रांती हेच मुख्य कारण मानावे. या दिवशी ताक, फळे, भगर, (वऱ्याचे तांदूळ), चहा-कॉफी, शिंगाड्याची लापशी, असा आहार ठेवावा.  

प्रयोग क्र. ३ - एक दिवस मुगाचे कढण, वरण किंवा ताक, फुलके किंवा भाकरी, पातळ भाजी इतका साधा आहार असावा.  

प्रयोग क्र. ४ - सकाळचा चहा व दोन बिस्किटे खाल्ली, की जोपर्यंत भूक लागत नाही, तोपर्यंत काहीही खायचे नाही. भूक लागल्यावर मुगाच्या डाळीचे दोन डोसे व एखादी भाजी, नंतर साळीच्या लाह्यांचा काला, एखादे फळ, सूप असा आहार असावा. 

प्रयोग क्र. ५ - एक दिवस सातूचे पीठ, दूध, फळे यांवर राहावे 

या सर्व प्रकारच्या आहारांमध्ये काही गोष्टी आपल्याला सारख्याच दिसतील. मुगाचा वापर, शिजवलेल्या भाज्या, फळे, ताक, चहा, कॉफी, इत्यादी पदार्थांचा आळीपाळीने समावेश आहे; पण कच्चे सॅलड, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, कच्ची कडधान्ये यांचा समावेश नाही. याचे कारण आपल्या पचनसंस्थेला अजिबात ताण न देता उलट आराम द्यायचा आहे. याव्यतिरिक्त रोज जेवणात लिंबाचा वापर अवश्य करावा. लिंबू आपल्याला संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवते. तसेच रोज दोन चमचे साजूक तूप जरूर खावे. आपण जे सूप करतो, त्यामध्ये काही मसाल्यांचा वापर आवश्यक आहे. काही मसाल्याचे पदार्थ ताजे असतात, उदाहरणार्थ आले, लसूण, कांदा, पुदिना, इत्यादी; वाळलेले मसाल्याचे पदार्थ जसे लवंग, मिरे, दालचिनी इत्यादी मसाल्याचे पदार्थ अन्नाला चव तर आणतातच, पण यातील घटक आपल्याला रोगापासून दूर ठेवण्यासही मदत करतात. हरभऱ्याची डाळ, कच्चे सॅलड, कडधान्ये, जास्त प्रमाणात मक्याचे कणीस, आंबवलेले पदार्थ व बेकरीचे पदार्थ हे पचायला जड असतात. आपली पचनशक्ती पावसाळ्यात मंद झालेली असताना या पदार्थांचे सेवन केल्यावर पोट बिघडणे, पित्त वाढणे, उलट्या इत्यादी त्रास होऊ शकतो; पण सगळ्यात तापदायक म्हणजे गॅसेस होऊन ढेकर येणे, पोटात दुखणे, अपचन यांमुळे खायची इच्छा न होणे अशा अनेक तक्रारी पाहायला मिळतात. 

कॉलेजमध्ये जाणारी मुलेही दिवसभर बाहेरच असतात. आधी कॉलेज मग नंतर प्रॅक्टिकल, क्लास इत्यादींसाठी मुले बाहेर असतात. त्यामुळे त्यांनी दोन-तीन डबे घेऊन जाणे श्रेयस्कर असते. बाहेरचे अन्न काही कारणाने एखाद्या दिवशी खाणे वेगळे; पण बाहेरचेच खाण्याची सवय झाल्यामुळे घरून डबा नेणे मुलांना कमीपणाचे वाटते. आजकाल घरातील स्त्रिया नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर जातात. त्यामुळे दोन डबे कोण देणार, असा नकारात्मक विचार होत असतो. बाहेरचे पदार्थ खातानासुद्धा काही नियम पाळावेत. उदाहरणार्थ, फक्त एक फुल सूप घ्यावे, कणकेची पोळीच घ्यावी, हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा, चायनीज खाण्यापेक्षा आजकाल पोळी-भाजी मिळण्याची अनेक ठिकाणे असतात. थालीपीठ, भाज्यांचे पराठे असे पदार्थ मागवावेत. चहा, कॉफी घ्यावी; पण त्याचे अतिसेवन नसावे. आहारात त्या हंगामातील फळांचा समावेश असावा. 

वर सांगितलेले प्रयोग सर्वांनीच करून पाहावेत. सुट्टीच्या दिवशी तरुण वयोगटातील लोकांनी हे प्रयोग करून पाहावेत. साधारण तीसपेक्षा जास्त वय असलेल्यांनी हे आहारातील बदल आठवड्यातून एक–दोन वेळा केल्यास प्रकृती उत्तम राहीलच; पण दुसऱ्या दिवशीही ताजेतवाने वाटेल. ढगाळ हवेमुळे आपला कामातील उत्साहदेखील कमी झालेला असतो. दुपारी झोपावेसे वाटते; पण असे काम टाकून झोपता येत नाही. निरुत्साही करणाऱ्या सर्व गोष्टी निघून जातील यात शंकाच नाही. तसेच आपण मनावर व तोंडावरसुद्धा संयम ठेवायला शिकतो. नियम पाळण्याची सवयही होते. 

शेवटी ‘आपले आरोग्य आपल्याच हाती’, असे जे म्हटले आहे, ते खरेच आहे....!!
        
- आश्लेषा भागवत
मोबाईल : ९४२३० ०८८६८
ई-मेल :  ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत. ‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link