Next
‘उत्कर्ष मंदिर’च्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप; एकत्र येऊन समाजकार्य
आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य, पर्यावरणविषयक काम
BOI
Tuesday, June 25, 2019 | 03:51 PM
15 0 0
Share this article:

वारदोली गावातील आरोग्य शिबिरात डॉ. मेघा पाटील व डॉ. अभिजित खेर यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.

मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील जुने मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन ग्रुप तयार करू लागले आहेत; पण काही ग्रुप केवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्याव्यतिरिक्त विधायक कामेही करत असतात. मुंबईतील मालाडमधील उत्कर्ष मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप त्यापैकीच एक. ३५ वर्षांनी सोशल मीडियातून एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी सामाजिक ‘उत्कर्षा’साठी पुढाकार घेऊन, पनवेलजवळच्या आदिवासी पाड्यांमध्ये काम सुरू केले आहे. अशा गटांसमोर त्यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे. 

मुंबईच्या मालाड (पश्चिम) उपनगरातील उत्कर्ष मंदिरच्या १९८०च्या दहावीच्या तुकडीतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी एक-दोन वर्षांपूर्वी ग्रुपमुळे एकत्र आले. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेली ही मित्रमंडळी एकत्र आली आणि केवळ मौजमजा करण्यापेक्षा काही तरी विधायक काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. पनवेलजवळ प्रबळगडच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला. 

ठाकूरवाडी या आदिवासी पाड्यातील हालटेप, ताराटेप व माची प्रबळ अशी तीन गावे त्यांनी निवडली. सुटीच्या दिवशी एकत्र येऊन त्यांनी या गावांना वरचेवर भेटी दिल्या. तिथल्या अडचणी समजून घेतल्या. कूपनलिका पंपाची दुरुस्ती, जल संवर्धन (पाणी अडवा, पाणी जिरवा), आरोग्यविषयक प्रश्नांचे निवारण, शैक्षणिक मदत, वृक्ष लागवड अशी अनेक कामे त्यांनी हाती घेतली. 
वारदोली गावातील आरोग्य शिबिर उपक्रमात डॉ. मेघा पाटील, डॉ. अभिजित खेर यांच्यासह श्रीधर वैशंपायन, विद्याधर काठे, विनोद केणी, बिपिन लांजेकर, गीता देवल, स्मिता म्हात्रे, प्रज्ञा जोशी सहभागी झाले होते.

नऊ जून २०१९ रोजी त्यांनी वारदोली गावात प्राथमिक आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यासाठी या ग्रुपमधील डॉक्टर मेघा पाटील आणि डॉक्टर अभिजित खेर यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना श्रीधर वैशंपायन, विद्याधर काठे, विनोद केणी, बिपिन लांजेकर, गीता देवल, स्मिता म्हात्रे, प्रज्ञा जोशी यांच्यासह जे. जे. हॉस्पिटलमधील नर्सेस सुप्रिया आणि मनीषा यांनी सहकार्य केले. डॉ. अभिजित व डॉ. मेघा यांनी तेथील महिला, मुलांची तपासणी करून, त्यांना आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. या शिबिरासाठी वारदोली ग्रामपंचायतीच्या सरपंच शिल्पा पवार, इतर ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांचेही उत्तम सहकार्य मिळाले. स्नेहा (सुनीता) दामले, सविता जोशी, सुहास चितळे, सुनील वावदे, प्रकाश तिर्लोटकर, विनोद केणी, भावना कुळकर्णी यांच्यासह आणखी अनेक मित्र-मैत्रिणी ग्रुपचे सदस्य असून, सर्वांचे या कार्यात योगदान असते.


या ग्रुपच्या कार्याबद्दल ग्रुपच्या वतीने विद्याधर काठे यांनी माहिती दिली. ‘मालाडमधील उत्कर्ष मंदिर या शाळेत १९८०मध्ये दहावी झालेले आम्ही वर्गमित्र-मैत्रिणी व्हॉट्सअॅपमुळे एकत्र आलो. अनेकदा एकत्र भेटू लागलो. आपल्या अनुभवाचा, शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, असा विचार अशाच एका भेटीत पुढे आला आणि सर्वांचाच त्याला पाठिंबा मिळाला. लगेचच आम्ही कामाला लागलो. उत्कर्ष प्रतिष्ठान नावाने संस्था स्थापन केली आणि आदिवासी गावांसाठी काम करण्यास सुरुवात केली. एकत्र येऊन त्यांच्यासाठी काम करताना आम्हाला खूप समाधान मिळत आहे. समाजाचे देणे आपण प्रत्यक्ष काहीतरी काम करून देऊ शकत आहोत, याचा आनंद आहे,’ असे ते म्हणाले.  


‘आमचे काम पाहून आणखी असे काही ग्रुप पुढे यावेत आणि अशा कामांचे प्रमाण वाढावे असे आम्हाला वाटते. अशा कामांसाठी आर्थिक पाठबळही महत्त्वाचे असते. प्रत्येक वेळी पदरमोड करून खर्च करणे शक्य होत नाही. कामालाही मर्यादा येतात. त्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करत आहोत. अर्थात, आम्ही आमच्या क्षमतेनुसार जे काम करू शकत आहोत, त्यातून आम्हाला खूप आनंद आणि समाधान मिळत आहे. आमचे मैत्रीचे बंध अधिक घट्ट होत असून, गावातील लोकांशीही वेगळे नाते निर्माण होत आहे, हे आनंददायी आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही जरूर वाचा..

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vikas Mhatre About 113 Days ago
Good work..i m also ex Utkarsha & my son is also ex Utkarsha Malad west.. keep it up...
0
0
Usha N Gambhir. About 114 Days ago
Good work.All the best.
1
0

Select Language
Share Link
 
Search